"मधुमेह ही शांतपणे शरीर पोखरणारी साथ आहे," अशी धोक्याची सूचना अमेरिकेतील एका 'दाऊदी बोहरा' डॉक्टरांनी दिली आहे. नोव्हेंबर हा 'मधुमेह जनजागृती महिना' म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने अमेरिकेतील दाऊदी बोहरा समाजाने आरोग्याची मशाल हाती घेतली आहे. विशेषतः दक्षिण आशियाई लोकांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त असल्याने, समाजाने आपल्या आरोग्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आहेत.
जागरूकता हे सर्वात मोठे शस्त्र
या मोहिमेत सहभागी झालेल्या डॉक्टरांनी सांगितले, "आरोग्याबद्दलची समज वाढवणे, वेळेवर तपासणी करणे आणि जीवनशैलीत बदल करणे हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे."
दाऊदी बोहरा समाजाची जागतिक सेवाभावी संस्था, 'प्रोजेक्ट राईज' च्या माध्यमातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम राबवण्यात आली. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये वॉकिंग इव्हेंट्स, आहार मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि जनजागृती कार्यक्रम झाले. जागतिक आरोग्य संघटनेने मधुमेहाला वेगाने वाढणारे संकट म्हटले आहे. अशा वेळी बोहरा समाजाचा हा पुढाकार दिशादर्शक ठरतो.
'प्रोजेक्ट राईज'ची झेप
या मोहिमेने केवळ माहिती देण्यावर थांबून चालणार नाही, तर कृतीही केली पाहिजे हे अधोरेखित केले. अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या (ADA) आकडेवारीनुसार, ३.८ कोटी अमेरिकन लोकांना मधुमेह आहे. धक्कादायक म्हणजे ९.७ कोटी लोक 'प्री-डायबेटिस'च्या टप्प्यावर आहेत आणि त्यातील ८० टक्क्यांना याची कल्पनाही नाही.
बोहरा समाजाने आपल्या स्वयंसेवकांचे जाळे आणि 'कम्युनिटी डायनिंग' (Communal Dining) या उपक्रमाचा खुबीने वापर केला. जागतिक मधुमेह दिनाच्या आठवड्यात, समाजातील प्रत्येक घरी जेवणासोबत आरोग्याचे धडे देणारी एक माहितीपूर्ण चिट्ठीही पाठवण्यात आली.
१५ लाख पावले चालण्याचा डॉक्टरांचा सल्ला
डॅलास-फोर्ट वर्थ भागात, डॉ. नफिसा मोगरी आणि डॉ. हुजेफा व्होरा यांनी फ्रिट्झ पार्कमध्ये जमलेल्या कुटुंबांना मधुमेहाची लक्षणे आणि इन्सुलिनचे कार्य समजावून सांगितले. त्यानंतर उपस्थितांनी पुढील १० दिवसांत मिळून १५,०८,००० पावले चालण्याचा संकल्प सोडला.
कोलीन काउंटीमध्ये, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मुस्तफा दोहदवाला यांनी आहारावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे सांगितले. यावर एका महिलेने प्रतिक्रिया दिली, "आज डॉक्टरांनी सांगितलेल्या छोट्या बदलांमुळे आमचे मोठे नुकसान टळू शकते. मी हे ज्ञान इतरांनाही देईन. आपण एकत्र येऊन नक्कीच निरोगी भविष्य घडवू."
साऊथ एशियन जेवणात बदल
रॅली (Raleigh) येथील समाजाने जॉर्डन लेकच्या परिसरात सकाळी फिरायचा कार्यक्रम ठेवला होता. तिथे बालरोगतज्ज्ञ डॉ. झैनब कयुमी यांनी इन्सुलिनबद्दल माहिती दिली. तर उपस्थितांनी दक्षिण आशियाई जेवणातील पिष्टमय पदार्थ (Carbohydrates) कसे कमी करायचे, यावर गप्पा मारल्या. फिजिकल थेरपिस्ट डॉ. जिब्रान कयुमी यांनी साखरेचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, हे करून दाखवले.
वॉशिंग्टन डीसीमध्ये, आहारतज्ज्ञ अलमास आरसीवाला यांनी भाज्या आणि कडधान्यांचा आहारात समावेश करण्यावर भर दिला. शिकागो, डेट्रॉईट, बोस्टन आणि टँपा या शहरांमध्येही ५ किमी चालणे, मोफत रक्ताची तपासणी आणि महिलांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय शिबिरे पार पडली.
'एसबीएमएए'ची साथ
या मोहिमेला 'सैफी बुरहानी मेडिकल असोसिएशन ऑफ अमेरिका' (SBMAA) च्या सदस्यांची मोलाची साथ मिळाली. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या त्यांच्या वार्षिक परिषदेत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दक्षिण आशियाई रुग्णांच्या समस्यांवर आणि उपायांवर मंथन केले.
बेकर्सफील्डमधील एका समन्वयक महिलेने सांगितले, "मधुमेहाचे नाव ऐकले की भीती वाटते, पण घाबरण्याचे कारण नाही. योग्य शिक्षण, वेळेवर तपासणी आणि चांगल्या सवयींनी आपण त्याला नक्कीच हरवू शकतो."
बोहरा समाजाचा हा लढा इथेच थांबणार नाही. जागरूकता ही केवळ एका दिवसापुरती किंवा महिन्यापुरती मर्यादित नसते, तर ती रोजच्या जगण्याचा भाग असते, हाच संदेश या मोहिमेने दिला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -