सामाजिक सौहार्द जपणाऱ्या कोल्हापूरी संस्कृतीचा विसर पडू नये म्हणून...

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 2 Years ago
बाबू जमाल दरगाह, कोल्हापूर
बाबू जमाल दरगाह, कोल्हापूर

 

हिंदू मुस्लीम सौहार्दाचे प्रतिक असणाऱ्या आणि आपल्या पुरोगामित्वामुळे महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्या कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तणावाचे वातावरण आहे. कोल्हापूरची आणि महाराष्ट्राची ही खचितच संस्कृती नाही. काय आहे समन्वयाची कोल्हापुरी संस्कृती? सांगताहेत ५० वर्षांपासून पत्रकारिता करणारे आणि सर्वधर्म समन्वयासाठी ‘अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी’ सुरु करणारे कोल्हापूरकर डॉ. सुभाष देसाई...   

आम्ही साठ वर्षांपूर्वी ज्या वेळेला खेडे सोडून कोल्हापूरला आलो, तेही फक्त उच्च शिक्षणासाठी. तेव्हा कोल्हापूर कसं होतं? फार सुंदर, छोटं शहर होतं! कोणी उपाशी मरत नव्हतं. माणुसकी होती. दिलदारपणा होता. इकडे अल्लादियाखानचा पुतळा होता. तिकडे आबालाल रहमान मास्तरची चित्रं होती. अंबाबाईला नवस बोलणाऱ्या आमची मुसलमान भगिनी होत्या. तर आमचे बहुतेक टेलर मुसलमानच होते. फळं घ्यायची झाली तरी ती हक्काने आणि प्रेमाने देत असत. 

हिंदू-मुसलमान असा भागच नव्हता. मुसलमानांना माहीत नव्हतं ते मुसलमान आहेत आणि हिंदूनांही माहित नव्हतं ते हिंदू आहेत. बाबू जमालच्या दर्ग्यावरचा गणपती कोणाही मुसलमानाला खटकला नाही. किंवा आत जाऊन कवड्या उदाचा वास घेताना हिंदूंना कधीही संकोच वाटला नाही. साऱ्या सणावाराला एकमेकांच्या घरी स्वयंपाक घरापर्यंत हक्काने जाणारी ही मंडळी आज कुठल्या थराला आली?

प्रश्न होते ज्वारीचा दर चार आणे किलोला वाढला लाल बावटे की जय करत मोर्चा निघायचा व्यापाऱ्यांच्या वर प्रशासनाचा दबाव यायचा अशीही विकासाची कल्पना होती. समाजाच्या तळागाळातल्या माणसाच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेशी जोडलेली, माझ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे बोनस मिळाला पाहिजे; या मानव हक्क बजावणीसाठी संप मोर्चे निघायचे.. पाकिस्तानच्या गोगा पैलवान किंवा सादिक पंजाबी कुस्ती जिंकली की त्याला फेटा बांधून चांदीची गदा देऊन हत्तीवरून मिरवणूक काढावी ती कोल्हापूरकरांनीच!

कोल्हापूर अशांत होते म्हटले की जिल्हाधिकारी डीएसपी शहरातल्या महत्त्वाच्या लोकांना विश्वासात घ्यायचे. आदराने बोलवायचे. त्यात प्राचार्य एम आर देसाई, दाभोलकर, श्रीपतराव बोंद्रे, सखाराम बापू खराडे, लेफ्टनंट जनरल थोरात, मदन मोहन लोहिया, माजी खासदार व्ही टी पाटील, रत्नाप्पाण्णा अशी मंडळी होती. या सर्वांना मानणारे अनेक लोक होते. त्यांच्या शब्दाला मान होता. त्यामुळे कधी कोल्हापूरमध्ये जाती दंगली झाल्या नाही. विविध पक्ष विविध जाती धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदत होते.

