भक्ती चाळक
९० टक्के मुस्लिम लोकसंख्या, सरपंच-उपसरपंचही मुस्लिम धर्मीय. पण गावात प्रवेश करताच भव्य हनुमान मंदिर डोळ्यांचं पारणं फेडतं. इतकंच नाही, तर ज्या समाजातील लोकांच्या ‘अस्वच्छते’विषयी अनेकदा नाकं मुरडली जातात, त्याच मुस्लिम बहुल गावाने संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतेचा डंका वाजवलाय.
धार्मिक सलोखा, डिजिटल क्रांती, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांचा दिशादर्शक वस्तुपाठ मराठवाड्यातल्या नारायणपूरने संपूर्ण राज्यासमोर ठेवलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेला वसलेल्या गंगापूर तालुक्यातील या गावाने नुकताच देशातील आदर्श गावांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे हे गाव सध्या सोशल मीडियापासून ते शासनदरबारापर्यंत सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले आहे.
मुस्लिमबहुल गावात मंदिराचा जिर्णोद्धार
नारायणपूर बुद्रुक गावात जवळजवळ ९० टक्के मुस्लिम समाज राहतो, तर उर्वरित १० टक्के दलित समाज आहे. संपूर्ण गावात मराठा समाजाचे तर एकही घर नाही. असं असूनही या मुस्लिमबहुल गावाने धार्मिक वारसा जपत सामाजिक सलोखा साधला आहे.
गावात खूप जुने पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. काळाच्या ओघात या मंदिराची मोठी पडझड झाली. गावकऱ्यांना गावातील मंदिराची ही अवस्था पाहावली नाही. सर्वांनी एकमताने मंदिराचे काम करायचे ठरवले. महंतांचा सल्ला घेऊन मंदिरावर भव्य छत उभारले गेले आणि मारुती रायाच्या या प्राचीन मंदिराचा कायापालट करून जिर्णोद्धार करण्यात आला.
या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, या गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लिम गावकरी हनुमान मंदिरापुढे उभे आहेत. तिथून हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. “मंदिर आमचं, मस्जिद आमची आणि बाबासाहेबांचा पुतळाही आमचाच…” असे उद्गार गावकऱ्यांच्या तोंडून निघतायेत.
नारायणपूरचे सरपंच नासिर पटेल यांनी ‘आवाज-द-व्हॉईस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही लहानपणापासून हनुमानाचं ते मंदिर पाहत आलोय. या पुरातन मंदिराची होणारी पडझड आम्हाला बघवली नाही. मग आम्ही गावकरी एकत्र आलो आणी लोकवर्गणीतून हे मंदिर पुन्हा उभारलं.”
ते पुढे म्हणतात, “या मंदिराला छत नव्हते. फक्त चबुतऱ्यावर हनुमंताची मूर्ती होती. मग आम्ही याविषयी महाराजांशी चर्चा केली आणि त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला. आमच्या गावचं वातावरण कायमच सलोख्याचे राहिलंय. आम्ही सर्व निर्णय एकमताने घेतो. तसंच हाही निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला.”
अस्वच्छतेच्या गैरसमजालाही चपराक
धार्मिक सलोखा जपणारे हे गाव पर्यावरणस्नेही म्हणूनही ओळखले जाते. समाजात अनेकदा ‘मुस्लिमबहुल वस्त्या अस्वच्छ असतात’ असा एक पूर्वग्रह असतो. नारायणपूर गावाने आपल्या कर्तृत्वाने या मानसिकतेला सणसणीत चपराक दिली आहे. नारायणपूर बुद्रुक ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत थेट जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शासनाच्या अत्यंत काटेकोर डेस्कटॉप आणि फील्ड मूल्यांकन प्रक्रियेनंतर गावाला राज्यस्तरीय तब्बल ५० लाख रुपयांचे मानाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत या अभियानात गावांची सर्वांगीण तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये नारायणपूरने हरितीकरण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता मोहिमा, जनजागृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन या सर्व घटकांमध्ये अव्वल कामगिरी केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणपूरचे शौचालय
३० वर्षांची एकहाती सत्तेत गावाचे आधुनिकीकरण
एखाद्या गावात सलग ३० वर्षे सरपंच पदावर टिकून राहणे आणि प्रत्येक वेळी लोकांचा विश्वास जिंकणे ही साधी गोष्ट नाही. नासिर पटेल यांनी सलग ३० वर्षे नारायणपूरचे सरपंचपद सांभाळत गावाला स्मार्ट आणि आदर्श गावाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले आहे.
आज गावात प्रवेश करताच सिमेंट काँक्रिटीकरणाचे चकचकीत रस्ते आणि आधुनिक भूमिगत गटार योजना लक्ष वेधून घेतात. गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अत्याधुनिक आरओ फिल्टर प्लांट उभारण्यात आला आहे.
गाव पूर्णपणे कचरामुक्त झाले असून, ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी स्वतंत्र शेडची उभारणी करण्यात आली आहे. गाव शंभर टक्के प्लास्टिकमुक्त असून, संकलित केलेला सर्व प्लास्टिक कचरा प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जातो. स्वच्छतेच्या याच प्रभावी कामांमुळे गावाला आधीच प्रतिष्ठेचा ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार’ मिळालेला आहे.
आदर्श सरपंच सन्मान स्विकारताना नासिर पटेल
खाम नदीचे केले पुनरुज्जीवन
गावाला पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी सरपंच नासिर पटेल, उपसरपंच मजीद पटेल, ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नील घरमोडे आणि ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गावातून वाहणाऱ्या खाम नदीचे खोलीकरण करून जलसंवर्धनाचे मोठे काम करण्यात आले.
नदीकाठी गावकऱ्यांसाठी रॅम्प बनवण्यात आला असून, आजूबाजूला वृक्षारोपण करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. सध्या गावात आंब्याची १ हजार रोपे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येणाऱ्या काळात तब्बल १० हजार झाडे लावून संपूर्ण गावाला हिरवेगार बनवण्याचा संकल्प सरपंच नासिर पटेल यांनी केला आहे.
भौतिक विकासासोबतच सामाजिक विचार जपण्यातही हे गाव आघाडीवर आहे. गावातील दलित वस्तीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा उभारण्याविषयी नासिर अभिमानाने सांगतात, “आम्ही गावात उभारलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तालुक्याचे वैभव आहे आहे. केवळ हा पुतळा उभारण्याचे आमचे ध्येय नव्हते तर त्यांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.”
सरपंच नासिर पटेल यांच्यासमवेत गावकरी
नारायणपूरमध्ये प्रत्येक राष्ट्रीय आणि धार्मिक सण मोठ्या उत्साहाने आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा केला जातो. महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून त्यांचे विचार गावकऱ्यांना दिले जातात. गावात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. शिवरायांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प केला करतात.
या गावात सांस्कृतिक सणही तितक्याच उत्साहात साजरे केले जातात. दिवाळीचा सणला ग्रामपंचायतीचे संपूर्ण कार्यालय परिसर फुलांच्या सजावटीने व रंगीबेरंगी प्रकाशयोजनेने उजळून निघतो. दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत सदस्यांना मिठाई व बोनस दिला जातो, तर गावासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश, शूज, मिठाई आणि बोनसचे वाटप केले जाते.
गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी शिबिरांचे आयोजन
गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी आयुष मंत्रालय (भारत सरकार) यांच्या सूचनेनुसार जिल्हा आयुष कार्यक्रमांतर्गत नारायणपूर येथे मोफत आयुष रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येते.
मुलांना लहानपणापासूनच स्वच्छतेचे धडे देण्यासाठी प्राथमिक शाळेत ‘स्वच्छता योद्धा’ हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. उपक्रमाच्या सुरुवातीला मुलांना ‘चला जाणूया नदीला’ आणि ‘खाम नदी पुनरुज्जीवन अभियान’ यांबद्दल माहिती देण्यात येते. आता या शाळेतील लहान मुलं दर मंगळवारी आपल्या घरून सुका कचरा शाळेत आणतात आणि तो योग्य प्रकारे वर्गीकृत करून जमा करतात.
योग दिनानिमित्त योग करताना गावकरी
नारायणपूर बुद्रुकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील डिजिटल शाळा आणि डिजिटल अंगणवाडी. सध्या गावात ७ वी पर्यंतची शाळा असून, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जातात. मात्र, विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी लवकरच गावात आठवी पासून पुढचे वर्ग सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे. आज गावातील तरुण मोठ्या संख्येने उच्च शिक्षण घेत आहेत.
हे गाव १०० टक्के दारूमुक्त आणि तंटामुक्त आहे. गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण नगण्य आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी गावात २० महिला बचत गट अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत. या माध्यमातून गावातील महिलांनी विविध व्यवसाय सुरू केले असून, त्या खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाल्या आहेत.
भारतातील सहिष्णुतेचा आणि ऐक्याचा हा खरा नमुना आहे. समाजाचं हित साधण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर कोणताही पूर्वग्रह प्रगतीच्या आड येऊ शकत नाहीत, आणि त्याला धार्मिक सलोख्याची जोड मिळाली तर त्या प्रगतीला चार चांद लागतात, हेच नारायणपूर बुद्रुकने दाखवून दिलं आहे.