आवाज-द-व्हॉईस/नवी दिल्ली
मोहरम २०२६ च्या दरम्यान देशाच्या विविध भागांतून हिंदू-मुस्लिम सलोख्याची अनेक सुंदर उदाहरणे समोर आली आहेत. कुठे हिंदू समुदायाने ताजीया काढला, तर कुठे शिया अलमच्या मिरवणुकीचे जंगी स्वागत करण्यात आले. याच दरम्यान केरलमधील कासरगोड जिल्ह्यातून हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. इथे एका मुस्लिम महिलेने कॅन्सरने ग्रस्त असलेल्या एका हिंदू व्यक्तीची केवळ शेवटच्या क्षणापर्यंत काळजीच घेतली नाही, तर त्यांच्या निधनानंतर हिंदू रीतिरिवाजांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले.
ही घटना सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. लोक या घटनेला माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक जबाबदारीचे एक अनोखे आणि जिवंत उदाहरण मानत आहेत.
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नारायणन असून त्यांचे वय ६४ वर्षे होते. ते केरलमधील कासरगोड जिल्ह्यातील मंजेश्वरम क्षेत्रातील चिग्रुपडावु येथील रहिवासी होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नारायणन हे मागील सुमारे १ महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचे निधन झाले.
या संपूर्ण घटनेत कासरगोड जिल्हा पंचायतीच्या विकास समितीच्या अध्यक्षा इरफाना इक्बाल यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली. इरफाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १ महिन्यापूर्वी नारायणन हे कासरगोड येथील एका दुकानाच्या व्हरांड्यात अत्यंत अशक्त आणि असहाय्य अवस्थेत आढळून आले होते. स्थानिक वॉर्ड सदस्याकडून ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला या घटनेची कल्पना दिली.
त्यानंतर एका स्थानिक सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने नारायणन यांना प्राथमिक उपचार मिळवून देण्यात आले. सुरुवातीला त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात पाठवण्याची योजना होती. परंतु वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कॅन्सरची लास्ट स्टेज असल्याबाबात कळाले. त्यांची अत्यंत गंभीर परिस्थिती पाहता, त्यांना थेट कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अखेर त्यांची जीवनाची लढाई संपली. नारायणन यांच्या निधनानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास साफ नकार दिला.
अशा अत्यंत कठीण प्रसंगी इरफाना इक्बाल यांनी स्वतः पुढे येत मोठी जबाबदारी अंगावर घेतली. पोलिसांची रीतसर परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः नारायणन यांचा पार्थिव देह ताब्यात घेतला. कासरगोडमधील उप्पला येथील हिंदू स्मशानभूमीत संपूर्ण हिंदू धार्मिक रीतिरिवाजांनुसार त्यांनी नारायणन यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
एका बुर्का परिधान केलेल्या मुस्लिम महिलेने हिंदू परंपरेनुसार अंत्यविधी पार पाडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. खूप मोठ्या संख्येने लोक इरफाना यांच्या या पवित्र कार्याचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेला माणुसकीचा खरा विजय म्हटले आहे.
पत्रकार वसीम अकरम त्यागी यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील 'एक्स' या व्यासपीठावर लिहिले की, मृत नारायणन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडलेले होते. असे असूनही इरफाना यांनी कोणताही भेदभाव न ठेवता त्यांना मोठी मदत केली. त्यांनी आजारपणात त्यांच्या उपचाराची चोख व्यवस्था केली आणि निधनानंतर त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक निरोप दिला.
इरफाना इक्बाल यांनी या घटनेबाबत फेसबुकवर एक अत्यंत भावनिक संदेशही शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, "कोणताही जवळचा नातेवाईक पुढे आला नाही. मी एका मुलीप्रमाणे नारायणन यांच्यावर अंत्यसंस्कार केले. माणुसकी हा धर्म आणि राजकारणापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे."
भविष्यातही आपण अशा बेवारस आणि गरजू वृद्ध नागरिकांना मदत करत राहू, असा निर्धार इरफाना यांनी व्यक्त केला आहे. त्यांची संस्था यापूर्वीही अनेक अनाथ आणि लावारिस लोकांचे अंत्यसंस्कार त्यांच्या स्वतःच्या धार्मिक रीतिरिवाजांनुसार करत आली आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या घटनेने पुन्हा एकदा हाच मोठा संदेश दिला आहे की, मानवी संवेदना या कोणत्याही धर्म, जात किंवा विचारसरणीच्या गुलाम नसतात. जेव्हा हक्काची नाती साथ सोडतात, तेव्हा माणुसकीच माणसाचा सर्वात मोठा आधार बनते. केरलच्या इरफाना इक्बाल यांनी उचललेले हे पाऊल आजच्या समाजासाठी एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.