'जागतिक एड्स दिना'च्या (World AIDS Day 2025) पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. एचआयव्ही आणि एड्स विरोधातील लढ्यात भारताने मोठी मजल मारली आहे. सरकारने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१० ते २०२४ या काळात भारतात दरवर्षी आढळणाऱ्या नव्या एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत ४८.७ टक्के घट झाली आहे.
तसेच, एड्सशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८१.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. याशिवाय, गरोदर आईकडून बाळाला होणारा संसर्ग रोखण्यातही मोठे यश मिळाले असून, त्यात ७४.६ टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
जागतिक सरासरीपेक्षा कामगिरी उत्तम
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 'राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमा'च्या (National AIDS Control Programme) सध्याच्या टप्प्यात भारताने भरीव प्रगती केली आहे. हे परिणाम जागतिक सरासरीपेक्षा खूपच चांगले आहेत. भारताचे नेतृत्व, देशांतर्गत गुंतवणूक आणि पुराव्यांवर आधारित धोरणांमुळे हे शक्य झाले आहे.
तपासणी आणि उपचारात वाढ
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, तपासणी आणि उपचारांचा वेगही वाढला आहे:
एचआयव्ही चाचण्या: २०२०-२१ मध्ये ४.१३ कोटी चाचण्या झाल्या होत्या. २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून ६.६२ कोटी झाली आहे.
उपचार: अँटी रेट्रोव्हायरल उपचार (ART) घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४.९४ लाखांवरून वाढून १८.६० लाख झाली आहे.
व्हायरल लोड टेस्टिंग: याच काळात व्हायरल लोड चाचण्यांचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले असून, ते ८.९० लाखांवरून १५.९८ लाखांवर पोहोचले आहे.
विज्ञान भवनात मुख्य कार्यक्रम
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा सोमवारी (२ डिसेंबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. 'नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन' (NACO) द्वारे आयोजित या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात एचआयव्ही प्रतिबंध, उपचार, काळजी आणि या आजाराशी जोडलेला कलंक (stigma) मिटवण्यासाठी सरकारची कटिबद्धता पुन्हा व्यक्त केली जाईल. यामध्ये सरकारी नेते, विकास भागीदार, तरुण प्रतिनिधी आणि एचआयव्हीसह जगणारे लोक (PLHIV) सहभागी होतील.
जनजागृतीसाठी विशेष मोहीम
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात तरुणांकडून एक 'फ्लॅश परफॉर्मन्स' सादर केला जाईल. त्याद्वारे जागरूकता आणि जबाबदार वागणुकीचे महत्त्व पटवून दिले जाईल.
तसेच, एका प्रदर्शनचे उद्घाटन केले जाईल. यात डिजिटल नवकल्पना आणि कार्यक्रमाची यशोगाथा मांडली जाईल. लाभार्थ्यांचे अनुभव आणि दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे (Audio-visual presentation) भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे NACO च्या नवीन मोहिमेतील व्हिडिओ मालिकेचे अनावरण. ही मालिका तीन मुख्य स्तंभांवर आधारित असेल:
१. तरुण आणि जागरूकता
२. आईकडून बाळाला होणारा संसर्ग पूर्णपणे थांबवणे (Elimination of Vertical Transmission)
३. कलंक आणि भेदभाव मिटवणे