द्वेषाच्या अल्गोरिदमला सकारात्मकतेचे उत्तर! उत्तराखंडमधील सलमान, अशरफ आणि एहसान भाईंच्या संघर्षाची कहाणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. एखाद्या वेळी तुम्ही हिंसाचार किंवा द्वेषाने भरलेला व्हिडिओ पाहिला तर त्याच प्रकारचे व्हिडिओ सतत समोर येऊ लागतात. याचा थेट परिणाम मनावर होतो. सोशल मीडियाच्या याच जाळ्यात असेही काही व्हिडिओ असतात जे कदाचित आपल्याला पाहायचे नसतात. त्यामुळे त्यांची झलक आपल्या स्क्रीनपर्यंत पोहोचू शकत नाही. 

आजकाल उत्तराखंडशी संबंधित काही व्हिडिओ समोर येत आहेत. त्यामध्ये धर्माच्या नावावर लोकांना लक्ष्य करताना दाखवले आहे. असे घटनाक्रम निसंशयपणे खरे आहेत. परंतु ते पूर्ण सत्य म्हणता येणार नाही. याच संबंधित सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये आदर, सन्मान आणि प्रेमाबद्दल बोलले गेले आहे. तिथे धर्माच्या आधारावर भेदभावाचा कोणताही विषय नसतो. असेच काही व्हिडिओ आम्ही येथे सादर करत आहोत. ते पाहून हे समजू शकते की, द्वेषाने भरलेल्या व्हिडिओमध्ये दिसते तेवढेच सत्य नाही.

सलमान एक कष्टाळू तरुण

देहराडूनमधील अनुप कटवान नावाच्या व्यक्तीने एका व्हिडिओच्या माध्यमातून देहराडूनच्या रस्त्यावर काम करणाऱ्या सलमान नावाच्या तरुणाची ओळख करून दिली. त्यांनी त्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, "हा पहा सलमान नावाचा कष्टाळू तरुण प्रामाणिकपणे आपला रोजगार मिळवत आहे. हाच त्यांचा पूर्ण व्यवसाय असून त्यांचे दरही खूप रास्त आहेत. सलमान हेल्मेट आणि चष्म्यांचे काम करतात आणि दुचाकीस्वारांसाठी चांगले सामान उपलब्ध करून देतात." 

मस्करी करत अनुप म्हणतात की, "सलमान स्वतः चष्मे विकतात पण स्वतः वापरत नाहीत. सलमान देहराडूनच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रामाणिकपणे रोजीरोटी कमवत आहेत. सर्व सहकाऱ्यांना सांगणे आहे की, सलमान चांगले काम करत आहेत आणि त्यांचे दरही योग्य आहेत. जे काही सामान घ्यायचे असेल ते त्यांच्याकडून घेता येईल कारण हा मुलगा कष्टाळू आणि भरवशाचा आहे. हे दुकान 'मॉल ऑफ देहराडून'च्या समोर आहे."

अशरफच्या जिद्दीला सलाम 

अशाच प्रकारचा एक व्हिडिओ नारायण सिंह बिष्ट यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सायकलवर असलेल्या एका मुस्लिम व्यक्तीसोबत दिसत आहेत. ते सांगतात की, "आपल्या समोर उभे असलेल्या व्यक्तीचे नाव अशरफ असून त्यांच्या वडिलांचे नाव रफीक आहे. हे कच्छा येथील रहिवासी असून वॉर्ड नंबर १५ मधील कुरेशी मोहल्ल्यात त्यांचे घर आहे. अशरफ भंगाराचे काम करतात आणि फिरून आपली उपजीविका करतात. त्यांनी आपली ओळख आधीच पडताळून घेतली आहे. एक पडताळणी कच्छा येथून आहे आणि दुसरी लाल कुआं येथून आहे."

ते पुढे म्हणतात की, "जेव्हा कोणी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली तेव्हा ते थोडे काळजीत पडले होते. मात्र त्यांची ओळख पूर्णपणे खरी असल्याचे आढळले आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड असून त्याची छायांकित प्रत ते स्वतःजवळ ठेवतात. मूळ कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा आहेत. प्रकाशामुळे कागदपत्रे स्पष्ट दिसत नव्हती पण सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत. त्यामुळे अशरफ यांना विनाकारण त्रास दिला जाऊ नये. हा गरीब पण कष्टाळू माणूस असून प्रामाणिकपणे आपल्या मुलांचे पालनपोषण करत आहे आणि शांततेत आपले जीवन जगू इच्छितो."

घनसालीचे प्रामाणिक एहसान

उत्तराखंडच्या घनसाली येथील हयात कुंडारी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका कष्टकरी व्यक्तीसोबत दिसत आहेत. ही व्यक्ती लोखंडाचा व्यवसाय करते. ते सांगतात की, "हे एहसान भाई रुड़की येथील रहिवासी असून घनसाली विधानसभा क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून काम करत आहेत. या ३० वर्षांत असा कोणताही गाव नसेल जिथे ते गेले नसतील. ते प्रत्येक गावात फेरफटका मारतात."

व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, "देशाचा कोणताही नागरिक जर कुठे प्रामाणिकपणे काम करत असेल, तर लोक त्याला सन्मानाने राहू देतात. घनसालीमध्ये या व्यक्तीला आजपर्यंत कोणीही त्रास दिला नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. काही लोक येऊन छोट्या कामांमधून मोठी गडबड निर्माण करतात. पण हे भाई ३० वर्षांपासून चांगले आणि सच्चे माणूस बनून रोजीरोटी कमवत आहेत. हे उत्तराखंडचे रहिवासी असून मेहनतीने आपले घर चालवत आहेत."
 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter