रमजानमध्ये लाउडस्पीकरच्या वापराबाबत नियमावली जाहीर करा; मुंबईतील मुस्लिम वकिलांची प्रशासनाकडे मागणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रमजानचा पवित्र महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लिम वकील, विधी शाखेचे विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने सरकारला पत्र लिहून रमजान महिन्यात लाउडस्पीकरच्या वापरासाठी शहराच्या गरजेनुसार 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' (SOP) तयार करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही काळापासून मुंबईत मस्जिदवरील लाउडस्पीकरवरून मोठा वाद सुरू आहे. प्रशासनाने कारवाई करत अनेक ठिकाणचे लाउडस्पीकर उतरवले आहेत. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, रमजानमध्ये सेहरी आणि इफ्तारच्या वेळी लाउडस्पीकरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊनच या तरुण वकिलांनी प्रशासनाकडे विशेष नियमावलीची मागणी केली आहे.

परवानगी प्रक्रियेतील अडचणी आणि भीती

या मागणीचे नेतृत्व करणारे ॲडव्होकेट फैयाज आलम यांनी सांगितले की, "रमजानचा महिना सुरू होत आहे. लाउडस्पीकरच्या परवानगीसाठी खूप मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, याची भीती लोकांच्या मनात आहे. कारवाईच्या भीतीने अनेक ठिकाणी लाउडस्पीकर उतरवले जातात, ज्यामुळे लोकांना सेहरी आणि इफ्तारच्या वेळी अजानचा आवाज ऐकू न आल्याने अडचणींचा सामना करावा लागतो."

दुसरे वकील, ॲडव्होकेट सलमान अंसारी यांनी सांगितले की, "ज्याप्रमाणे प्रशासन रमजानमध्ये रात्री खाद्यपदार्थांची दुकाने उशीरापर्यंत खुली ठेवण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करते, त्याचप्रमाणे लाउडस्पीकर वापरासाठीही एक SOP जारी करावी. जेणेकरून मस्जिद व्यवस्थापनाला स्थानिक पोलिसांना त्या नियमावलीचा हवाला देऊन लाउडस्पीकर वापरण्याची परवानगी मिळवणे सोपे जाईल."

डेसिबल मर्यादेचे पालन करण्याची तयारी

विधी शाखेचा विद्यार्थी फैज अली खान म्हणाला, "लाउडस्पीकरवरून मागे जो वाद झाला होता, तसा पुन्हा होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. रमजानमध्ये याची विशेष गरज असते. त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करत आहोत की, त्यांनी ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेत (आवाजाच्या पातळीत) राहूनच लाउडस्पीकर वापरण्याची परवानगी द्यावी. यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि कायद्याचे पालनही होईल."

या गटाने राज्याचे मुख्य सचिव, पोलीस आयुक्त, बीएमसी आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून विनंती केली आहे की, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हे स्पष्ट असावे की लॉक केलेल्या डेसिबल मर्यादेचे छोटे, बॉक्स-टाइप स्पीकर केवळ रमजान महिन्यात वापरण्याची परवानगी दिली जावी.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार (२०००), रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाउडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. व्यावसायिक क्षेत्रासाठी आवाजाची मर्यादा ६५ डेसिबल, तर निवासी क्षेत्रासाठी ५५ डेसिबल आहे.

अद्याप अधिकृत उत्तर नाही

वकिलांच्या या पत्राला अद्याप राज्य सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नाही. मात्र, हे युवा वकील लवकरच एका शिष्टमंडळासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. "कोणताही नवीन वाद निर्माण होऊ नये, इतर समाजाच्या लोकांना त्रास होऊ नये आणि सर्वत्र शांतता राखावी, हाच आमचा उद्देश आहे,"  


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter