मुनीर अहमद मीर : संगीतातून प्रेम आणि सलोख्याचा संदेश देणारा गायक
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 2 d ago
मुनीर अहमद मीर
दानिश अली
काश्मीरची भूमी शतकानुशतके आपली सांस्कृतिक एकात्मता, सुफी परंपरा आणि संगीताच्या मनमोहक वातावरणासाठी ओळखली जाते. येथे अझान, भजन आणि कीर्तनाचे स्वर एकाच वेळी गुंजतात. हा वारसा या भागातील गंगा-जमुनी संस्कृतीचे जिवंत उदाहरण होता. हीच परंपरा जपणारे प्रसिद्ध गायक मुनीर अहमद मीर आज आपल्या सुमधुर आवाजातून प्रेम, भाईचारा आणि माणुसकीचा संदेश पसरवत आहेत.
संगीताला केवळ मनोरंजनाचे साधन न मानता सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकतेचे मजबूत माध्यम बनवणाऱ्या काश्मीरच्या महत्त्वाच्या कलाकारांमध्ये मुनीर अहमद मीर यांचे नाव घेतले जाते. ते अनेक दशकांपासून काश्मिरी, हिंदी आणि पर्शियन भाषांमध्ये गायन करत असून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सुरुवातीचे आयुष्य
मुनीर अहमद मीर यांना संगीताची ओढ लहानपणापासूनच त्यांचे वडील शफी मोहम्मद मीर यांच्याकडून मिळाली. त्यांचे वडील एक नेक माणूस असण्यासोबतच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. लहानपणीच मुनीर आपल्या वडिलांसोबत महफिलींमध्ये जात असत आणि तिथूनच त्यांनी संगीतातील मूलभूत बारकावे शिकले. त्यांच्या कुटुंबात संगीताची आवड पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यांचे आजोबाही संगीताचे शौकीन होते. त्यांच्याकडे सुमारे १२० वर्षे जुने एक प्राचीन हार्मोनीयम होते, जे आजही त्यांच्या घरात सुरक्षित आहे.
त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड फाइन आर्ट्समधून संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. तिथे पंडित पृथ्वी नाथ रैना हे त्यांचे पहिले गुरु होते. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात की, पंडितजींनी कधीही धर्माला ज्ञानाच्या मार्गात अडथळा येऊ दिला नाही. त्यांनी नेहमीच प्रेम आणि आपुलकीने मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, जिथे आदर आणि श्रद्धेने ज्ञान प्राप्त केले जाते, तीच खरी गुरु-शिष्य परंपरा आहे.
कलाप्रवासातील यश
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मुनीर अहमद मीर यांनी गुलाम हसन सुफी, राज बेगम, नसीमा अख्तर, शम्मा देवी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. या कलाकारांसोबत समूह गायन करताना त्यांनी संगीतातील बारकावे आत्मसात केले आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. पुढे त्यांना पंडित भजन सोपोरी यांच्यासारख्या मोठ्या गुरूंचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मुनीर यांना संगीत रचना आणि तंत्राचे शिक्षण दिले.
त्यांच्या कलासेवेची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वर्ष २०२३ मध्ये त्यांना हारमनी अवॉर्ड देण्यात आला, तर २०२४ मध्येही त्यांना राज्य स्तरावर मोठा सन्मान मिळाला. याशिवाय सोपोरी अकॅडमी ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्येही त्यांचा गौरव करण्यात आला. अर्थात, पुरस्कारांपेक्षा लोकांचे प्रेम आणि दाद जास्त महत्त्वाची असल्याचे ते मानतात. एका कलाकारासाठी श्रोत्यांची उपस्थिती अत्यंत आवश्यक असते, कारण टाळ्यांचा कडकडाटच त्याच्या कलेत जीव भरतो आणि त्याला अधिक चांगले सादरीकरण करण्याचा हसत देतो.
काश्मीरचे बदलणारे स्वरूप आणि संगीताची भूमिका
काश्मीरच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना मुनीर अहमद मीर म्हणतात की, एक काळ असा होता जेव्हा येथे धार्मिक सलोखा शिखरावर होता आणि सर्वत्र प्रेमाचे वातावरण होते. मात्र, काळासोबत या वातावरणावर परिणाम झाला. त्यांच्या मते, आता ती जुनी परंपरा पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे जेणेकरून लोक एकमेकांच्या जवळ येऊ शकतील.
धार्मिक आणि सांस्कृतिक सलोख्याला चालना देण्यासाठी काश्मीरमधील जुनी मंदिरे पुन्हा उघडावीत आणि त्यांची दुरुस्ती करावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. अलीकडच्या काळात या दिशेने काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत आणि विविध धर्माचे लोक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एकत्र सहभागी होत आहेत, ही एक चांगली सुरुवात असल्याचे त्यांनी आनंदाने नमूद केले.
नवी पिढी आणि संदेश
संगीतातील बदलत्या प्रवाहावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, पूर्वीचे संगीत अधिक टिकाऊ आणि आत्म्याला शांती देणारे असायचे. याउलट आजचे संगीत तात्पुरते झाले असून ते लवकर विसरले जाते. नवीन पिढीने आपल्या पारंपरिक संगीताचा अभ्यास करावा आणि त्याची कदर करावी, कारण तीच त्यांची खरी ओळख आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या संस्थांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. पूर्वी या संस्था नवीन कलाकारांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देत असत, ज्यामुळे मोठे कलाकार घडले. मात्र, आज ही व्यवस्था कमकुवत झाल्यामुळे नवीन कलाकारांना पूर्वीसारख्या संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शेवटी, मुनीर अहमद मीर यांनी आपल्या गुरूंना अभिवादन करताना सांगितले की, त्यांनी जे काही मिळवले आहे ते केवळ त्यांच्या गुरूंमुळेच शक्य झाले आहे. संगीत ही अशी शक्ती आहे जी मानवातील द्वेष संपवून प्रेमाला प्रोत्साहन देते आणि हेच संगीताचे खरे उद्दिष्ट असायला हवे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -