झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) संस्थापक आणि ८१ वर्षीय नेते शिबू सोरेन यांचे आज सकाळी दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयात निधन झाले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. दीड महिन्यापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. गेल्या एका महिन्यापासून ते जीवनरक्षक यंत्रणेवर होते.
त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’वर त्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी लिहिले की, “आदरणीय दिशोम गुरुजी आम्हा सर्वांना सोडून गेले. आज मी शून्य झालो आहे.”
रुग्णालयाच्या निवेदनानुसार, शिबू सोरेन यांना आज सकाळी ८:५६ वाजता मृत घोषित करण्यात आले. शिबू सोरेन यांना दीड महिन्यापूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यांच्यावर नेफ्रॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. ए.के. भल्ला आणि न्यूरॉलॉजी तसेच आयसीयूच्या टीमकडून उपचार सुरू होते. १९ जूनला त्यांना रांचीहून दिल्लीच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते.
११ जानेवारी १९४४ मध्ये एकत्रित बिहारमधील, आजच्या झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील नेमरा गावात शिबू सोरेन यांचा जन्म झाला. त्यांनी सावकारीच्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला. त्या काळात सावकारी इतकी बोकाळली होती की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा फक्त एक तृतीयांश मिळायचा, बाकी सावकार घेऊन जायचे. या आदिवासी नेत्याने सावकारीविरुद्ध आवाज उठवला आणि त्या काळच्या सामाजिक रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांचा प्रभाव शेजारील ओडिशा आणि पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला. झारखंडच्या स्वतंत्र राज्यासाठी लढण्याचं श्रेयही त्यांना दिलं जातं. शिबू सोरेन यांनी १९७२ मध्ये डाव्या विचारसरणीचे कामगार नेते ए.के. रॉय आणि कुर्मी-महतो नेते बिनोद बिहारी महतो यांच्यासोबत मिळून झामुमोची स्थापना केली. त्या वेळी महतो हे पक्षाचे अध्यक्ष झाले, तर शिबू सोरेन सरचिटणीस बनले.
१९८० च्या दशकात हे तिघे वेगळे झाले आणि झामुमोचे नेतृत्व शिबू सोरेन यांच्याकडे आले. शिबू सोरेन यांनी एप्रिल २०२५ पर्यंत पक्षाच्या सर्वोच्च पदावर काम केलं. बिघडत्या प्रकृतीमुळे त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांची झामुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. ४ फेब्रुवारी १९७२ ला धनबादच्या गोल्फ ग्राउंडवर रॅली घेऊन झामुमोची पायाभरणी झाली. या रॅलीत स्वतंत्र झारखंड राज्याची मागणी पुढे आली.
१९७७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, १९८० मध्ये त्यांनी दुमका मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांनी १९८९, १९९१, १९९६, २००२, २००४, २००९ आणि २०१४ मध्येही दुमकातून लोकसभा निवडणुका जिंकल्या.
शिबू सोरेन यांनी २ मार्च २००५ मध्ये झारखंडच्या तिसऱ्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली, पण त्यांचा कार्यकाळ फक्त १० दिवस टिकला. २००८ मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. हा कार्यकाळ ४ महिने २२ दिवस चालला. तिसऱ्यांदा त्यांनी ३० डिसेंबर २००९ ते ३१ मे २०१० पर्यंत मुख्यमंत्रिपद भूषवले.
गेल्या साडेतीन दशकांत सोरेन कुटुंब झामुमो साठी अपरिहार्य ठरलं आहे. १५ नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड स्वतंत्र राज्य बनलं. तेव्हापासून झामुमोने पाच वेळा सत्ता मिळवली आणि प्रत्येक वेळी मुख्यमंत्री सोरेन कुटुंबातीलच होता. शिबू सोरेन २००२ मध्ये काही काळ राज्यसभेचे सदस्य होते.
२००४ मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी कोळसा मंत्री म्हणून काम केले. त्यांचा राष्ट्रीय राजकारणात मोठा प्रभाव होता.
त्यांच्याशिवाय झारखंडच्या निर्मितीचा मुद्दा दिल्लीपर्यंत पोहोचला नसता. १९९४ मध्ये त्यांच्या खासगी सचिव शशिनाथ झा यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. २८ नोव्हेंबर २००६ मध्ये दिल्लीच्या न्यायालयाने त्यांना आणि इतर चार जणांना अपहरण आणि हत्येसाठी दोषी ठरवलं आणि ५ डिसेंबर २००६ ला त्यांना शिक्षा जाहीर झाली.
मात्र, २६ एप्रिल २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शिबू सोरेन यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या पश्चात पत्नी रूपी सोरेन, दोन पुत्र हेमंत सोरेन, बसंत सोरेन आणि कन्या अंजली सोरेन आहेत. त्यांचा मोठा मुलगा दुर्गा सोरेन यांचे २००९ मध्ये निधन झाले.
झारखंड सरकारने सोमवार (४ ऑगस्ट) ते बुधवार (६ ऑगस्ट) पर्यंत तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. या काळात राज्यात सर्वत्र राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरलेला असेल. कोणताही राजकीय समारंभ आयोजित केला जाणार नाही. राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांना या तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.