नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत परीक्षा गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. आंदोलनात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा सहभाग आणि परदेशातून निधी मिळणाऱ्या संस्थांच्या संशयित भूमिकेमुळे या आंदोलनाचे मूळ स्वरूप आणि उद्दिष्टांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या बाह्य घटकांचा सहभाग आहे का, याची सर्वसमावेशक चौकशी करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, या तथाकथित विद्यार्थी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्ली वेठीस धरण्यात आली आहे, रस्ते ब्लॉक झाले आहेत आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला अडवणे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, पत्रकारांवर हल्ले आणि संसदेजवळ सुरक्षेचे नियम मोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी बुधवारी न्यायालयाने २० जुलैच्या संसदेवरील मार्चदरम्यान आंदोलकांवर झालेल्या अत्यधिक बळाच्या वापराबद्दल केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेजसह सर्व संबंधित रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.