व्हिएतनाममधील अनेक शहरांमध्ये महिनाभर चाललेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाला १ कोटी ७८ लाखांहून अधिक भक्तांनी भेट दिली, असं अधिकाऱ्यांनी सोमवारी २ जून २०२५ रोजी सांगितलं. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथील विहारात ठेवलेले हे अवशेष २ मे रोजी हो ची मिन्ह शहरात पोहोचले होते.
भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने हे अवशेष २ जूनच्या रात्री भारतात परतले. व्हिएतनाममधील संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिनाच्या उत्सवात या प्रदर्शनाला प्रचंड आध्यात्मिक प्रतिसाद मिळाला. “व्हिएतनाममध्ये अभूतपूर्व आध्यात्मिक लाट उसळली. दक्षिण ते उत्तरेकडील पवित्र स्थळांवर या प्रदर्शनाला १.७८ कोटी भक्तांनी भेट दिली. बौद्ध आणि आध्यात्मिक साधकांनी श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचं दर्शन घडवलं,” असं संस्कृती मंत्रालयाने सांगितलं.
हो ची मिन्ह शहरातील आय थान तम मठात ३ ते ८ मे दरम्यान १८.७७ लाख, हा नाम प्रांतातील तम चुक पॅगोडात १७ ते १९ मे रोजी २० लाख आणि हनोईतील क्वान सु पॅगोडात १३ ते १७ मे दरम्यान ७० लाख भक्तांनी भेट दिली. यात मध्यवर्ती अवशेष मिरवणुकीत २० लाख भक्त सहभागी झाले.
“२१ मे रोजी संपणारं हे प्रदर्शन व्हिएतनाम सरकारच्या विशेष विनंतीनं २ जूनपर्यंत वाढवण्यात आलं, कारण भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा वाढत होती,” असं मंत्रालयाने ३० मे रोजी सांगितलं. भारत सरकारच्या शिष्टमंडळानं, ज्याचं नेतृत्व ओडिशाचे राज्यपाल हरि बाबू कांभमपती यांनी केलं, अवशेषांना साथ दिली. दिल्लीतील पालम हवाई तळावर आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे (IBC) अधिकारी आणि वरिष्ठ भारतीय भिक्खूंनी अवशेषांचं स्वागत केलं.
व्हिएतनामला अवशेष ‘राज्य अतिथी’ दर्जानं हिंदन हवाई तळावरून विशेष विमानाने नेण्यात आले. बौद्ध समुदायासाठी या अवशेषांचं विशेष महत्त्व आहे. व्हिएतनाममध्ये प्रथमच हे प्रदर्शन झालं. दिल्लीत परतल्यानंतर मंगळवारी ३ जून रोजी राष्ट्रीय संग्रहालयात अवशेषांचं सार्वजनिक प्रदर्शन होईल. दुपारी वरिष्ठ भिक्खू, IBC चे सरचिटणीस आणि परराष्ट्री प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रार्थना सभा होईल.
बुधवारी ४ जून रोजी अवशेष राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या पूर्ण प्रोटोकॉलसह दिल्लीतून रवाना होतील. वाराणसीमार्गे सारनाथ येथील मूलगंध कुटी विहारात त्यांची विधिवत स्थापना होईल. या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय तीर्थयात्रेनं बुद्धांचा शांती आणि करुणेचा कालातीत संदेश पुन्हा अधोरेखित केला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter