सर सय्यद यांच्या योगदानाचा विसर पडायला नको म्हणून...

Story by  Shamsuddin Tamboli | Published by  sameer shaikh • 6 Months ago
सर सय्यद अहमद खान
सर सय्यद अहमद खान

 

मुस्लीम समाज प्रबोधनाच्या श्रेय नामावलीत अग्रभागी असणारे सर सय्यद अहमद खान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८१७ रोजी झाला. आज त्यांची २०६वी जयंती आहे. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांच्या कार्यकाळाच्या आसपासचे व मुस्लीम समाज प्रबोधनाच्या इतिहासात वेगळा ठसा उमटविताना धर्मवाद्यांचे लक्ष्य ठरलेले सर सय्यद अहमद खान यांचे व्यक्तित्व आणि योगदान यांचा जागर होणे आवश्यक आहे.
 
सर सय्यद यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही महत्त्वाची वाटते. विशेषतः त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे स्मरण आणि त्यातून बोध घेण्याची गरज मुस्लीम नेतृत्वाला आहे. भविष्य आणि वर्तमान काळ घडवण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांच्या कार्याचे, विचारांचे चिंतन योग्य पद्धतीने केले गेले नाही याची किंमत मुस्लीम समाज आजही फेडताना दिसतोय. मुस्लीम समाजाची आजची सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक दुरावस्था बाजूला करण्यासाठी समाज नेतृत्वाने सर सय्यद अहमद खान यांना पुनर्भेट देऊन प्रेरणा घेतली पाहिजे.
 

प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुहा यांचे 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' अर्थात आधुनिक भारताचे शिल्पकार पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झाले. यात आधुनिक भारतावर प्रभाव टाकणाऱ्या एकवीस विचारवंताचा समावेश केला आहे. यात फक्त तीन मुस्लीम विचारवंत नोंदवले आहेत, सर सय्यद अहमद खान, बॅ. मोहंमद अली जीना आणि हमीद दलवाई, डॉ. गुहा यांनी त्यांना अनुक्रमे आधुनिकतवादी मुस्लीम, विभक्तवादी मुस्लीम आणि शेवटचे आधुनिकतावादी असे संबोधले आहे.

सर सय्यद अहमद खान यांचा जन्म उत्तरेतील अश्रफ (उच्चवर्गीय) राजघराण्यातील असल्यामुळे तो वैचारिक वारसा त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रतिबिंबित होतो. त्यांचे आजोबा मुघल साम्राज्यातील एक प्रधानमंत्री होते. त्या अर्थाने हे कुटुंब फार परंपरावादी नव्हते. या घराण्याने अनेक गायक-संगीतकार, गणितज्ज्ञ यांना आश्रय दिला होता. कुटुंबात पाश्चिमात्य संस्कृती नांदत होती. खान यांचे प्राथमिक शिक्षण घरातच झाले. त्यांच्या आईने आणि महिला शिक्षिकेने त्यांना शिकवले. नंतर त्यांनी पारंपरिक शाळेतून ऊर्दू, अरबी, पार्शियन व इतर भाषांवर प्रभुत्व मिळवले.  वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. कुटुंबियांना हे रुचले नव्हते. 

राजघराण्यातील सर सय्यद यांना भारताचे भविष्य काय असणार आहे याचे अचूक आकलन झाले होते. त्याचसाठी त्यांनी ही नोकरी धरली आणि साध्या लिपिकापासून ते उत्तर भारतातील प्रमुख शहरांचे न्यायाधीशअसा मोठा पल्ला त्यांनी गाठला. राजा राममोहन रॉय यांच्या प्रमाणेच त्यांनी विविध भाषांमध्ये पुस्तके लिहिली. त्यांचे उर्दूतील पहिले पुस्तक 'दिल्लीच्या पुराणवास्तुशास्त्राचा इतिहास' होते. नंतर त्यांनी इतर अनेक विषयांवर महत्त्वाची पुस्तके लिहिली -प्रकाशित केली. त्यापैकी १८५७ च्या उठावाची कारणे शोधणारे त्यांचे पुस्तकही महत्त्वाचे आहे.

मुस्लीम समाजाने आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा. आधुनिक इंग्रजी शिक्षणातूनच मुस्लीम समाजाची प्रगती होईल आणि समाजाला प्रतिष्ठा मिळेल असा सर सय्यद अहमद खान यांचा आग्रह होता.  ब्रिटिशांनी देऊ केलेल्या प्रशासनातील नोकरीच्या संधीचा फायदा मुस्लीमांनी घ्यावा व त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अवगत करावी, असा संदेश ते पुन्हा-पुन्हा देत होते.
 
