जीव धोक्यात घालत रिक्षाचालक जहीरने 'असा' पकडून दिला सोनसाखळी चोर; हैदराबादमधील थरारक घटना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 54 m ago
रिक्षाचालक मोहम्मद जहीर यांचा पोलिसांतर्फे सन्मान
रिक्षाचालक मोहम्मद जहीर यांचा पोलिसांतर्फे सन्मान

 

अनेकदा रस्त्यावर एखादा गुन्हा घडताना लोक बघ्याची भूमिका घेतात किंवा तिथून काढता पाय घेतात. पण, हैदराबादमधील एका सामान्य रिक्षाचालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका सराईत गुन्हेगाराला पकडून दिले. मोहम्मद जहीर असे या धाडसी रिक्षाचालकाचे नाव आहे. या घटनेने केवळ एका महिलेचे दागिनेच वाचले नाहीत, तर समाजासमोर नागरी कर्तव्य आणि निस्वार्थ भावनेचा एक मोठा आदर्श उभा राहिला आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर अचानक हल्ला

ही घटना ४ मार्च रोजी पहाटे हैदराबादच्या बेगम बाजार येथील झिंसी चौरस्ता परिसरात घडली. मंजू ओमलता या आपल्या सुनेसोबत नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. हिंदी मारवाडी विद्यालय शाळेजवळ पोहोचताच, डबीरपुरा येथील मोहम्मद सोहेल या सराईत गुन्हेगाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओरबाडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सोहेलचे त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला. घाबरलेल्या मंजू यांनी मदतीसाठी जोरात आरडाओरडा सुरू केला.

आरशात पाहिले आणि रिक्षा थेट गुंडाच्या अंगावर घातली

नेमक्या त्याच वेळी मोहम्मद जहीर हा रिक्षाचालक तिथून जात होता. तो घटनास्थळावरून सुमारे १०० मीटर पुढे गेला होता. पण, महिलेची किंकाळी ऐकून त्याने रिक्षाच्या 'साईड मिरर'मधून मागे पाहिले. घडत असलेला प्रकार लक्षात येताच त्याने एका क्षणाचाही विलंब न लावता आपली रिक्षा वेगाने 'रिव्हर्स' घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सोहेलच्या दुचाकीला जहीरने आपल्या रिक्षाने जोरदार धडक दिली आणि त्याला खाली पाडले.

काठीने हल्ला होऊनही डगमगला नाही 

धडक बसल्याने संतापलेल्या सोहेलने जहीरवर काठीने जोरदार हल्ला केला. पण जहीर अजिबात डगमगला नाही. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून सोहेलचा निकराने प्रतिकार केला आणि त्याला पळून जाण्यापासून रोखले. थोड्याच वेळात पोलिसांचे गस्ती पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी सोहेलला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, गुन्हेगाराला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर जहीरने कोणाकडूनही कोणत्याही कौतुकाची किंवा बक्षिसाची अपेक्षा ठेवली नाही. स्वतःची ओळख लपवून त्याने गुपचूप तिथून काढता पाय घेतला.

'सीसीटीव्ही'मधून उलगडला निस्वार्थ हिरोचा चेहरा

पीडित महिलेने जेव्हा गोशामहल पोलिसांना या रिक्षाचालकाच्या शौर्याची कथा सांगितली, तेव्हा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये जहीरची सर्व धाडसी दृश्ये कैद झाली होती. रिक्षाच्या नंबरवरून आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी या 'अज्ञात हिरो'चा शोध घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद सोहेल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्तांकडून विशेष सन्मान

सोमवारी बंजारा हिल्स येथील कार्यालयात हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांच्या हस्ते मोहम्मद जहीर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना रोख रक्कम आणि प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी गोलकोंडा झोनचे डीसीपी जी. चंद्रमोहन आणि गोशामहलचे एसएचओ श्रावण कुमार उपस्थित होते.

जहीर यांच्या धाडसाचे कौतुक करताना पोलीस आयुक्त म्हणाले, "आजकाल डोळ्यांसमोर गुन्हे घडत असतानाही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा काळात एका सराईत गुन्हेगाराला रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा जहीर हा समाजासाठी एक खरा 'रोल मॉडेल' आहे. त्याच्या आत एक उत्तम 'पब्लिक पोलीसमन' दडलेला आहे. त्याने कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा केली नाही. समाजातील अशा जबाबदार नागरिकांमुळेच गुन्हेगारांवर वचक बसतो."

नागरिकांनी जहीरसारखे धाडस दाखवून गुन्ह्यांच्या वेळी न घाबरता तातडीने १०० नंबरवर डायल करून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter