मलिक असगर हाश्मी
हिमाचल प्रदेशातल्या नाहन या शांत आणि सुंदर डोंगराळ शहरातून एक अतिशय हृदयस्पर्शी बातमी समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण देशात परस्पर बंधुभाव आणि सलोख्याची एक नवी ज्योत पेटवली आहे. गेल्या काही काळापासून हिमाचल प्रदेशातल्या काही भागात धार्मिक स्थळांवरून थोडे मतभेद आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण भारताची संमिश्र संस्कृती आणि बंधुत्वाची गाठ खूप घट्ट असल्याचं नाहनच्या ऐतिहासिक भूमीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. नाहनमध्ये भगवान श्री जगन्नाथांची भव्य रथयात्रा काढण्यात आली, तेव्हा तिथे अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळालं. या धार्मिक कार्यक्रमात स्थानिक मुस्लिम समाजातल्या लोकांनीही मोठ्या संख्येने पुढे येऊन भगवान जगन्नाथांचं उत्साहात स्वागत केलं. मुस्लिम समाजातल्या लोकांनी रथावर फुलांचा वर्षाव केला, देवाची आरती केली आणि पूर्ण श्रद्धेने 'जय जगन्नाथ'च्या जोरदार घोषणाही दिल्या.
सिरमौर जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या नाहन शहराचा प्राचीन इतिहास आहे. नाहनमधल्या बडा चौक येथे असलेलं श्री जगन्नाथ मंदिर हे उत्तर भारतातल्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानलं जातं. इथे संस्थानाच्या काळापासूनच भगवान जगन्नाथांची यात्रा काढण्याची मोठी परंपरा चालत आली आहे. तरीही वर्ष २००९ पासून 'श्री जगन्नाथ रथ यात्रा मंडळ समिती'ने या कार्यक्रमाला एक भव्य रूप देण्यास सुरुवात केली. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या विशाल रथयात्रेत हिमाचल प्रदेशसह पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातून हजारो भाविक नाहनमध्ये पोहोचले. संपूर्ण शहर भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम यांच्या भक्तीच्या रंगात रंगलेलं दिसत होतं. नाहनच्या ऐतिहासिक चौगान मैदानातून भव्य रथ रवाना झाला आणि शहराच्या विविध रस्त्यांवरून जाऊ लागला. तेव्हा सर्व धर्माच्या लोकांनी आपापल्या परीने या यात्रेचं स्वागत केलं. रथयात्रा पक्का टँक आणि कच्चा टँक इथल्या जामा मशिदीजवळ पोहोचली, तेव्हा तिथलं दृश्य भावूक करणारं होतं. स्थानिक मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी ढोलाच्या तालावर रथाचं जोरदार स्वागत केलं. 'मुस्लिम नवयुवक समिती'चे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिकांनी रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी थंड पाणी, सरबत आणि मिठाईची खास व्यवस्था केली होती. एवढंच नाही, तर मुस्लिम समाजातल्या अनेक तरुणांनी स्वतः पुढे येऊन देवाच्या रथाच्या दोऱ्या ओढल्या.
नाहनमधून समोर आलेले हे बंधुभावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर लाखो लोक ही दृश्य पाहून भारतीय संस्कृतीचं कौतुक करत आहेत. नाहनच्या लोकांनी देशासमोर एक मोठा आदर्श ठेवल्याचं सोशल मीडिया वापरकर्ते म्हणत आहेत. समाजात काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी नाहनसारखी दृश्य एक मोठा संदेश देतात. भारताचं मन नेहमीच एक राहिल्याचं यातून दिसून येतं. एका बाजूला मशिदीजवळ उभे असलेले मुस्लिम तरुण हातात फुलं घेऊन स्वागत करत होते आणि दुसरीकडे 'जय जगन्नाथ'च्या घोषणा घुमत होत्या, असं अनेक लोकांनी लिहिलं. हे दृश्य भारताच्या धर्मनिरपेक्ष संस्कृतीला ताकद देतं. इस्लाम आणि कुराणची मूळ शिकवण सर्व धर्मांबद्दल आदर आणि सामाजिक न्यायाचा मोठा धडा देते. कुराणमध्ये मुस्लिमांना बिगर-मुस्लिमांशी दया, करुणा आणि न्यायपूर्ण वागणूक देण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचं मुस्लिम विद्वानांचं म्हणणं आहे. पवित्र कुराणच्या 'सुरा अल-मुम्ताहिना'च्या आयातीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लिहिली आहे. धर्माच्या नावावर तुमच्याशी कधीच न लढलेल्या लोकांशी चांगलं आणि न्यायाने वागण्यास देव तुम्हाला मनाई करत नाही, असा त्याचा अर्थ आहे. नाहनच्या मुस्लिम समुदायाने याच मानवी आणि धार्मिक शिकवणीचं पालन केलं. स्वतःच्या श्रद्धेवर ठाम राहून त्यांनी शेजारील धर्माबद्दल अफाट आदर दाखवला आहे.
नाहनमध्ये आयोजित या ऐतिहासिक रथयात्रेला अनेक प्रमुख राजकीय आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते. स्थानिक आमदार अजय सोलंकी, माजी आमदार डॉ. राजीव बिंदल आणि सिरमौरच्या जिल्हाधिकारी प्रियंका वर्मा यांनी वैदिक मंत्रोच्चारात देवाची आरती केली आणि रथ ओढला. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शांता कुमार यांनी या घटनेचं कौतुक करत एक विशेष निवेदन जारी केलं. नाहनच्या मुस्लिम समाजाने अतिशय प्रेमाने रथयात्रेचं स्वागत करून भाविकांना मिठी मारली असून हे राष्ट्रीय एकात्मतेचं उदाहरण असल्याचं ते म्हणाले. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा विशेष उल्लेख केला. सर्व नद्या वेगवेगळ्या मार्गांनी वाहून एकाच महासागराला मिळतात आणि अगदी त्याचप्रमाणे सर्व धर्म एकाच परमेश्वराकडे घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
महाप्रभु श्रीजगन्नाथ रथयात्रा के दौरान एक मुस्लिम व्यक्ति अपने हाथों में प्रसाद का एक पैकेट लेकर पहुँचा। उन्हें आशंका थी कि शायद उनका प्रसाद स्वीकार नहीं किया जाएगा। लेकिन वहाँ मौजूद पुजारियों ने उनका सम्मानपूर्वक स्वागत किया और पूरी श्रद्धा के साथ उनका प्रसाद स्वीकार किया। pic.twitter.com/DEkS8d2OsE
— Suyash S (@SuyashS5) July 27, 2026
नाहन शहरात विविध समुदायांमधला प्रेम आणि बंधुभाव ही काही नवीन गोष्ट नाहीये. इथे संस्थानाच्या काळापासूनच हिंदू, मुस्लिम आणि शीख समाजातले लोक एकमेकांच्या सणांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. ईद असो किंवा दिवाळी, गुरुपर्व असो किंवा रथयात्रा, नाहनचा प्रत्येक नागरिक या आनंदात नेहमी सहभागी होतो. रथयात्रेच्या निमित्ताने शहरातल्या व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी लंगर आणि भंडारे आयोजित केले होते. भाविकांसाठी हलवा, कढी-तांदूळ, खीर आणि जलजिरा यांसारख्या पदार्थांचं मोफत वाटप करण्यात आलं. संपूर्ण नाहन शहर पाहुणचार आणि भक्तीभावात बुडालेलं पाहायला मिळालं.
नाहनमध्ये पार पडलेली ही रथयात्रा भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं होतं.. भारताची विविधता हीच त्याची सर्वात मोठी ताकद असल्याचं नाहनच्या या घटनेने सिद्ध केलं आहे. लोक एकत्र उभे राहतात, तेव्हा द्वेषाची प्रत्येक भिंत आपोआप कोसळून पडते.