आधुनिक शिक्षणाच्या प्रसारासाठीच त्यांनी १८६४ मध्ये 'सायंटिफिक सोसायटी फॉर मुस्लीम'ची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थांमध्ये आधुनिक इतिहास, विज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र  यांच्याबरोबरच इंग्रजीचा अभ्यासक्रमही शिकवला जावू लागला. नंतर या सोसायटीने आधुनिक विचारांच्या प्रचारार्थं नियतकालिक काढले. सर सय्यद हे स्वतः त्याचे संपादक होते.

सर सय्यद यांची अशी धारणा होती की, मुस्लीम समाजाचे कल्याण हे दोन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. त्यातील पहिला घटक म्हणजे मुस्लीम समाजाने आधुनिक पाश्चिमात्य शिक्षणाचा अंगीकार करावा आणि दुसरा भाग म्हणजे प्रशासनातील नोकरीचे महत्त्व समजून घेऊन ऐहिक उन्नती करावी. मुस्लीम समाजाने जर हे स्वीकारले नाही तर ते प्रवाहातून बाहेर फेकले जातील, प्रगती व प्रतिष्ठाही गमावतील असा इशारा त्यांनी दिला होता. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच त्यांनी मुस्लीम समाजाला ही कल्पना दिली होती की 'मुस्लीम समाजाने पारंपरिक शिक्षण बाजूला सारून आधुनिक शिक्षण घेतले नाही व शासकीय नोकऱ्यांची संधी घेतली नाही तर मोठी अवनती होईल. 

मुस्लीम समाजाची स्थिती भारतातील मागास जातीपेक्षाही मागास होईल आणि हा समाज इतका अपमानित होईल की पुन्हा यांना स्वाभिमानाने, सन्मानाने डोके वर काढता येणार नाही.' मुस्लीम समाजाने सर सय्यद यांच्या निर्देशाकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली. परंपरावादी समाजात आधुनिकतेचा शिरकाव होऊ दिला नाही, उलट सर सय्यद यानांच 'काफिर' ठरवण्यात आले. ते  ख्रिस्ताळलेले व इंग्रजाळलेले कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला, कुचकामी मदरसा शिक्षणाचा आग्रह कायम ठेवला आणि आत्मवंचना केली.

आजची मुस्लीम समाजाची दुरावस्था न्या. राजेंद्र सच्चर, न्या. रंगनाथ मिश्रा तसेच डॉ. मेहमुद उर रहमान अभ्यासगटाने स्पष्ट केली आहे. आजही पदवीधरांची संख्या चार टक्के आहे. आजही मद्रसा शिक्षणाचा आग्रह आहेच, मदरशात आधुनिक शिक्षणाचा समावेश नको आहे, मुख्य प्रवाहातील शिक्षणाकडे पाठ फिरवली जाते. ही पारंपरिक मानसिकता जोपासण्याचा आग्रह सोडला नाही तर 'एक अविद्या' किती 'अनर्थ' करू शकते याचा पुन्हा प्रत्यय घेणे न परवडणारे ठरेल. आत्मपरिक्षण, आत्मसुधारणा करण्यासाठी आत्मप्रेरणा हव्या आहेत. त्यासाठी समाजाने अंतर्मुख होऊन, विचार करून समाज बदलासाठी किंमत मोजली पाहिजे.

आत्मकोषातून बाहेर पडूनच या नव्या आव्हानांना सामोरे जाता येईल. बाह्य समाजाशी संवाद आणि समावेशकता प्रस्थापित करून आमची साहित्य, समाज, राजकारणातील प्रगती साध्य करता येईल, हा सर सय्यद अहमद खान यांचा संदेश आजही दिशादर्शक आहे.

१८६९ मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी इंग्लंड दौरा करून तेथील महत्त्वाच्या प्रतिष्ठित लोकांशी संवाद साधला. इंग्रजांसाठी इंग्रजीत साहित्य तयार केले. मोहंमद पैगंबरांचे चरित्र लिहिले. त्यांचे पुस्तक उदारमतरवादी इस्लामचे दर्शन घडवते. 'इस्लाम हा तलवारीचा धर्म आहे' ही प्रचलित प्रतिमा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी मुस्लीमांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी भेटी देऊन निधी जमवला आणि २४ मे, १८७५ मध्ये अलीगढ येथे 'द मोहमेडन अग्लो ओरिएंटल' कॉलेजची स्थापना केली. 

त्यांनी मुस्लीम कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटून महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवाहन केले. १८९३ मध्ये आपल्या भाषणात त्यांनी हिंदू-मुस्लीम यांच्या शिक्षणातील तफावत दाखवताना मुस्लीम समाजाची विदारकता स्पष्ट केली. सर सय्यद अहमद खान यांचे १८९७ मध्ये निधन झाले. त्यानंतर १९२० मध्ये मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलिगढ़ मुस्लीम युनिव्हर्सिटी असे नामांतर झाले. आज येथे विधी, अभियांत्रिकी, मेडिकल, इतिहास अशा सर्व आधुनिक विद्याशाखांमधून बुद्धिजीवी निर्माण होत आहेत. पण हे बुद्धिजीवी समाज बदलाचे उत्तरदायित्व किती प्रमाणात बाळगतात, हा पुन्हा संशोधनाचा विषय ठरेल.

समाजात सुधारणा व्हावी, सज्ञानता वाढावी यासाठी मोहमेडन सोशल रिफॉर्मर प्रकाशित करण्यात येत असे. शिक्षण, समाज सुधारणा, आधुनिकतेवर लोकशिक्षण करणाऱ्या या नियतकालिकावर प्रतिगाम्यांनी तोंडसुख घेऊन विरोध दर्शवला. समाजाने सुधारणेची परंपरा स्वीकारण्याऐवजी सुधारकालाच विरोध करण्याची परंपरा चालू ठेवली, हे या समाजाच्या अधोगतीचे प्रमुख कारण ठरले आहे.

हिंदू व मुस्लीम हे भारतातील प्रमुख धर्मसमूह जणू एकाच शरीराचे दोन प्रमुख अवयव असल्याचे सर सय्यद यांनी अनेकवेळा सांगितले. 'मानवी जीवनाची दोन अंगे असतात. त्यातील पहिला, ईश्वरावर ठेवलेली श्रद्धा आणि दुसरा भाग म्हणजे  समाजातील अन्य समुदायाबद्दल असणारी नैतिक सहानुभूती. ईश्वराबद्दलची श्रद्धा व तो वाटा ईश्वराला देऊ; पण अन्य समूह घटकाशी नैतिक सहानुभूतीने वागण्याचा जो भाग आहे त्याच्याशी बांधिलकी व्यक्त करता आली पाहिजे.'

'भारत हा स्थलांतरीतांचा देश आहे. भारत हे सर्वांचे घर बनले. आपण येथील जमिनीत उगवलेले खातो. येथील गंगा-यमुनाचे पाणी पितो. येथील हवेत श्वास घेतो. आपण येथे जगतो व येथेच मरतो. वर्षानुवर्षे येथे राहत असल्यामुळे आपले रक्त एक आहे. हिंदू-मुस्लीमांनी एकमेकांना शिकवले आहे व एकमेकांपासून शिकले आहेत. दोघांनी मिळून उर्दू भाषेला जन्म दिला. भारतातील हिंदू-मुस्लीम हे एखाद्या नववधूच्या दोन डोळ्यांसारखे आहेत. या दोन डोळ्यांना इजा झाल्यास भारतरूपी नववधूचे सौंदर्य नष्ट होईल.' ही उपमा सर सय्यद अहमद खान यांच्याकडून पुन्हा-पुन्हा व्यक्त झालेली दिसते.

सर सय्यद खान हे ब्रिटिशधार्जिणे असल्याचा एक आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. हा आरोप राजा राममोहन रॉय, महात्मा फुले व अशा बहुतांश समकालीन सुधारकांवर केला जातो. अनेक प्रकारच्या पारंपरिक समस्यांच्या निराकरणासाठी ब्रिटिश सत्तेकडे ईष्टापत्ती म्हणून पाहण्याचा हा दृष्टिकोण होता.
 
सर सय्यद अहमद खान हे अश्रफ वर्गातील असल्यामुळे त्यांनी तळागाळातील समाजाबद्दल आस्था दाखवली नाही, असेही एक प्रवाह मानतो. महात्मा फुल्यांनी स्त्री-दास्यमुक्तीचा विचार दिला तसा दृष्टिकोन खानसाहेबांनी दिला नाही. धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र तर्कशुद्ध चिकित्सा केली नाही, अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मर्यादा दाखवण्यात येतात. मात्र एखाद्याचे मूल्यमापन करताना तत्कालीन सामाजिक-राजकीय- ऐतिहासिक बाजूही विचारात घ्यावी लागते. या अर्थाने सर सय्यद अहमद खान हे भारतीय मुस्लीम प्रबोधनातील प्रमुख मानबिंदू आहेत हे नाकारता येणार नाही.

आजही मुस्लीम समाजातील तरुणांकडे पात्रता नाही म्हणून संधीपासून दूर राहावे लागते. समाजाला आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी, सन्मानाने राहण्यासाठी, भारतीय समाजाला अधिक चांगले योगदान देण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांच्या विचारांचे कृतीशील अनुकरण करणे गरजेचे आहे. त्यांचा आधुनिक शिक्षणाचा मंत्रच मुस्लीम समाजाच्या विविधांगी समस्या सोडवण्यास समर्थ करणारा आहे. त्यांचे विस्मरण हे न परवडणारे आहे.

- डॉ. शमसुद्दीन तांबोळी
(लेखक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या कर्तुत्ववान मुस्लीम महिलांच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻

 

देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी डॉ. वृषाली शेख!


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube