अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
मॅकमोहन रेषा-आंतरराष्ट्रीय सीमा
मॅकमोहन रेषा-आंतरराष्ट्रीय सीमा

 

वॉशिंग्टन: चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात असलेली मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचे अमेरिकेनेही मान्य केले. अमेरिकेच्या सिनेट सभागृहाने याबाबत ठराव झाला असून यानुसार अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे अमेरिकेला मान्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशवर दावा सांगणाऱ्या चीनला झटका बसला आहे.
 
भारत आणि चीन यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषा मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. चीनने मात्र काश्‍मीरमधील लडाखमध्ये काही भागात अतिक्रमण केले असून सध्याची प्रत्यक्ष ताबा रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा समजावी, असा त्यांचा आग्रह आहे. शिवाय, अरुणाचल प्रदेशवरही ते दावा सांगत आहेत. भारताने मात्र संपूर्ण जम्मू काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. चीनच्या आक्रमक धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने धोरणात्मक प्रयत्न सुरु केले आहेत. ‘हिंद-प्रशांत क्षेत्रातील खुल्या आणि मुक्त वातावरणाला चीनकडून धोका निर्माण झाला असताना अमेरिकेने आपल्या धोरणात्मक भागीदार देशांच्या, विशेषत: भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे आवश्‍यक आहे,’ असे मत सिनेटमध्ये ठराव मांडणारे सदस्य बिल हॅगर्टी यांनी सांगितले.
 
सिनेटमध्ये ठराव मांडला गेल्यानंतर सत्ताधारी डेमोक्रॅटिक आणि विरोधी रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी मॅकमोहन रेषेला मान्यता देताना अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग असल्याच्या भारत सरकारच्या म्हणण्याचे समर्थन केले. तसेच, प्रत्यक्ष ताबा रेषेच्या स्थितीतही बदल करण्यासाठी चीन करत असलेल्या लष्करी हालचालींचाही सिनेटने निषेध केला. लडाखमधील सीमावादावर मात्र सिनेटने भाष्य टाळले.
 
यावेळेस सिनेटर जेफ मर्कली यांनी अमेरिकेचे धोरणावर भाष्य केले.  स्वातंत्र्य आणि नियमाधारित व्यवस्थांना समर्थन करण्याचे अमेरिकेचे धोरण हाच आमच्या सर्व निर्णयांचा आणि परराष्ट्र संबंधांचा गाभा असतो. अरुणाचल प्रदेश हा चीनचा नाही, तर भारताचा भाग असल्याचे आम्ही या ठरावाद्वारे मान्य करत आहोत
 
ठरावातील मुद्दे
- अरुणाचल प्रदेश हा भारताचा प्रदेश
- प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील लष्करी हालचालींचा निषेध
- वादग्रस्त भागात गावे उभारण्याच्या चीनच्या कृतीचा निषेध
- वादग्रस्त भागातील गावांना चीनच्या नकाशात दाखविण्यास विरोध
- भूतानमधील प्रदेशावर चीनने केलेल्या दाव्याचा निषेध