माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकारणातील एका महत्त्वाच्या आणि तितक्याच वादळी पर्वाचा अस्त झाला आहे.
सुरेश कलमाडी यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून आणि सार्वजनिक जीवनापासून अलिप्त होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कलमाडी यांची राजकीय कारकीर्द मोठी आणि प्रभावशाली होती. त्यांनी तीन वेळा लोकसभेत पुणे शहराचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच चार वेळा ते राज्यसभेचे सदस्य राहिले होते. केंद्रामध्ये त्यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता (१९९५-१९९६). पुण्याच्या विकासात आणि शहराला जागतिक नकाशावर आणण्यात त्यांचे योगदान मोठे मानले जाते. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे इंटरनॅशनल मॅराथॉन यांसारख्या उपक्रमांचे ते मुख्य प्रणेते होते.
राजकारणाव्यतिरिक्त क्रीडा प्रशासक म्हणूनही त्यांची जागतिक स्तरावर ओळख होती. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्षपद त्यांनी १५ वर्षे भूषवले. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. मात्र, याच स्पर्धेतील कथित भ्रष्टाचारामुळे त्यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी त्यांना १० महिने कारावासही भोगावा लागला होता. या प्रकरणानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले होते.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सुरेश कलमाडी यांनी भारतीय वायुसेनेत वैमानिक म्हणून देशसेवा केली होती. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. एक लढाऊ वैमानिक ते देशाचे मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास राहिला आहे.