मुस्लिम समाजात हळूहळू शिक्षितांची संख्या वाढत चालली आहे. अनेकजण शिक्षणासोबतच व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. मात्र अजूनही शिक्षणाऐवजी किरकोळ व्यवसाय करण्यातच अनेकजण समाधान मानत आहेत. किरकोळ व्यवसाय करणारा बहुतांश वर्ग शिक्षणापासून दूर आहे. त्यांचा मुस्लिम समाजातील शिक्षितांशी संवाद कमी आहे. यामुळे त्यांची व समाजाच्या प्रगतीचा वेग कमी होत आहे. वंचित घटकातील तरुणांना व अशिक्षित व्यावसायिकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील उच्चशिक्षितांनी व समाजसेवकांनी प्रबोधन करावे, अशी अपेक्षा मुस्लिम समाजातील मान्यवरांनी 'आवाज मराठी'शी संवाद साधताना व्यक्त केली.
मुस्लिम समाजातील शिक्षित व आर्थिकदृष्ट्या सघन असलेल्या वर्गाचा वंचित व गरीब घटकांशी वरचेवर संवाद कमी होत आहे. छोट्या मोठ्या व्यवसायात धन्यता मानणारा तरुण वर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शिक्षण सोडून व्यवसाय करण्यातच अनेक तरुण समाधान मानत आहेत. त्याकडे पालकांचेही दुर्लक्ष होत आहे. सध्या समाजात शिक्षित मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्या शिक्षणाच्या बळावर आत्मनिर्भर होत आहेत. त्यांच्या तुलनेने उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण कमी आहे. विवाह जमविताना त्याचाही फटका समाजाला बसत आहे. मुस्लिम समाजातील गरीब घटकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व वाढून त्याद्वारे त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दानशूर घटकांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, अशीही अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मेहमूद नवाज म्हणाले की,"समाजाची प्रगती करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी समाजाच्या सर्व घटकांचा एकमेकांशी सुसंवाद असणे गरजेचे आहे. सध्या केवळ ठराविक कार्यक्रमाच्या निमित्तानेच असा संवाद क्वचितच साधला जात आहे. हे समाजाच्या प्रगतीला बाधक आहे. त्यासाठी उच्चशिक्षितांनी पुढाकार घेऊन प्रबोधन करणे गरजेचे आहे."
प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक गफूर सगरी शिक्षणाचे महत्व पटवून देताना म्हटले की, "पालकांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. सामाजिक संतुलन कसे बिघडते याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. समाजजागृतीसाठी प्रबोधन केले पाहिजे. अनेक तरुणांना सध्या शिक्षणात रस कमी असल्याचे दिसून येते. समाजातील विचारवंतांनी व जबाबदार व्यक्तींनी यासाठी प्रबोधन केले पाहिजे. एकेकाळी शिक्षण घेण्यासाठी मुलींची संख्या कमी होती त्यात सध्या उलटा बदल होत मुले कमी व मुली जास्त शिक्षण घेत आहेत, अशी स्थिती आहे."
ज्येष्ठ विचारवंत तथा निवृत्त मुख्याध्यापक अब्दुल मन्त्रान शेख यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "अनेक तरुण सध्या शिक्षणापेक्षा व्यवसायाला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कुटुंबाचा गाडा ओढला जात असला तरी प्रगतीचा गाडा जैसे थे राहत आहे. दानशूरांनी समाजातील वंचित घटकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्यावर काम केल्यास निश्चित वंचितांच्या प्रगतीचा वेग वाढेल असे वाटते."
अक्कलकोटच्या राहबर फाउंडेशनचे अध्यक्षा हीना बागमारू शेख यांनी पालकांना प्रतिपादन करताना म्हटले की, "पूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे. मिळेल ते काम करणाऱ्या कुटुंबातील पालकांचे मुलांवरील लक्ष कमी झाल्याने मुलांची शिक्षणाची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे शिकलेल्या मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या कमी होणे समाजाच्या प्रगतीसाठी बाधक आहे. त्यासाठी समाजातील विचारवंत व दानशूरांनी प्रबोधनाचा पुढाकार घेण्याची गरज आहे."