आनंदाचा क्षण म्हणजेच ईद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

फारूक एस काझी 
 
आनंदाचा क्षण म्हणजेच ईद आपल्या दैनंदिन जीवनात आपण काही शब्द वापरतो खरं, पण त्यांचा नेमका अर्थ मात्र आपणाला ठाऊक असतोच असंनाही. असा एक शब्द आहे 'ईद'. मुळात अरबी भाषेतून आलेला हा शब्द. त्याचा अर्थ काय होतो माहितीय? आनंद. हर्ष. खुशी. म्हणजे कोणताही आनंदाचा क्षण हा ईदच असतो. 'ऊद' या शब्दापासून हा शब्द बनला आहे. 'ऊद' म्हणजे प्रतिवर्षी येणारा. यावरूनच ईद हा शब्द सणाशी जोडला गेला आहे. आपल्या जीवनात अनेक आनंदाचे क्षण येत असतात. तेव्हा जो हर्ष उल्लास असतो, ती ईदच असते. तो सणच असतो. आपण तो क्षण उत्कटतेने जगून घेतो. कारणत्यामागची भावना पवित्र आनंदाची असते. सुखी जीवनाची त्यात आस लपलेली असते. आपण वर्षभर विविध सण साजरे करतो, त्यामागची भावना हीच असते, आनंदाची! सुखाची! आणि त्याहून सर्वांनी एकत्र येऊन भेटण्याची! आपल्या जिवलगांच्या भेटीमुळे आपलं आयुष्य आनंदी तर होतंच, पण ते आणखी काही वर्षानी वाढतंसुद्धा. म्हणून सणाच्या दिवशी एकमेकांना भेटण्याचा रिवाज सुरू केला गेला आहे. 

आपल्या प्रिय व्यक्तीचं दर्शन ही पण ईदच, आपल्यातील अवगुणांनातिलांजली देऊन नवीन व्यक्ती म्हणून उभं राहणं म्हणजे पण ईदच! शायर तर आपल्या प्रेयसीच्या दर्शनाला ईद म्हणतात. कुणी भेटलंच नाही तर सहज विचारलं जातं, "आजकाल ईदचा चंद्र झालाय?" आणि म्हणून अशा व्यक्तीच्या भेटीची ओढ जास्त असते. वसंत ऋतू सुरू झाला आणि निसगने आपली ईद साजरी करायला सुरुवात केली. म्हणायला उन्हाळा पण निसर्ग कितीतरी रू्प बदलून सामोरा येतो आहे.कडुनिंबाच्या फुलांचा मंद सुवास सगळीकडे दरवळू लागला आहे. अशात नवीन पालवी आणि नवीन वर्षाची चाहूल लागते. गुढीपाडवा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. निसर्गानं बहाल केलेला हा एक आनंदोत्सवच! नवीन वर्ष आनंदाने भरलेलं आणि बहरलेलं जावं अशी दुआच जणू निसर्ग आपणाला देत असतो. त्याची ही भावना कितीपवित्र आणि निरामय असते. हा एक प्रकारे इदोत्सवच असतो. पवित्र भावनेचा आणि कल्याणाचा! आपण जीवनात अशी आनंदोत्सवाची संधी शोधली की तोच आपला सण आणि तीच आपली ईद होते. फक्त अशा आनंदाला खुल्या मनाने स्वीकारलं पाहिजे.
 
- फारूक एस काझी