पी. टी. उषा, मिथुन चक्रवर्ती, राकेश शर्मा, कपिल देव, विश्वनाथन आनंद
१९८०चे दशक अनेक मोठ्या घटनांनी गाजलेले होते. या काळात इंदिरा गांधी यांची हत्या झाली. ऑपरेशन ब्ल्यू स्टार झाले. याच वर्षात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. सांप्रदायिक दंगल घडली. प्रादेशिक राजकारणाचा उदय झाला आहे. त्यामुळे या स्फोटक दशकातील पाच युवा आदर्शांविषयी लेखातून जाणून घेऊया.
राकेश शर्मा :
१९८०च्या दशकात मुलांना विचारले की, 'मोठं झाल्यावर काय व्हायचे आहे?', तर त्यांचे सर्वात लोकप्रिय उत्तर असायचे, 'मी अंतराळात जाईन.' स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा यांच्या कार्याने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. ते अंतराळात जाणारे पहिले भारतीय आहेत.
१९८१मध्ये युएसएसआर आणि भारताने संयुक्त अंतराळ मोहीम करण्याचे ठरवले. भारतीय हवाई दलाने या कामासाठी सुरुवातीला १५० सर्वोत्तम वैमानिक निवडली. याच दरम्यान अनेक कठीण चाचण्या झाल्या. त्यानंतर अंतराळात जाण्यासाठी दोघांची निवड झाली. विंग कमांडर रवीश मल्होत्रा आणि स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा.
३ एप्रिल १९८४ ला राकेश शर्मा यांनी युरी मालिशेव आणि गेन्नादी स्ट्राकालोव यांच्यासोबत सोयुझ टी-११ मधून सॅल्युट-७ अंतराळ स्थानकासाठी उड्डाण केले. रवीश मल्होत्रा यांना जमिनीवर बॅकअप म्हणून ठेवले होते. हा निर्णय उड्डाणाच्या एक दिवस आधी जाहीर झाला. ४ एप्रिलला सोयुझ टी-११ सॅल्युट-७ ला जोडले गेले, तिथे तीन रशियन अंतराळवीर आधीपासून होते.
शर्मा यांनी कालवण आणि आंबे सोबत नेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी योगा आणि ध्यानाचे प्रयोग केले. हा सर्व अभ्यास करून ते अंतराळात गेले. इंदिरा गांधी यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना, भारत अंतराळातून कसा दिसतो, असं विचारले तेव्हा शर्मा म्हणाले, “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा.”
आठ दिवस अंतराळात घालवून परतल्यानंतर राकेश शर्मा यांचे एखाद्या चित्रपटाच्या नायकासारखे स्वागत झाले होते. त्यावेळी त्यांना अशोक चक्र प्रदान करण्यात आले होते.
पी. टी. उषा :
भारतात वेगाने धावणारी मुलगी अशी पी. टी. उषा यांची ओळख आहे. हे नाव आता भारतीय सांस्कृतिक वारशाचा भाग बनले आहे. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला त्या भारतीय अॅथलेटिक्समध्ये आल्या तेव्हा कोणीही भारतीय खेळाडूंना गांभीर्याने घेत नव्हते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने जिंकणाऱ्या त्या कदाचित पहिल्या होत्या.
१९८५च्या जकार्ता येथील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी ५ सुवर्णपदके जिंकली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील त्यांचा हा विक्रम होता. १९८६ च्या आशियाई स्पर्धेत त्यांनी ४ सुवर्णपदके आणि १९८०च्या दशकात अनेक इतर पदके जिंकली आहेत. १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटरच्या शर्यतीत त्या ५५.४२ सेकंदांसह १/१०० सेकंदाने पदकापासून हुकल्या. सरावात त्यांनी जागतिक विक्रमापेक्षा फक्त १.६८ सेकंद कमी वेळ नोंदवला होता, त्यामुळे त्या सुवर्णपदकाच्या प्रबल दावेदार होत्या.
वयाच्या अगदी २०व्या वर्षीच उषा आंतरराष्ट्रीय स्टार बनल्या होत्या. देशातील तरुण, विशेषतः मुली त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत होत्या.
