भक्ती चाळक
स्वातंत्र्यदिन म्हटला की ध्वजारोहण, भाषणे, देशभक्तीपर गीते आणि मिठाईचे वाटप हा ठरलेला परिपाठ. पण मुंबईची संस्कृती नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करते. यंदाच्या १५ ऑगस्टला दक्षिण मुंबईतील भायखळा, नागपाडा आणि मदनपुरा परिसरातील चप्पल व्यावसायिकांनी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्याची अनोखी वाट निवडली आहे.
ज्या भागातून व्यवसाय करून संसार चालतो, त्याच भागातील माता-भगिनींना आणि चिमुकल्यांना स्वातंत्र्यदिनाची खास भेट म्हणून चप्पल अन् सँडल्सचे मोफत वाटप केले जाणार आहे. ‘फुटवेअर मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशन’ (FMWA) या संस्थेच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० लहान-मोठे चप्पल कारखानदार एकत्र आले असून, त्यांनी या सामाजिक यज्ञाचे आयोजन केले आहे.
अशी असणार कार्याक्रमची रूपरेषा
१५ ऑगस्टला सकाळी ९ च्या सुमारास नागपाडा जंक्शन येथील बॉम्बे मर्कंटाईल बँकेसमोर स्थानिक नगरसेवक वकार खान यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडेल. राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर लगेचच १० वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत महिला आणि लहान मुलांसाठी मोफत चप्पल व सँडल्स वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल.
या उपक्रमात एकूण १,२०० जोड्यांचे वितरण करण्याचे नियोजन आहे. यात १,००० जोड्या महिलांसाठी तर २०० जोड्या लहान मुला-मुलींसाठी असतील. कोणताही धार्मिक रंग न देता आणि श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता परिसरातील सर्व महिला अन् लहान मुले या भेटीचा लाभ घेऊ शकतील.
पाचशे कारखानदारांचा सहभाग
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या असोसिएशनमध्ये भायखळा, मदनपुरा आणि नागपाडा भागातील सुमारे ५०० चप्पल उत्पादक सदस्य आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या क्षमतेनुसार या मोहिमेत वाटा उचलला आहे.
काही व्यावसायिकांनी आपल्या साठ्यातील माल दिला, तर अनेक कारखानदारांनी खास १५ ऑगस्टच्या भेटवस्तूसाठी नवीन डिझाइनच्या चप्पल आणि सँडल्स स्वतः बनवून घेतल्या आहेत. सध्या या सर्व चपलांचे विशेष पॅकिंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात चालले आहे.
दोन वर्षांपूर्वी पेरलेले बीज
दोन वर्षांपूर्वी रक्षाबंधनाचे औचित्य साधून या असोसिएशनने नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने असाच एक छोटा प्रयोग केला होता. त्यावेळी महिलांना सुमारे २०० जोड्या चप्पल व सँडल्सचे मोफत वाटप करण्यात आले होते.
पोलीस प्रशासनाचा मिळालेला पाठिंबा आणि महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या उपक्रमाचा विस्तार करण्याचा विचार पुढे आला. त्याच प्रेरणेतून यंदा १५ ऑगस्टच्या खास निमित्ताने हा उपक्रम तब्बल १,२०० जोड्यांपर्यंत नेण्यात आला आहे.
या अनोख्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आणि त्यामागचा हेतू स्पष्ट करताना फुटवेअर मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अशरफ शेख यांनी आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले, “हा उपक्रम राबवण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा हा दिवस निवडण्यामागे आमचा विशिष्ट हेतू होता. या उपक्रमाला कोणताही धार्मिक रंग लागू नये आणि यात श्रीमंत-गरीब असा फरक राहू नये. हा आपल्या संपूर्ण भारताचा, एकात्मतेचा दिवस आहे. त्यामुळे आम्ही हा दिवस निवडला.”
ते पुढे म्हणाले की, “आमची रोजीरोटी याच भागातून चालते, त्यामुळे या भूमीतील माता-भगिनींना अन् मुलांना ही छोटीशी भेट देऊन आम्हाला स्वातंत्र्याचा आनंद साजरा करायचा आहे. यंदा १,२०० जोड्या देत आहोत, पुढच्या वर्षी याहून मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा आमचा मानस आहे.”
या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना आणि स्थानिक नागरिकांना आमंत्रित करताना नगरसेवक वकार खान यांनी असोसिएशनच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. ते म्हणाले, “सर्वात आधी मी फुटवेअर मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नासीर खान, सेक्रेटरी अशरफ शेख, खजिनदार मोहम्मद इरफान अन्सारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा खूप आभारी आहे. भायखळ्यात राबवला जाणारा सर्वात सुंदर उपक्रम आहे. ज्या भागातून हे लोक आपला व्यवसाय करतात, त्याच भागातील माता-भगिनींचा विचार त्यांनी केला, ही खूप मोठी गोष्ट आहे.”
स्थानिक महिलांना आवाहन करताना ते पुढे म्हणाले, “नागपाडा जंक्शनवर बॉम्बे मर्कंटाईल बँकेसमोर १५ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून हा वाटपाचा सोहळा सुरू होईल. भायखळा, मदनपुरा, नागपाडा आणि आसपासच्या सर्व परिसरातील माझ्या माता-भगिनींना आणि मुलींना माझी नम्र विनंती आहे की, ही तुमच्या भावांकडून मिळालेली एक छोटीशी भेट आहे. ही भेट स्वीकारण्यासाठी तुम्ही सर्वांनी १५ ऑगस्टला सकाळी नक्की उपस्थित राहावे.”
सामाजिक बांधिलकी
व्यवसाय करताना केवळ नफा मिळवणे हाच उद्देश न ठेवता, आपल्या मिळकतीचा काही भाग ज्या समाजातून आपली रोजीरोटी चालते त्याच समाजाला परत देणे, हा खरा राष्ट्रधर्म आहे. व्यापाऱ्यांच्या या उपक्रमाने मुंबईच्या सामाजिक सलोख्याला आणि बंधुतेला एक नवी अन् मजबूत दिशा दिली आहे.