'गॉड पार्टीकल' शोधणारे पीटर हिग्स यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
नोबेल विजेते वैज्ञानिक पीटर हिग्स
नोबेल विजेते वैज्ञानिक पीटर हिग्स

 

जगप्रसिद्ध वैज्ञानिक पीटर हिग्स यांचं सोमवारी निधन झालं. 'गॉड पार्टिकल'च्या शोधासाठी पीटर यांना ओळखलं जातं. तसंच 'बिग बँग'नंतर सृष्टीची रचना कशा प्रकारे झाली याबाबत देखील त्यांनी भरीव संशोधन केलं होतं. हिग्स-बोसोन या थिअरीसाठी त्यांचा नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 

एडिनबर्ग विद्यापीठाने मंगळवारी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली. अल्पशा आजारामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते या विद्यापीठात एमिरेट्स प्रोफेसर होते. हिग्स हे एक महान शिक्षक, मेंटॉर आणि तरुण वैज्ञानिकांच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित करणारे शास्त्रज्ञ होते असं विद्यापीठाने म्हटलं आहे.

हिग्स यांचं संशोधन ऐतिहासिक
भौतिकशास्त्रामध्ये हिग्स यांचं योगदान हे अनन्यसाधारण आहे. विश्वाला द्रव्यमान कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी संशोधन केलं. यातूनच त्यांनी विश्वातील काही मोठ्या रहस्यांपैकी एकाचा उलगडा केला. यामुळे हिग्स यांना अल्बर्ट आईनस्टाईन आणि मॅक्स प्लँक यांच्या बरोबरीचं स्थान मिळालं.

गॉड पार्टिकलचा शोध
पीटर हिग्स यांनी बेल्जियन वैज्ञानिक फ्रँक्वा एंगलर्ट यांच्यासोबत मिळून १९६४ सालीच गॉड पार्टिकल, किंवा "दैवी कण" याबाबतचा सिद्धांत मांडला होता. याच्या जवळपास पाच दशकांनंतर युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (सर्न) येथील लार्ज हॅड्रॉन कोलाइडर येथे झालेल्या प्रयोगांने त्यांच्या सिद्धांताची पुष्टी केली. यासाठी या दोघांना २०१३ साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.