महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने पाणी फाउंडेशनच्या साथीने 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६'ची शानदार सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला. हा उपक्रम शेतीचं रूप पालटून टाकणारी एक मोठी लोकचळवळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. येत्या काही वर्षांत राज्यातील तब्बल ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीच्या प्रवाहात आणण्याचं मोठं लक्ष्य सरकारने ठेवलं आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील हजारो शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेहोते.
फार्मर कपचे स्वरूप
'सत्यमेव जयते फार्मर कप' ही शाश्वत शेतीमध्ये सर्वोत्तम काम करण्यासाठी शेतकरी गटांमध्ये होणारी स्पर्धा आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेत शेतकऱ्यांना वैज्ञानिक ज्ञानाची जोड असलेली आणि हवामानाशी सुसंगत शेती करण्याचे धडे दिले जातात.
“या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १८ हजार शेतकरी गट स्थापन झाले आहेत आणि हेच गट महाराष्ट्राच्या कृषी परिवर्तनाची मुख्य ताकद बनतील. यातून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच या उपक्रमाचं सर्वात मोठं यश आहे”, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी या फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी गटांनी सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या उत्पादकतेत सरासरी ७१ टक्के वाढ नोंदवली आहे. एकत्र खरेदी केल्याने शेती साहित्यावरील १५८४ कोटी रुपयांची मोठी बचत झाली. सोबतच, सामुदायिक श्रमातून लागवडीचा खर्च एकरी सुमारे सहा हजार रुपयांनी कमी झाला आणि शेती अधिक फायदेशीर ठरली. याच कार्यक्रमात सरकारने 'स्मार्ट फार्मिंग ॲप'चंही उद्घाटन केलं. विशेष म्हणजे, 'महाविस्तार ॲप' आणि फार्मर कप प्लॅटफॉर्मची सांगड घालून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) मोठ्या प्रमाणावर वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
महिला सक्षमीकरण
या चळवळीतील महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक नवीन कायदा आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
“सध्या 'अल निनो'च्या प्रभावामुळे पावसाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. हे संकट ओळखून शेतकऱ्यांनी तत्काळ जलस्रोतांमधील गाळ काढावा, जलसंधारणाच्या रचना दुरुस्त कराव्यात आणि पाणी साठवण क्षमता वाढवावी”, असं आवाहन त्यांनी केलं.
पाणी फाउंडेशनचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनीही या उपक्रमाचं महत्त्व समजावून सांगितलं. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न शेतकऱ्यांच्या समृद्धीवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले. १८ हजार शेतकरी गटांना योग्य दिशा दाखवण्यासाठी मार्गदर्शकांची भूमिका महत्त्वाची ठरेल, यावर त्यांनी विशेष भर दिला. पावसाळ्याचं आव्हान लक्षात घेता गावागावांत जलसंधारणाची कामं वेगाने पूर्ण करण्याचं आवाहनही आमिर खान यांनी केलं.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही गटशेती आणि सामुदायिक नियोजनाचे फायदे सांगून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. स्वतःच्या नावावर शेतजमीन नसतानाही महिला शेतकरी गट एकत्र येऊन करत असलेल्या शेतीच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केलं.
यशस्वी इतिहास
आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये सुरू केलेल्या 'पाणी फाउंडेशन'ने यापूर्वी 'सत्यमेव जयते वॉटर कप'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो दुष्काळग्रस्त गावांना लोकसहभागातून पाणीदार करण्याची ऐतिहासिक किमया साधली होती. हाच यशस्वी इतिहास पाठीशी असल्याने, आता 'पाण्याकडून समृद्धीकडे' वाटचाल करणारा हा 'फार्मर कप' महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी 'गेमचेंजर' ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.