क्षयरोगावरील संशोधनात महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. सय्यद हसनैन

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
डॉ. सय्यद हसनैन
डॉ. सय्यद हसनैन

 

जगभरातील आढळणाऱ्या क्षयरोग रुग्णांपैकी २६% पेक्षा जास्त रुग्ण भारतात आढळून येतात. जगातील एकूण रुग्णांच्या एक चतुर्थांश रुग्ण भारतात आढळून येतात. याचा नायनाट करण्यासाठी भारताने २०२५ पर्यंतचे लक्ष ठेवले आहे. हे लक्ष साध्य करायचे झाल्यास अशा रोगाचे योग्य निदान आणि उपचार होणे गरजेचे आहे. या वाटेने पद्मश्री सय्यद एहतेशाम हसनैन हे संशोधन करत आहेत. 
 
‘आवाज द व्हॉईस’या माध्यमाने त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. त्यातून ते करत असलेल्या कामाचा आवाका आणि इतर अनेक बाबींची माहिती घेता आली. त्यावर आधारित हा लेख…

सध्या सय्यद एहतेशाम हसनैन हे चर्चेत असण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारत सरकारने घेतलेले दोन-तीन धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या संशोधनावर आधारित आहेत. पूर्वीची क्षयरोगाची (टी. बी.) चाचणी प्रतिपिंड-प्रतिजन (antibodies and antigen) यांवर आधारित होती. मात्र त्यानंतर सय्यद एहतेशाम हसनैन यांनी भारतात सिक्वेन्सिंग केले तर त्यांच्या असे लक्षातआले की भारतातील  सिक्वेन्सिंग इतर देशांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे आहे. परिणामी, टीबीच्या चाचणीचे चुकीचे निकष येऊ शकतात. याचा सखोल अभ्यास करून त्यांनी यासंबंधीचे निरीक्षणे प्रकाशित करून आय. सी. एम. आर. च्या महासंचालकांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी परदेशी किटवर आधारित या चाचण्यांवर वैज्ञानिक कारणांमुळे बंदी घालावी अशी सरकारला शिफारस केली .

हसनैन यांच्याविषयी थोडंस…
भारत स्वातंत्र्यानंतर अवघ्या ७ वर्षांनी १९५४ मध्ये बिहारमधील गया येथे हसनैन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे आपल्या मुलांना परिसरातील सर्वोत्तम शाळेत पाठवण्यासाठी ते आग्रही होते. आपल्या पगारीचा २० टक्के भाग ते मुलांच्या शिक्षणावर खर्च करत. अशातच सय्यद एहतेशाम यांना बाहेर देशात जाऊन शिकण्याची इच्छा होती. पण आर्थिक अडचणीमुळे ते शक्य नव्हते. याच परिस्थितीत त्यांनी १९७५ मध्ये मगध विद्यापीठ, बोधगया येथून B.Sc (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते परदेशात जाऊ शकले नसले तरी ते एम. एस. सी. साठी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेले. हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, परंतु पदवी घेतली नाही.

त्यानंतर १९८१ मध्ये  हसनैन हे पोस्ट-डॉक्टरल फेलो (पीडीएफ) म्हणून कॅनडाला गेले आणि पुढील सहा वर्षे ते कॅनडा किंवा अमेरिकेत कार्यरत राहिले.  त्यानंतर हसनैन यांनी भारतात परत येऊन आपल्या लोकांसाठी काहीतरी कराव या आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर ते भारतात परतले. भारतात परतण्यापूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ग्रीन कार्ड बनवून घेण्याचा सल्ला दिला पण त्यांनी साफ नकार दिला.

या नकारामागचे कारण सांगताना हसनैन म्हणतात, "मला ग्रीन कार्ड मिळताच माझ्याकडे प्लॅन बी नावाचा पर्याय तयार होतो आणि  मला प्लॅन बी नको होता. मला फक्त ‘प्लन ए’ हवा होता.  मी भारतात काम करून इथेच काहीतरी चांगले करेल”.

पुढे १९८७ मध्ये हसनैन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी (एन. आय. आय.) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. रुजू झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम परदेशात करत असलेले संशोधन बंद करून भारतात नव्याने संशोधनाला  सुरुवात केली आणि लवकरच बॅक्युलोव्हायरस संशोधनात स्वतःचे नाव कमावले. याशिवाय त्यांनी भारतात प्रथमच बॅकुल व्हायरस कीटक पेशी अभिव्यक्ती प्रणाली (बी. ई. व्ही. एस.) ची स्थापना केली. ज्याद्वारे परदेशी जीनबद्दल अधिक माहिती मिळवून त्या संबंधित पडणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर काम करता येईल. वैज्ञानिक क्षेत्रात भारताला एक शक्तीशाली बनवण्याचा त्यांचा निर्धार होता. 

पुढे हसनैन स्पष्ट करतात की, जेव्हा ते बॅक्युलोव्हायरसवरील संशोधनात शिखरावर होते, त्यावेळी एक दिवशी एन. आय. आय. चे तत्कालीन संचालक डॉ. सय्यद तुम्ही यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते असे की, “तुम्ही तुमचे संशोधन चांगल्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित करत आहात, ते सर्व ठीक आहे, परंतु मानवतेला याचा काय फायदा होतोय? यातून भारताला काय मिळते? तुमच्या संशोधन पेपरचा  सामान्य माणसाला काय फायदा होत आहे? संशोधन करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु असे काहीतरी करा ज्यामुळे सामान्य माणसाला फायदा होईल.”

आणि हा हसनैन यांच्या जीवनातील  एक निर्णायक टप्पा ठरला. त्यावेळी त्यांनी असे काहीतरी करण्याचे ठरवले ज्याचा समाजजीवनावर थेट परिणाम होईल आणि त्यानंतर सुरु झाले क्षयरोगाबाबत संशोधन!

हसनैन यांनी  लगेचच टी. बी. च्या अनुवंशशास्त्र आणि बहु-औषध प्रतिरोधक (एम. डी. आर.) एम. ट्युबरक्युलोसिस (एम. ट्युबरक्युलोसिस) संबंधित बाबींवर अभ्यास करायला सुरुवात केली.  त्यानंतर औषध प्रतिरोधनासाठी टी. बी. ची चाचणी करणे हे त्यांनी प्रकाशित केलेले दुसरे महत्त्वाचे निरीक्षण होते. हे जगात प्रथमच घडत होते. प्रतिकारासाठी प्रत्येक औषधाच्या विरूद्ध जीवाणूंची चाचणी केली गेली. त्यांनी त्यांच्या  अभ्यासातून हे गोष्ट दाखवून दिली की जर एखादा जीवाणू एका औषधाचा प्रतिरोधक असेल तर तो जवळजवळ इतर सर्व औषधांचा प्रतिरोधक असेल.

यातून त्यांनी औषध आणि बहु-औषध प्रतिरोधक चाचण्या यांतील परस्परसंबंध आहे हे स्थापित केले. यातून असा  निष्कर्ष काढला कि  सर्व औषधांसाठी बहु-औषध प्रतिरोधक चाचण्या करण्याची गरज नाही. फक्त औषध रिफॅम्पिसिनची चाचणी करा आणि  याची पुष्टी झाली तर ९५-९९ टक्के औषधे जीवाणू प्रतिरोधक असतील. आणि आता जगभरात हे एक मानक बनले आहे. क्षयरोगाचे निदान करण्यासाठी स्वस्त पद्धती विकसित करण्यावर ते अजूनही काम करत आहेत.

यासोबतच १९९९-२००५ मध्ये हसनैन यांनी सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स (सी. डी. एफ. डी.) हैदराबादचे पहिले संस्थापक-संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००५-२०११ दरम्यान त्यांनी हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले आणि सध्या आयआयटी-दिल्ली येथे जैवरासायनिक अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान विभागात एसईआरबीचे राष्ट्रीय विज्ञान अध्यक्ष आहेत.

हे सर्व काम करत असताना हसनैन फक्त एवढच म्हणतात की, "मेहनतीला पर्याय नाही".

त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळवले. त्यांना जर्मनीचा सर्वोच्च नागरी सन्मान - ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी हा २०१४ मध्ये प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिक नेचरने त्यांना हा पुरस्कार मिळाल्याची नोंद केली, ऑर्डर ऑफ मेरिटसह ते उत्कृष्ट लोकांच्या गटात सामील झाले.

हसनैन यांच्या समवेत नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ पॉल हर्मन मुलर, माजी जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल, जपानचे माजी पंतप्रधान यासुहिरो नाकासोने आणि संगीत संचालक जॉन क्रॉस्बी यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश या यादीत होता. २००६ मध्ये त्यांना त्यांच्या वैज्ञानिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (१९९५  ) आणि J.C. बोस फेलोशिप (२००६) हे विज्ञान क्षेत्रातील दोन सर्वात प्रतिष्ठित भारतीय पुरस्कारही मिळाले आहेत.