तामिळनाडू,
रमजानच्या काळात तिरुचिरापल्ली येथील खजामलाई जवळच्या जे.के. नगरमधील एका घरातून दररोज रात्री ८ वाजल्यानंतर तूप आणि मसाल्यांचा खमंग सुवास दरवळू लागतो. हे घर सेल्वी राजेश्वरी यांचे आहे. शहराच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी अन्नाची पाकिटे तयार करण्यात राजेश्वरी सध्या व्यस्त आहेत. जेव्हा संपूर्ण शहर झोपेच्या तयारीत असते, तेव्हा राजेश्वरी शेगडीवर मोठी भांडी चढवतात, कांदा चिरतात आणि तांदूळ धुवून मोठ्या कढईत टाकतात. हिंदू धर्मीय असूनही त्या आज रमजानच्या परंपरेचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रमजानच्या पवित्र महिन्यात त्या स्वयंपाक करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेहरी तयार करण्यात मदत करत आहेत. या उपक्रमाची सुरुवात त्यांचे भाडेकरू प्राध्यापक माईदीन अब्दुल कादर यांनी केली होती. बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर सेहरी मिळवण्यासाठी करावी लागणारी ओढाताण पाहून ते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः अन्न शिजवून त्याचे मोफत वाटप सुरू केले. एका छोट्या स्तरावर सुरू झालेल्या या उपक्रमाचे आज मोठ्या सेवेत रूपांतर झाले असून १०० ते २०० हून अधिक विद्यार्थ्यांना दररोज जेवण दिले जाते.

या संपूर्ण प्रक्रियेत राजेश्वरी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कांदा सोलण्यापासून ते शेगडी पेटवण्यापर्यंत आणि अन्नाची पाकिटे बांधण्यापर्यंत त्या माईदीन आणि त्यांच्या आई फातिमा यांच्यासोबत काम करतात. तूप भात, कुस्का, व्हेज बिर्याणी, डाळ भात आणि टोमॅटो भात यासोबत उकडलेली अंडी अशा पदार्थांचे वाटप केले जाते.
याबाबत माध्यमांशी बोलताना राजेश्वरी सांगतात, “फातिमा आणि त्यांचा मुलगा उपवास करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी सेहरीचे जेवण तयार करतात. ते दररोज रात्री ८ वाजता कामाला लागतात आणि मी त्यांना मदत करते. मला जात किंवा धर्म न पाहता माणुसकीची सेवा करायची आहे. यातून मला मानसिक शांती मिळते.”
रात्री ११ वाजेपर्यंत अन्नाची पाकिटे तयार होतात. त्यानंतर माईदीन प्रवासाला निघतात. के.के. नगर, सुब्रमण्यपुरम आणि सेथुरापट्टी अशा ५० किलोमीटरच्या परिसरात फिरून ते सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांच्या वसतिगृहात ही पाकिटे पोहोचवतात. हे काम पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू असते. मित्रमंडळी आणि चॅरिटेबल संस्थांच्या मदतीतून हा खर्च भागवला जातो. मात्र राजेश्वरी यांच्या सहभागामुळे या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे. राजेश्वरी याकडे साधेपणाने पाहतात. त्या म्हणतात, “मी जे काही करत आहे ते मला आवडते, त्यातून मला समाधान मिळते.”

जामिया अनवरुल उलूम अरबी कॉलेजमधील शिक्षक एन. मोहीद्दीन अब्दुल कादर आणि त्यांची टीम १९ फेब्रुवारी रोजी रमजान सुरू झाल्यापासून दररोज रात्री ११ ते पहाटे ४:३० या वेळेत ही सेवा देत आहे. दुपारपर्यंत या जेवणाची नोंदणी केली जाते. विशेष म्हणजे ही सर्व तयारी राजेश्वरी यांनी विनामूल्य दिलेल्या जागेत केली जाते.
कोविड-१९ महामारीच्या काळात सुरू झालेला हा प्रवास आजही सातत्याने सुरू आहे. राजेश्वरी यांच्या स्वयंपाकघरात मसाल्यांप्रमाणेच विविध धर्मही एकरूप झाले आहेत. तिरुचिरापल्लीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी रमजानमध्ये मिळणाऱ्या या गरम जेवणामुळे मोठा आधार मिळत आहे. ही पाकिटे पोहोचवणारी राजेश्वरी यांची माया प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे.
तामिळनाडूमध्ये हिंदू माऊलीकडून मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी 'सेहरी'ची मेजवानी#TamilNadu #Hindu #Muslim #Unity #student #hindumuslim #unityindiversity #food #mealsforkids #religious #Harmony #Brotherhood #awazmarathi pic.twitter.com/gRlq4GZV5e
— Awaz - The Voice मराठी (@awaz_marathi) February 25, 2026
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -