थंडीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी थंडीमध्ये शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते. याच पार्श्वभूमीवर सुकामेवा घेण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात ग्राहकांकडून काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, खारीक, खोबरे, मनुका आणि इतर सुकामेवा पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने सकस आहारावर विशेष भर दिला जात आहे. हिवाळा हा आरोग्यदायी महिना असल्याचे मानले जाते. हिवाळ्यात भूक वाढते, त्यामुळे अर्थातच शरीराच्या पोषणकाळ म्हणून हिवाळ्याकडे पाहिले जाते. पावसाळ्यात भूक कमी होते, तो हिवाळा सुरू झाला की वाढते. या काळात पौष्टिक आहार सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते. आरोग्य चांगले राहावे म्हणून अनेकजण हिवाळ्यात सुकामेव्याचे सेवन करतात, त्यामुळे हिवाळ्यात बहुतांश घरांमध्ये सुकामेवा आणला जातो.
सुकामेवा कधी, कसा खावा...
आहारातील कोणताही घटक सेवन करताना तो कोणत्या वेळी खाल्ला जातो, हेही महत्त्वाचे असते. सुकामेवाही याला अपवाद नाही. तज्ज्ञांच्या मते, शरीराला सुकामेव्याचा सर्वाधिक फायदा मिळण्यासाठी तो भिजवून खाणे योग्य ठरते. सुकामेवा रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते आणि त्याचे आरोग्यदायी फायदे अधिक मिळतात.
वैद्यकीय अधिकारी आकाश राठोड म्हणाले की, "सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ''सी', व्हिटॅमिन 'ई', झिंक यांसारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. याशिवाय शरीरात ऊर्जा आणि सामर्थ्य टिकून राहते. हिवाळ्यात दररोज ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे."
दर वाढलेलेच
केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याने यंदा वस्तू व सेवाकरा कपात झाली असली तरी सुकामेव्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. अनेक वस्तू स्वस्त झाल्या असून सुक्यामेव्याचे दर काहीसे कमी होतील अशी ग्राहकांना आशा होती, परंतु दरात कुठलाही बदल झालेला नाही. हिवाळ्याचा कडाका वाढताच नागरिक सुकामेव्यापासून बनणाऱ्या खाद्यपदार्थांकडे वळू लागले आहेत. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्याला या दिवसांत मोठी मागणी आहे.
सुकामेवा विक्रेते फिरोज अत्तार म्हणाले की, "आरोग्यासाठी हिवाळा अधिक पोषक मानला जातो. हिवाळ्यात भूक वाढते, त्यामुळे शरीराचा 'पोषणकाळ' म्हणून हिवाळ्याकडे बघितले जाते. त्यामुळे घरोघरी पौष्टिक लाडूंसाठी सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे. यंदा मात्र गतवर्षपिक्षा सर्वच सुक्यामेव्याचे भाव काहीसे वाढले आहेत. तरीही सुकामेव्याला बाजारात चांगली मागणी आहे."