जनतेला शिक्षणाच्या माध्यमातून माणुसकीचे धडे गिरवता यावेत यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी हिंदू-मुस्लिम भेदभाव न करता दोन्ही समुदायासाठी कोल्हापुरात वसतीगृहं स्थापन केली. छत्रपती शाहू महाराजांनी आणि राजाराम छत्रपतींनी आपली भूमिका कल्याणकारी राजा अशी ठेवली होती. त्यामुळे कोल्हापुरात संगीत, नृत्य, गायन, नाट्य, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कला बहरल्या होत्या. वृत्तपत्रेही स्वतंत्र होती. परखड होती. समाजिक प्रश्नांची जाण असणारी होती. ती विकली गेलेली नव्हती. साहित्य असो किंवा राजकारण, महाराष्ट्राला जी अनेक मोठी माणसे लाभली ती कोल्हापूरच्या पुरोगामी मुशीमध्ये वाढलेली होती. ते संस्कार त्यांच्यावर शेवटपर्यंत होते. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई ही मंडळी कोल्हापूरच्या भूमीला कधी विसरले नाहीत. वाय. पी. पवार यांच्यासारख्या उद्योगपतींनी आपल्यासारखे अनेक उद्योगपती निर्माण केले. रेल्वे असो वा विमानतळ... यासाठी ते सगळे झटले.

आता हे सगळं आठवायला लागलं की स्वप्नवत वाटायला लागतं. आजचं खुन्नस धरलेलं राजकारण जात्यंधता, धर्मांधता, पराकोटीचा स्वार्थ, पैशाची हाव, सत्तेची मस्ती ज्ञानाचा अभाव आणि एकमेकांना लुटून खाण्याची वृत्ती... हे सगळं पाहिलं की स्वप्नवत कोल्हापूर आता उध्वस्त झाले आहे असं वाटायला लागतं. याला कारणीभूत कोण आणि कसे, याचा पंचनामा करत बसण्याची ही वेळ नाही. कोल्हापूरची पुढची पिढी एका आराजकाकडे निघाली आहे. हे निराजनक चित्र आहे खरं. पण वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या माणसांना समाजात स्थानच राहिलेलं नाही. आम्ही केवळ भूतकाळाचे भूत मानेवर ठेवून गुलामगिरीचे जीवन जगत आहोत. आणि (मुद्दाम घडविलेल्या) या हिंदू-मुस्लिम भेदभावाला बहुजन समाज बळी पडतोय. हे पाहून तर जास्तच वाईट वाटते, इतकेच!
 
धार्मिक दंगली टाळण्यासाठी या उपाययोजनांचा विचार व्हायला हवा:
 
अ. शिक्षण आणि जागृती: धार्मिक सहभागाच्या विषयाची शिक्षण संस्था,विद्यापीठे, येथे चर्चासत्र आयोजित करा.धार्मिक सामंजस्याच्या मूलभूत सिद्धांतांची जागृती करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन सभा, गोष्टी आयोजित करा.

ब. सामाजिक संपर्क आणि संवाद: विविध सामुदायिक कार्यक्रम आयोजित करा ज्यामुळे सर्वांचे सहभाग वाढतो आणि समरसता स्थापित होते. इंटरफेस डायलॉग सेशन, समूह चर्चा, संगठनांचे मिटिंग्ज आयोजित करा.
मीडिया आणि प्रसार माध्यमे, जबाबदार मीडिया प्रवाह तसेच संवेदनशील आंतरजातीय , आंतरधर्मीय विचारांना प्राधान्य देण्यात यावे. वाद-विवाद असलेल्या मुद्द्यांबाबत सुसंवाद वा तडजोड करण्यासाठी मीडियाला प्रोत्साहन द्या.

क. सरकारी सहाय्य: सरकारी संस्थांनी हिंसेचे समर्थन करू नये. समाजकंटकांना जरब बसवणारी भूमिका घ्यावी.

- डॉ. सुभाष देसाई, कोल्हापूर