दीन आणि दुनिया : धर्माच्या नावाखाली जज करणाऱ्यांना डॉ. आमिना मिर्झा यांची चपराक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
'आवाज द व्हॉइस'च्या 'दीन और दुनिया' कार्यक्रमात होस्ट साकिब सलीम यांच्याशी संवाद साधताना दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. आमिना मिर्झा
'आवाज द व्हॉइस'च्या 'दीन और दुनिया' कार्यक्रमात होस्ट साकिब सलीम यांच्याशी संवाद साधताना दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. आमिना मिर्झा

 

बदल हा जीवनाचा मूळ सिद्धांत असून मीडिया देखील याच बदलाचा एक भाग आहे. पूर्वी वर्तमानपत्रे होती, आज त्यांची जागा ॲप्सनी घेतली आहे. अशाच प्रकारे सोशल मीडिया देखील काळाची गरज बनला आहे. कुराणमधील 'सूरह अर-रअद'च्या अराव्या आयतीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, जोपर्यंत एखादा समाज स्वतःची स्थिती बदलत नाही, तोपर्यंत अल्लाह देखील त्यांची स्थिती बदलत नाही. याचा अर्थ तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्याला आपली जबाबदारी ओळखून स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल.

दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. आमिना मिर्झा यांनी हे विचार व्यक्त केले. 'आवाज द व्हॉइस'च्या 'दीन आणि दुनिया' या पॉडकास्टमध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे होस्ट साकिब सलीम यांच्याशी संवाद साधताना आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा समाजावरील परिणाम आणि त्यातील महिलांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली.

सोशल मीडिया ही एक नवीन गोष्ट आहे या मुद्द्यावरून चर्चेची सुरुवात झाली. गेल्या १०-२० वर्षांत हे माध्यम समोर आले आणि संपूर्ण जगात पसरले. आता ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. काही लोक याला खूप वाईट मानतात तर काही जण अत्यंत आवश्यक समजतात. मुलींना मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवावे, असे फतवेही अनेक ठिकाणांहून येतात.

डॉ. आमिना मिर्झा म्हणाल्या की, बदल हा निसर्गाचा नियम असून ती जीवनातील वास्तविकता आहे, हे आपण आधी समजून घेतले पाहिजे. पूर्वी वर्तमानपत्रे होती आणि आता ती एका ॲपपुरती मर्यादित झाली आहेत. मीडियामध्येही असाच बदल झाला आहे. सामान्य माणूस या बदलाशी स्वतःला कसे जुळवून घेतो, हा खरा प्रश्न आहे. येथे वैयक्तिक जबाबदारी सर्वात महत्त्वाची ठरते. माणसाला स्वतःची स्थिती स्वतःच सुधारावी लागते, असे मार्गदर्शन कुराणमध्येही मिळते.

तंत्रज्ञानाने जीवन बदलले आहे. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि सामाजिक संबंधांवर त्याचा परिणाम झाला आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या हेतूसाठी करणे आपली जबाबदारी आहे. आपण काय चांगले करत आहोत, हे अल्लाहला ठाऊक असते. केवळ आपलेच मत योग्य आहे, असा गैरसमज आपण बाळगू नये. प्रत्येक माणूस अल्लाहच्या जवळ आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सोशल मीडिया ही दुधारी तलवार असल्याचे डॉ. आमिना मिर्झा यांनी सांगितले. याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. आज अनेक महिला घरी बसून शिक्षण, व्यवसाय, फॅशन आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे जात आहेत. कमी खर्चात स्वतःचे व्यासपीठ निर्माण करून नवीन ओळख मिळवत आहेत. हे डिजिटल युग महिलांसाठी एक नवीन खिडकी उघडत आहे, त्यातून त्या आपला आवाज जगापर्यंत पोहोचवू शकतात.

सोशल मीडियामध्ये आजही लिंगभेद अस्तित्वात असल्याचे चर्चेत समोर आले. पुरुषांच्या तुलनेत मुलींवर अधिक टीका केली जाते. विशेषतः मुस्लिम मुलींना धर्माच्या नावाखाली लक्ष्य केले जाते. त्यांनी फोटो का लावला किंवा त्या एखाद्या मुलासोबत का दिसल्या, असे प्रश्न त्यांना विचारले जातात. धर्माचा चुकीचा वापर करून इतरांवर हल्ला करणे अयोग्य असल्याचे डॉ. आमिना मिर्झा यांनी स्पष्ट केले. फोटो लावणारा व्यक्ती चुकीचा नसून धर्माच्या नावावर इतरांचे मूल्यमापन करणारा व्यक्ती चुकीचा असतो.

पॉडकास्टमध्ये ट्रोलिंगच्या समस्येवरही चर्चा झाली. ट्रोलिंगचा मुलींवर मानसिक परिणाम होतो आणि अनेकदा त्या सोशल मीडियापासून दूर जाऊ लागतात. यावर उपाय म्हणजे महिलांनी खंबीर मानसिकतेसह पुढे जावे आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. आपली नियत साफ ठेवावी आणि चांगले काम सुरू ठेवावे. लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे खचून जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.

सोशल मीडियामुळे महिला घराकडे दुर्लक्ष करत आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. डॉ. आमिना मिर्झा म्हणाल्या की, ही विचारसरणी प्रामुख्याने पुरुषसत्ताक आहे. पुरुष तासनतास स्क्रीनसमोर असले तर कोणतीही हरकत घेतली जात नाही, मात्र महिलेवर लगेच आरोप केले जातात. वस्तुस्थिती अशी आहे की, तंत्रज्ञान आज महिलांना घर आणि काम दोन्ही चांगल्या प्रकारे सांभाळण्यास मदत करत आहे.

औद्योगिक क्रांतीच्या काळात महिलांना मागे ठेवले गेले, पण सध्याचे डिजिटल युग वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज ज्ञान हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमी संसाधने असूनही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय आणि शैक्षणिक उपक्रम सुरू करू शकतात. यामुळे महिलांना नवीन आवाज आणि नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

शेवटी दीन आणि दुनिया यांच्यातील संतुलनावर चर्चा झाली. हे संतुलन स्वतःलाच साधावे लागते, असे डॉ. आमिना मिर्झा म्हणाल्या. इबादत केवळ काही क्षणांपुरती मर्यादित नसून ती प्रत्येक कर्मात समाविष्ट असते. नियत चांगली असेल तर सोशल मीडिया देखील इबादतीचे साधन बनू शकतो. महिलांनी न घाबरता पुढे जावे, ज्ञान मिळवावे, स्वतःची ओळख निर्माण करावी आणि धर्मासोबतच जगातही सकारात्मक भूमिका पार पाडावी, असा संदेश त्यांनी दिला.

संतुलन दिले जात नाही तर ते बनवावे लागते. इबादत प्रत्येक क्षणात असते. धर्म आणि जग या दोन्ही गोष्टींपासून मागे हटने चुकीचे आहे. नियत साफ असेल तर मार्ग सोपे होतात. सोशल मीडियाचा वापर दिखाव्यासाठी न करता भलाईसाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

त्या स्वतः २०१० पासून सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांना कधीही अपमानास्पद टिप्पण्यांचा सामना करावा लागला नाही. त्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. जीवन छोटे आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे चांगले काम करत राहिले पाहिजे. हेच दीन आणि दुनियाचे संतुलन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियाचा वापर केवळ प्रदर्शनासाठी न करता प्रगतीसाठी व्हावा आणि मुस्लिम मुलींनी आत्मविश्वासाने आपला आवाज जगापर्यंत पोहोचवावा, या संदेशाने पॉडकास्टचा समारोप झाला.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter