रस्त्यावरुन जाताना अनेकदा नजरेस पडणाऱ्या,‘स्ट्रीट आर्ट’ची अनेकांना भुरळ पडते. शहरांमधल्या रस्त्यालगतच्या मोठमोठ्या भिंतींचाच कॅनव्हास करून ही चित्रं काढली जातात. मोठमोठे आर्टिस्टही आपल्या कुंचल्यातून या भिंतींना एक नवं रूप देतात. स्ट्रीट आर्टच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हनीफ कुरेशी यांचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी स्टार्ट आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या इंस्टाग्राम पेजवर देण्यात आली.
हनीफ कुरेशी यांच्या टीमने भावूक होत पुढे म्हटले की, “हनिफ कुरेशी यांच्या निधनाने प्रत्येकजण खूप निराश झाला आहे. आमच्याकडे काहीही बोलण्यासाठी शब्द नाहीत. हनीफ एक उत्तम मार्गदर्शक, सहकारी, मित्र, वडील आणि पती होते. त्यांच्या दूरदृष्टीने अगणित प्रकल्पांनी भारतातील कला आणखी प्रगत करण्यास मदत केली आहे. हनिफने भेट दिलेल्या प्रत्येक शहरात त्यांनी आपल्या अप्रतिम ग्राफिटीने आपली छाप सोडली.”
पुढे ते म्हणतात, “गेल्या १० वर्षांपासून हनिफ यांना जाणून घेणे आणि त्यांच्यासोबत काम करणे St+Art, XXL आणि गुरिल्ला टीमसाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यांनी एक मोठा वारसा मागे ठेवला आहे, ज्याद्वारे हनिफ नेहमीच आपल्यात राहील. हनिफ कुरेशी यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे. आम्हा सर्वांना त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.”
स्ट्रीट आर्टला समाजात नव्याने ओळख करून देण्यासाठी हनीफ यांनी काम सुरु केले होते. स्ट्रीट आर्टसाठी कॅनव्हासेस पाहिजेत म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जागांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच शोधात २०१३ मध्ये ते दिल्लीच्या लोधी कॉलनीत आले. त्याठीकाणच्या उंचच उंच भिंती आणि त्या परिसराची क्षमता पाहिली. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी आपले काम सुरु केले. ती चित्रे इतकी आकर्षित होती की त्याने लोधी कॉलनीत लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि रस्त्यावरील कलेबद्दलच्या धारणा बदलल्या. या रंगीत भित्तिचित्रांमुळे लोधी कॉलनीला भारतातील पहिला कला जिल्हा म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यानंतर हनीफ कुरेशी यांनी कलेला कार्यात्मक स्वरूप देण्यासाठी २०१४ मध्ये चार मित्रांसह ‘स्टार्ट आर्ट इंडिया फाउंडेशन’ची स्थापना केली. हनीफ यांच्या कलेची आवड असणारे लोक असं म्हणतात की, हनीफ कुरेशी यांना कला ही आर्ट गॅलरी किंवा म्युझियमच्या चार भिंतींबाहेर बाहेर पहायची होती. चित्रकला ही रस्त्यावर आणि भिंतींवर देखील असले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकजण ते पाहू शकेल आणि त्याचा आनंद घेऊ शकेल, अशी त्यामागची त्यांची भावना होती.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांना बोलावून त्यांना भारतीय सहायक देऊन त्यांच्याकडून अख्ख्या इमारतींचे बाह्यभाग व्यापणारी मोठमोठी चित्रे त्यांनी स्टार्ट या संस्थेच्या माध्यमातून साकारली. स्टार्ट आर्टने २०१७ मध्ये अर्बन आर्ट फेस्टिव्हलचा भाग म्हणून ससून डॉक आर्ट प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा केली. आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांनी हा आंतरराष्ट्रीय सोहळा मोठ्या कलाकारांच्या उपस्थितीत राबवला. या संस्थेने दिल्ली, मुंबई आणि गोव्यातही ‘स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल’ सुरू केला. त्याचसोबत मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईसह विविध शहरांमधील कला महोत्सवांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या संस्थेने अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रकारांना ‘पब्लिक आर्ट’ प्रकारात काम करण्याची उमेद दिली.
शहरांपासून ते खेड्यापाड्यांमध्ये दिसणाऱ्या हाताने रंगवलेल्या जाहिरातींच्या पाट्या, ज्यूस सेंटर, लेडीज टेलरच्या दुकानाबाहेर लावलेल्या पाट्या म्हणा… यांच्या आकारांमध्ये असलेली शिस्त ही त्या-त्या पेंटरने घडवलेली आहे. म्हणजे जणू एकेका पेंटरने हाती रंगवलेला एकेक टंक किंवा फॉण्ट घडवलेला आहे, असा मुद्दा मांडत हनीफ यांनी ‘हॅण्डपेन्टेडफॉण्ट्स.कॉम’ हे नवीन संकेतस्थळ सुरु केले. हे संकेतस्थळ सध्या बंद आहे, पण इथे ‘पेंटर किशोर’ किेंवा पेंटर अमुकतमुक अशा नावांचे फॉण्ट मात्र उपलब्ध होतात.
बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला विभागातील पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली होती. पण ग्राफिटीची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे ते सुरुवातीला दिल्लीतल्या एका अमेरिकी जाहिरात कंपनीत कार्यरत होते. अचानक ‘डाकू’ या टोपण नावाने भित्तिरंजनकला दिसू लागली आणि त्या क्षेत्रातही चित्रकारांसाठीच्या अनेक फेलोशिपा मिळवून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली. पण ‘डाकू’ म्हणजे नक्की कोण हे गुपितच राहिले आहे. गुजरातमधील तलाजा या आडगावात जन्मलेल्या हनीफ यांच्या उत्कर्षानंतरचा, त्यांच्या कलाविषयक भूमिकांचा कस लागण्याचा काळ सुरू होण्याच्या आतच त्यांचे निधन झाले.