कपिल देव :
भारत हा क्रिकेटप्रेमी देश आहे. परंतु तरीही भारत १९८०च्या दशकापर्यंत बलाढ्य संघांविरुद्ध सामने जिंकू शकला नव्हता. वेगवान गोलंदाज सामने जिंकतात, असे मानले जायचे आणि नेमके त्यामध्येच भारत मागे राहिला होता. विश्लेषकांचे मत होते की भारतीयांच्या शारीरिक रचनेमुळे ते वेगवान गोलंदाजी करू शकत नाहीत. अशातच १९८०च्या दशकात कपिल देव नावाच्या पंजाबी तरुणाने या सगळ्या समजुतींना आव्हान दिले होते.
हा २० वर्षांचा मुलगा खूप वेगाने गोलंदाजी करत होता आणि खेळाच्या इतरही बाबतीत त्याच्याकडे उत्तम नियंत्रण होते. तो दणकट फलंदाजी करायचा आणि अनेकदा चौकारही मारायचा. त्याच्यामुळे देशाला इम्रान खान, इयान बोथम आणि रिचर्ड हॅडली यांच्या पंक्तीतील जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू मिळाला.
कपिल हे फक्त २४ वर्षांचे असताना त्यांनी १९८३ मध्ये जवळपास अजिंक्य वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला पहिले विश्वचषक मिळवून दिले. यावेळी त्यांनी कर्णधारपद भूषवून ३०३ धावा केल्या आणि १२ बळी घेतले होते. आजही झिम्बाब्वेविरुद्धच्या निर्णायक सामन्यातील त्यांच्या १७५ नाबाद धावांचा डाव क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम डावांपैकी एक मानला जातो.
कपिल देव यांच्यानंतर भारताला अनेक वेगवान गोलंदाज मिळाले. जावगल श्रीनाथ हे कपिल यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांच्यासोबत सामील झाले. आता मात्र भारतीय संघ जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
मिथुन चक्रवर्ती :
उदयपूरमध्ये जेम्स बाँड ऑक्टोपसी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जाण्यापूर्वी, रॉजर मूर यांना विचारले गेले की त्यांना कोणते हिंदी कलाकार माहिती आहेत का? तेव्हा त्यांनी तत्काळ उत्तर दिले, ‘होय...‘मिथुन, तुमचा भारतीय जेम्स बाँड. मी त्याला व्हिडीओमध्ये पाहिले आहे. मला वाटते त्याची शरीरयष्टी चांगली आहे आणि तो माझ्यापेक्षाही देखणा आहे.’
जेम्स बाँड स्टारने १९८२मध्ये केलेले हे विधान मिथुन चक्रवर्ती यांच्या १९८०च्या दशकातील प्रसिद्धी दर्शवते. १९८२च्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने मिथुन आणि बप्पी लहिरी यांना अशा स्टारडमवर नेले जे यापूर्वी भारताने कधीच पाहिले नव्हते. या चित्रपटाने भारताला डिस्कोच्या जगाची ओळख करून दिली आहे. हा चित्रपट परदेशातही प्रचंड गाजला.
१९८० च्या दशकात मिथुन फक्त अभिनेता नव्हता, तर तो युवा आदर्श होता. त्यांनी तरुण भारताचे प्रतिनिधित्व केले, व्यवस्थेविरुद्ध लढले आणि सोबतच नृत्य-संगीतातून आपला देखील आनंद व्यक्त केला.
विश्वनाथन आनंद :
१९८७मध्ये हंगेरियन आंतरराष्ट्रीय मास्टर पीटर लुकाच याला हरवून एका भारतीयाने इतिहासात आपले नाव नोंदवले. १८ वर्षांचे विश्वनाथन आनंद हे पहिले भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले होते. त्याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले होते. १९८३ पासूनच त्यांनी अनेक स्पर्धा सुद्धा जिंकल्या होत्या. त्यांच्या या यशासाठी त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. विश्वनाथन आनंद यांना भारतात व्यावसायिक बुद्धिबळाला लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते. आता बुद्धिबळ घराघरात खेळले जाऊ लागले आहे. १९९० च्या मध्यापर्यंत आनंद भारतातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू होते, त्यानंतर सचिन तेंडूलकरने हा मान मिळवला. विविध उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये ते आयकॉन होते. त्यांचे स्टारडम पुढील तीन दशके तरी कमी झाले नाही.