छत्रपती शिवरायांच्या मुस्लिम मावळ्याची सभागृहात गर्जना!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
नगरसेवक गफूर पठाण
नगरसेवक गफूर पठाण

 

पुणे महानगरपालिकेच्या मुस्लिमबहुल कोंढवा खुर्द-कौसरबाग प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक गफूर पठाण यांनी आपल्या पहिल्याच भाषणात शिवविचारांचा जागर केला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बोलताना त्यांनी शिवरायांच्या नावाचा जयघोष करत सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश दिला. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे गफूर पठाण यांना जनतेने दिलेला कौल हा त्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शिवविचारांच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा परिपाक मानला जात आहे. 

भाषणाची दमदार सुरुवात 

गफूर पठाण यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. पुणेकरांनी शहराच्या हितासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. आज या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशा शब्दात त्यांनी संपूर्ण पुणेकर आणि आपल्या प्रभागाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे हे सभागृह आहे. माननीय महापौर आणि उपमहापौर यांनी एका आदर्श राजाप्रमाणे पुरोगामी विचार घेऊन सर्वांना न्याय द्यावा. मते, न्याय, समता आणि बंधुत्व ही शिवरायांच्या स्वराज्याची मुख्य सूत्रे होती आणि तीच या सभागृहात राबवली जावीत, अशी इच्छा मी व्यक्त करतो." 

शिवरायांचा 'मुस्लिम मावळा' 

सभागृहात स्वतःची ओळख करून देताना त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा' हा शब्दप्रयोग केला. ते म्हणाले, "आम्ही या सभागृहात नेहमीच सर्व जाती-धर्माच्या कल्याणाचे विचार मांडत असतो. कोंढवा परिसराच्या विकासासाठी मी सदैव लढत राहीन. शिवरायांच्या सैन्यात जसे सर्व धर्माचे मावळे निष्ठेने काम करत होते, त्याच निष्ठेने आपण शहराची सेवा करत राहू."

कोंढव्यातील शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा
 

गफूर पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुस्लिमबहुल कोंढवा परिसरात अत्यंत दिमाखात शिवजयंती साजरी करत आले आहेत. राजांची मनमोहक मूर्ती, पारंपरिक पालखी, फुलांनी सजवलेला रथासह ढोल-ताशे आणि तुतारीच्या नादात येथे शिवजन्मोत्सव साजरा होतो. पोवाड्यांमधून उलगडणारी महाराजांची शौर्यगाथा आणि भगवे फेटे बांधून मोठ्या संख्येने सहभागी झालेला मुस्लिम समाज, हे चित्र कोंढव्यात दरवर्षी पाहायला मिळते. गफूर पठाण यांच्या नेतृत्वाखालील 'मुस्लिम मावळा फाउंडेशन'च्या वतीने या सर्वधर्मीय सोहळ्याचे आयोजन केले जाते. यामध्ये विशेषतः महिला आणि शालेय विद्यार्थीही उत्साहाने सहभागी होतात.

संघर्षाकडून विकासाकडे वाटचाल

नगरसेवक पठाण यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विकासासाठी होणाऱ्या संघर्षावर भाष्य केले. ते म्हणाले की, "पूर्वी आपण सर्वच जण आपल्या प्रभागातील कामांसाठी हट्ट धरत होतो. त्यासाठी आपण संघर्ष केला आहे. आता पुन्हा तशी संघर्षाची वेळ येऊ नये." पुणेकरांच्या हितासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने आणि गटनेत्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली. विशेषतः कोंढवा आणि परिसरातील प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी ते आग्रही होते.

अजित पवारांच्या विचारांचे स्मरण 

गफूर पठाण यांनी आपल्या राजकीय प्रवासातील मार्गदर्शक अजित पवार यांचाही उल्लेख केला. "आदरणीय दादांनी जो आदर्श आणि विचारांचा पायंडा घालून दिला आहे, त्याचे आम्ही पाच वर्षे पालन करू. अजितदादांच्या विचारांनीच आम्ही या सभागृहात वावरण्याचा प्रयत्न करू," असा शब्द त्यांनी सभागृहाला दिला. 

पुणे महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक सभागृहात गफूर पठाण यांनी दिलेले हे भाषण सामाजिक सलोखा आणि विकासाची नवी दिशा देणारे ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजंच्या विचारांचा जागर करून त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा प्रवास यशस्वीपणे सुरू केला आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter 



Latest News