प्रज्ञा शिंदे
शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा,
म्हणून म्हणती छत्रपती शिवाजी माझा जाणता राजा...
छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून का ओळखलं जातं, याची साक्ष या ओळींमधून मिळते. त्याकाळातील इतर राजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण आणि वैशिष्ट्ये हेच की, त्यांनी आपल्या राज्यात सर्व जाती-जमाती आणि धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली आपल्या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. शिवरायांनी राज्यकारभारात दाखवलेली ही सहिष्णुवृत्ती महाराष्ट्राच्या संस्कृतीतही उतरली. आणि त्याचाच परिपाक म्हणजे पुढे महाराष्ट्र पुरोगामी आणि आधुनिक राज्य म्हणून आकाराला आले.
या पुरोगामी आणि सहिष्णू म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात, गेल्या काही काळापासून वारंवार धार्मिक तणावाची स्थिती निर्माण होत आहे. १४ जुलै रोजी कोल्हापूरजवळील गजापूर येथे अशीच एक हिंसक घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. या घटनेनंतर कोल्हापूरातील आणि महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम संबंध बिघडतात की काय, एकमेकांशी असलेले ऋणानुबंध संपतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ही घटना घडली त्या मुसलमानवाडीचे ग्रामस्थ धर्मापलीकडे जात या कठीण प्रसंगात एकमेकांसाठी उभे राहिले आणि धार्मिक तेढ पसरवण्याचा समाजकंटकांचा डाव त्यांनी उधळून लावला.
कोल्हापूरजवळ असलेल्या विशाळगडावरील मलिक रेहान दर्गाच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी काही काळापासून जोर धरु लागली होती. त्यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळू लागला. स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्या अंदाजे २०० जणांचा एक गट १४ जुलैला विशाळगडाच्या दिशेने निघाला. मात्र विशाळगडापासून तीन किलोमीटर अलीकडेच असलेल्या गजापूरमधील मुसलमानवाडी या गावात येताच, या जमावाने अतिशय सुनियोजित पद्धतीने गावकऱ्यांवर हल्ला केला. त्यावेळी गावात महिला आणि लहान मुलेच अधिक होती. या हल्ल्यात मुसलमानवाडीतील मस्जिदचेही मोठे नुकसान करण्यात आले.
मुसलमानवाडीवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे, त्याची तीव्रता जगाला कळाली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष गजापूरमधील या छोट्याशा मुसलमानवाडीकडे गेले. तेथील तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांनीही त्या गावापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केले.
मुसलमानवाडीत पत्रकारांना जायला परवानगी होती. ‘आवाज मराठी’च्या टीमने काही दिवसांपूर्वी या गावाला भेट दिली आणि इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. या संवादातून अनेक गोष्टी नव्याने समोर आल्या. गावातील मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याची तीव्रता किती भयानक होती, याचा प्रत्यय या पिडीतांशी बोलताना आला. मात्र पीडितांशी झालेल्या संवादातून आणखी एक विशेष बाब जाणवली ती म्हणजे या गावातील हिंदू-मुस्लिम सौहार्दाची परंपरा…
येथील मुस्लिम ग्रामस्थ हल्ल्याविषयीच्या यातनांविषयी बोलत होते, मात्र त्याचवेळी ‘हल्ला करणारे स्थानिक नव्हते,’ असं वारंवार सांगत होते. गावात शेकडो वर्षांपासून हिंदू - मुस्लिमांमध्ये एकोपा आहे, संघर्षाची स्थितीच कधी उद्भवली नाही', असेसुद्धा ते आवर्जून सांगत होते.
मुसलमानवाडीतील ज्या सितारा हॉटेलवर सर्वप्रथम हल्ला झाला, ते रस्त्याच्या कडेला असलेलं एक छोटेसे टपरीवजा हॉटेल. मालक तय्यबअली नाईक इथेच आपल्या कुटुंबियांसोबत राहायचे. हल्ल्याविषयी बोलताना ते भावनिक झाले होते. गावातील हिंदू-मुस्लीम सहजीवनाबाबतही ते भरभरून बोलत होते. ते म्हणाले, "आम्ही पिढ्यानपिढ्या या वाडीत राहतो. परंतु हिंदू-मुस्लीम तेढ किंवा वाद असं याआधी इथे कधीच घडलं नाही. आम्हाला एकमेकांचा त्रासही नाही. शिवजयंती, ईद असो किंवा मोहरम, महाशिवरात्री... सर्व सण आम्ही एकमेकांच्या साथीने साजरे करायचो."
ते पुढे म्हणतात, "रोजच्या व्यवहारातही आम्ही हिंदू-मुस्लीम नसतोच, आम्ही सगळे गावकरी म्हणून जगत असतो. बाहेरून आलेल्यांनी केलेल्या या हल्ल्यानंतर गजापूरमधील वेगवेगळ्या वाड्यांतील हिंदू गावकरी तातडीने आमच्या मदतीला आले.”
तय्यबअली नाईक यांनी आवाज मराठीशी बोलताना असही सांगितलं की ,"ही घटना घडल्यानंतर गाव सोडावं असा विचारही मनात आला होता. सध्या आम्ही जीव मुठीत धरून राहत आहोत. आमच्यावर प्रचंड मोठा आघात झाला आहे. मात्र गावातील इतर मंडळींनी विशेषत: हिंदूंनी दिलेल्या आधारमुळेच आम्ही अजून इथे तग धरून आहोत. "
सितारा हॉटेलमागे असलेल्या घरांवरही या हिंसक टोळक्याने हल्ला केला आणि येथील वाहनांची मोडतोड केली. इतकच नव्हे तर घरातील सदस्यांना विशेषत: मुलांवर आणि महिलांवरही हल्ला केला. इथे राहणाऱ्या महालदार परिवारातील महिलांनी हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्वांच्या डोळ्यात भीती आणि वेदना होत्या. मात्र या सर्वांचा भर गावातील वर्षानुवर्षे टिकून असलेल्या हिंदू-मुस्लिम सौहार्दावरच होता.
‘हल्यानंतर गावातील जवळपास सर्व हिंदू बांधव आमच्या मदतीसाठी आले. त्यांनी विचारपूस करून आम्हाला मोठा आधार दिला. 'तुम्ही घाबरू नका; आम्ही तुमच्यासोबत आहोत' असं आश्वासनही ग्रामस्थांनी आम्हाला दिले.’, अशा भावना महालदार कुटुंबातील महिलांनी व्यक्त केल्या.
पीडितांपैकी एक बोलकी लहान मुलगी म्हणाली, “माझी सगळी वह्या-पुस्तक हल्लेकरूंनी जाळली, माझ्याकडे शाळेत जाण्यासाठी काहीच उरलेलं नव्हतं आणि शाळेत जायची भीतीपण वाटत होती.”
ती पुढे म्हणते, “माझ्याशी माझ्या मैत्रिणी बोलतील की नाही अशी भीती मला वाटत होती. मात्र माझ्या सगळ्या मैत्रिणी मला घरी भेटायला आल्या. त्यांनी माझी आपुलकीने विचारपूस केली. माझे सगळे शिक्षकही घरी आले होते. ‘तुझी सगळी पुस्तक आणि वह्या तुला मिळतील. तू काळजी करू नको, तुझा अभ्यास आणि शिक्षणाचे आम्ही नुकसान होऊ देणार नाही’ अशी खात्री त्यांनी मला दिली, त्यामुळे मला आधार मिळाला.”
पीडितांसाठी धावून जाणारे गजापूरचे माजी सरपंच संजय पाटील
संजय पाटील हे गावचे माजी सरपंच. महालदार कुटुंबातील स्त्रियांनी बोलताना, त्या वारंवार संजय पाटील यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करत होत्या. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्या पुन:पुन्हा आभार मानत होत्या. हे सांगताना, त्या भावूक झाल्या होत्या. भावनांना वाट मोकळी करून देताना, त्यापैकी एक महिला म्हणाली, "संजय पाटील हे माझ्या मुलाशी भावाप्रमाणे वागतात. या सगळ्या कठीण काळात संजूदादांनी आम्हाला खूप मदत केली."
.jpg)
'आवाज'शी बोलताना त्या पुढे म्हणतात, "आमच्यावर हल्ला झाल्या-झाल्या आम्ही संजू दादांना फोन केला. या हल्ल्याविषयी ऐकल्यावर दादा लगेच इकडे यायला निघाले. मात्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी रस्ता बंद केल्यामुळे, दोन तासांनी ते कसेबसे इथं पोहोचले. त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. काहीवेळातच ते निघाले आणि पत्नीसह जेवण घेवून परत इथं आले. रात्री बारा-एकपर्यंत ते आमच्यासोबत होते. आम्ही गर्भगळीत झालो होतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी यायचा आग्रहही केला." पुढं त्या म्हणतात," सकाळ होत नाही तोच संजूदादा परत विचारपूस करायला आले. आमच्यासाठी त्यांनी जे काही केल ते कोणी आपली व्यक्तीही करणार नाही."
संजय पाटील यावर म्हणतात, "गावात हिंदू मुस्लिम ऐक्याची मुळे खोलवर रुजलेली आहे. मी स्वतःचे हॉटेल या मुस्लीम बांधवाना चालवण्यासाठी दिले आहे. या काळात ग्रामस्थांना मानसिक आणि भावनिक आधार देणे, त्यांना लागेल ती मदत पुरवणे हे माणूस म्हणून माझे कर्तव्यच होते."
मुसलमानवाडी जवळच असलेल्या पांढरेपाणी गावातील हिंदू ग्रामस्थांनीदेखील हिंसक हल्ल्याबद्दल हळहळ व्यक्त केली आणि या घटनेचा निषेध केला. कोल्हापूरची खरी ओळख हिंदू-मुस्लिम सौहार्द हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्याला शाहू विचारांचा वारसा आहे. गजापूर हल्ल्यानंतर हिंदू-मुस्लीम सौहार्दाची ही वीण उसवते की काय अशी भीती सर्वांना वाटत होती. मात्र अशा हल्ल्यांनी ही वीण उसवणार नाही तर ती आणखी घट्ट होईल, याचा प्रत्यय गजापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी पिडीत मुस्लिमांसाठी केलेल्या मदतीतून आला.
मुसलमानवाडीत झालेला हा हल्ला महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वात भयानक हल्ल्यापैकी एक आहे. मात्र गावातील आणि परिसरातील हिंदू बांधवांनी या गावातील मुस्लिमांना केलेली मदत आणि दिलेला मानासिक आधार हिंदू-मुस्लिम यांचे नाते, सौहार्द आणखी दृढ, अधिक घट्ट करणारा ठरला. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा समाजकंटकाचा प्रयत्न या गावकऱ्यांनी हाणून पाडला आहे, हे मात्र खरे! .