सलोखा जपणारं साताऱ्याचं आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
शतकी परंपरा जपणाऱ्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे सुरुवातीचे कार्यकर्ते
शतकी परंपरा जपणाऱ्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे सुरुवातीचे कार्यकर्ते

 

योगेश जगताप, सातारा
 
सातारा शहरात गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ गणेशोत्सव काळात नव्हे तर वर्षभर गणपतीची आराधना करण्यासाठी सातारकर ओळखले जातात. सदाशिव पेठेतील पंचमुखी गणपती, शनिवार पेठेतील फुटका तलाव गणपती, सातारा शहराचं ग्रामदैवत असलेला गुरुवार पेठेतील ढोल्या गणपती, शुक्रवार पेठेतील बदामी विहीर गणपती चिमणपुरा पेठेतील गारेचा गणपती आणि कुरणेश्वर येथील खिंडीतला गणपती या सहा गणपतींची मनोभावे पूजा करण्याचं काम सातारकर करतात. स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात शिवाजी महाराजांचं काही काळ वास्तव्य असल्याने शिवाय त्यांची वंशपरंपरागत गादी साताऱ्यातच असल्याने इथल्या मंदिरांमध्ये लोकांची कायमच वर्दळ पहायला मिळते.
 
साताऱ्यातील गणेशोत्सवसुद्धा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे लक्षवेधी ठरतो. इथल्या अनेक गणेश मंडळांना शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या प्रेरणेने सैनिकांना केलेली मदत असो किंवा सामाजिक सलोखा जपण्यासाठी केलेले प्रयत्न असोत, साताऱ्यातील मंडळांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. पुण्याप्रमाणे साताऱ्यातही मानाचे पाच गणपती आहेत. ही पाचही गणेशोत्सव मंडळं म्हणजे आधीच्या कुस्ती तालीम होत्या.
 
पिळदार शरीरयष्टी कमवण्यासाठी तालमीत येणाऱ्या पैलवानांनी आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून गणेशोत्सव मंडळं स्थापन केली. १९०७ मध्ये स्थापन झालेलं आणि तब्बल ११८ वर्षांचा इतिहास असलेलं आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ हे त्यापैकीच एक. मानानुसार विचार करता शनिवार पेठेतील जयहिंद गणेशोत्सव मंडळ हे पहिलं, सोमवार पेठेतील आझाद हिंद मंडळ हे दुसरं, गुरुवार तालीम मंडळ हे तिसरं, बुधवार तालीम मंडळ हे चौथं तर जय जवान मंडळ असा क्रम सातारकर मानतात. जिल्हा प्रशासनाकडेही अशाच प्रकारे नोंद असल्याचं विविध मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.
 
याशिवाय शंकर पार्वती मंडळसुद्धा या मानाच्या गणपतींसोबत आपला विशेष मान राखून आहे. शंकराची आराधना करणाऱ्या तेली आणि गवळी बांधवांनी गणेशोत्सव मंडळं स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आझाद हिंद मंडळाचे विशाल निगडकर सांगतात. 

आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ हे साताऱ्यातील सर्वात जुनं मंडळ. १९०७ मध्ये या मंडळाची स्थापना माजगावकर वाड्यात झाली. या वाड्यातील दामोदर कृष्णराव माजगावकर हे मोठं प्रस्थ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांच्या आर्थिक सल्लागार समितीत या माजगावकरांनी काम केल्याचं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.
 
सुरुवातीचे ८-९ वर्षं माजगावकर वाड्यात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव १९१६ पासून जवळच असणाऱ्या दत्त मंदिरात साजरा केला जाऊ लागला. तेव्हापासून ती परंपरा आजही कायम आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर जवळपास ३५ वर्षानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेने मंडळाचं नाव आझाद हिंद मंडळ ठेवण्यात आलं. तोपर्यंत सोमवार पेठेतील दत्त मंदिराचा गणपती अशीच या मंडळाची ओळख लोकांमध्ये होती. 
 

 
हिंदू मुस्लिम ऐक्याची अनोखी परंपरा 
मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळख असलेल्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळात हिंदू मुस्लिम ऐक्याची अनोखी परंपरा पहायला मिळते. मंडळाच्या आसपास सर्व जातीधर्माचे लोक वास्तव्यास होते. यात मुस्लिम बांधवांचं प्रमाण अगदी सुरुवातीपासून २०-२५ टक्के होतं. मंडळांचं अध्यक्षपद अनेक वर्षं भूषवलेले मुस्लिम बांधव परिसरात आहेत. यामध्ये सुरज मुल्ला, शकील बागवान यांचा समावेश होतो.
 
सध्या मंडळाचे खजिनदार म्हणून शाहिद शेख हे काम पाहत आहेत. यंदाच्या गणेशोत्सव मंडळाच्या ८० ते ९० कार्यकर्त्यांमध्ये २०-२५ कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय हे मुस्लिम समाजातील आहेत. हे कार्यकर्ते आपापल्या कुवतीनुसार अगदी दोन ते दहा हजार रुपयांपर्यंतची वर्गणी स्वेच्छेने मंडळासाठी देतात. हिंदू-मुस्लिम सौहार्दाची चौथी-पाचवी पिढी इथं गुण्यागोविंदाने नांदताना पहायला मिळते.
 
हज यात्रा करून आलेल्या नागरिकांचा सन्मान या गणेशोत्सव मंडळात केला जातो. केवळ गणेशोत्सव काळातच नाही तर वर्षभरातील सर्व सण-उत्सवांमध्ये सर्व जाती-धर्मीय लोक आपसांत मिसळून काम करत असल्याचं चित्र याठिकाणी अनुभवायला मिळतं. मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात मुस्लिम बांधव आवर्जून सहभाग नोंदवतात. काही वर्षांपूर्वी कामगार नेते बाबा आढाव यांनी साताऱ्यातील कुष्ठरोगी बांधवांना एकत्र करून त्यांना स्नेहभोजन देण्याचा मोठा कार्यक्रम मंडळात आयोजित केल्याची आठवण कार्यकर्त्यांच्या मनात आजही ताजी आहे. 

 
२००५ मध्ये काही कारणांमुळे संभाजी ब्रिगेड संस्थेने या गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी सूरज मुल्ला हे मंडळाचे अध्यक्ष होते. तणावपूर्ण स्थितीत हे प्रकरण पोलिसांकडे गेलं. तत्कालीन पोलीस अधिकारी विश्वास पांढरे यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि आझाद हिंद मंडळाचे अध्यक्ष सुरज मुल्ला यांच्यात चर्चा झाली. मुल्ला जी भूमिका घेतील ती मान्य असेल असं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं.
 
पोलीस स्टेशनच्या बाहेर शंभरएक कार्यकर्त्यांचा जमाव गोळा झालेला असताना मुल्ला यांनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे ब्रिगेडच्या लोकांचंही समाधान झालं. अर्थात मुल्ला यांना सहकार्य करण्याची भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही घेतली. या प्रसंगाची दखल पोलीस प्रशासनाने घेऊन सामाजिक एकोप्याचं जिवंत उदाहरण ठरलेल्या आझाद हिंद मंडळाला त्यावर्षीचा गणराया अवॉर्ड देऊ केला.

मंडळाशी असलेल्या ऋणानुबंधाविषयी सुरज मुल्ला सांगतात, "आमची चौथी पिढी मंडळाच्या सेवेत आहे. लहानपणी एकत्र खेळणारी पोरं मोठेपणी मंडळाची जबाबदारी स्वीकारतात तेव्हा होणारा आनंद आगळाच असतो. गणेशोत्सव काळात रात्री दोन-दोन वाजेपर्यंत आणि इतर वेळी अगदी १२ वाजेपर्यंत आम्ही कार्यकर्ते एकत्र गप्पा ठोकत बसलेलो असतो. राज्यात किंवा देशात जातीय आणि धार्मिक द्वेषाचे कितीही प्रकार घडले तरी आमच्या भागात मात्र एकमेकांविषयी बिल्कुलही कटुता नसते. मंडळाने आमच्या नात्याची वीण घट्ट केलीय. आमची पुढची पिढीही अशाच भावनेने जगत राहो ही गणरायाचरणी प्रार्थना आहे."

 
मंडळाच्या धडाडीच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये रामभाऊ गवळी, धोंडीराम शिंदे, हकीम मास्तर, सिकंदर बागवान, शकील बागवान, शिवाजी बागल, दयाराम खेडकर, अवधूत किर्वे, प्रल्हाद निगडकर, सागर माने, चंद्रकांत खर्षिकर, सुरज मुल्ला, विशाल निगडकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. गणरायाच्या आरतीसाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यामध्ये मुस्लिम भगिनींची संख्याही लक्षणीय असते. या मंडळातर्फे दरवर्षी गणेशाची वेगवेगळ्या रूपातील मूर्ती बसवली जाते. मागील १२ वर्षांपासून ही गणरायाची मूर्ती वसई येथील मूर्तिकार कृणाल पाटील यांच्याकडून बनवून घेतली जाते.
 
साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सादर करून दाखवण्याची सुरुवात आझाद हिंद गणेश मंडळाने सर्वप्रथम केली. दांडपट्टा चालवण्यात एकसे बढकर एक रथी महारथी लोक या मंडळाने दिले. आजही आझाद हिंद मंडळाच्या दांडपट्टा खेळणाऱ्यांची चर्चा सातारा शहरात असते. २००० नंतरच्या काळात दांडपट्टा खेळणारी पिढी घडवण्यात मंडळाच्या लोकांनी लक्ष दिलं नाही, शालेय अभ्यास हाच प्राधान्यक्रम ठेवल्याने दांडपट्टा खेळणारी नवी मुलं तयार होऊ शकली नाहीत असं मंडळाचे कार्यकर्ते खेदाने सांगतात. गणेश विसर्जन मिरवणुकीत नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक या तीन महामानवांचे फोटो गणेश मूर्तीभोवती किंवा ट्रॅक्टरभोवती आवर्जून लावले जातात.  

 
सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांनी या मंडळाला ताकद दिली असून ११८ वर्षांची दिमाखदार परंपरा त्यामुळेच हे मंडळ टिकवू शकलं आहे. कुठल्याही राजकीय नेत्याच्या किंवा पक्षाच्या मदतीशिवाय, हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थित चालवलं जाणारं मंडळ म्हणून या मंडळाची दखल घ्यावीच लागते. मंडळ परिसरात खेळणारी लहान मुलं, मंडळाच्या बाहेर असणाच्या दुकानांच्या पायऱ्यांवर बसलेली ज्येष्ठ मंडळी, येता-जाता थांबून गणपतीला नमस्कार करणाऱ्या मुली-महिला हे प्रसन्न चित्र तुम्हाला गणेशोत्सव काळात कायम पहायला मिळेल. साताऱ्यात असाल तर या मंडळाला भेट द्यायला विसरू नका..! 

- योगेश जगताप

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter