आरोग्यदायी फराळासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि स्वादिष्ट फराळाचा काळ. पूर्वी मोठ्या कुटुंबात सगळे मिळून फराळ बनवायचे. आज मात्र छोटे कुटुंब, नोकरी करणारे जोडपे आणि शाळांच्या कमी सुट्ट्या यामुळे वेळेअभावी बाहेरून फराळ आणण्याचे प्रमाण वाढले आहे. पण बाहेरचा फराळ अनेकदा कमी प्रतीचे तेल, कृत्रिम रंग आणि साखर यांच्या अतिवापरामुळे आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. त्यासाठी घरच्या घरी आरोग्यदायी फराळ करावा, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी केले आहे.

घरी बनवलेला फराळ केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिकही असतो. चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ वापरून, सगळ्यांच्या मदतीने दोन तरी पदार्थ घरी केले तरी दिवाळीची मजा वाढते. या दिवाळीत आरोग्याची काळजी घेत नैसर्गिक, घरगुती आणि संतुलित फराळ बनवा कारण खरी गोडी घरच्या फराळाच्या हातात असते.

याबाबत आहारतज्ज्ञ कस्तुरी भोसले म्हणतात, "आजकाल वजनाची व मधुमेहाची समस्या सर्वांनाच भेडसावते. त्यामुळे साखरेऐवजी (अरासायनिक) गूळ, खजूर, खारीक यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ वापरणे योग्य आहे, तसेच तळलेल्या पदाथएिवजी ओव्हनमध्ये भाजलेला चिवडा, शंकरपाळी बनवता येतात. अर्थात, असे केले तरी हे पदार्थ कमी प्रमाणात खाणेच योग्य ठरेल. थंडीसाठी फक्त फराळच फायद्याचा नाही तर स्निग्धतायुक्त पारंपरिक तीळ, शेंगदाणे, बदाम यांचा समावेश केल्यास शरीराला ऊर्जा, जिभेला चव आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात."

या टिप्स फॉलो करा

तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी ठेवा: शंकरपाळी, चकली, लाडू हे तळलेले पदार्थ प्रमाणात खा. शक्यतो भाजून किंवा एअर फ्रायरमध्ये बनवा, शेंगदाणा, तिळाचे किंवा सूर्यफुलाचे तेल वापरा. ट्रान्सफॅट असलेले रिफाइंड तेल शक्यतो टाळा.

साखरेऐवजी इतर पर्याय: साखरेऐवजी गूळ, खजूर, मध यांचा वापर करा. हे नैसर्गिक गोडवा देतात आणि पौष्टिकही असतात. फराळात बदाम, काजू, अक्रोड, मनुका यांचा समावेश केल्याने फराळातील प्रथिने आणि फायबर वाढते.

धान्याचे विविध प्रकार वापरा: मैद्याऐवजी गहू, ज्वारी, बाजरीचे पीठ वापरा. त्यामुळे फराळ जास्त पचणारा आणि पौष्टिक होतो. मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवा. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे फराळातील मीठ कमी वापरा.

फराळ प्रमाणात घ्या: गोड किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्या. पदार्थ पौष्टिक असले तरी प्रमाणात खाणे गरजेचे आहे, अन्यथा वजन वाढू शकते.