दिल्लीत जातीय सलोखा राखण्याचे आवाहन; माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांचे अमित शाह यांना पत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
डावीकडून  दिल्लीचे माजी नायब राज्यपाल डॉ. नजीब जंग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
डावीकडून दिल्लीचे माजी नायब राज्यपाल डॉ. नजीब जंग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

नवी दिल्ली,

होळीच्या दिवशी तरुण नाव असलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर उत्तमनगर परिसरात निर्माण झालेला जातीय तणाव या पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी नायब राज्यपाल डॉ. नजीब जंग आणि लष्कराचे माजी उपप्रमुख लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या संवेदनशील घटनेचा वापर करून दिल्लीतील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

डॉ. नजीब जंग आणि जमीर उद्दीन शाह यांनी पत्रात म्हटले आहे की, तरुणचा मृत्यू ही अत्यंत निंदनीय घटना असून आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत गुन्हेगारांना अटक केली आहे. असे असतानाही, अनेक गट, व्यक्ती आणि संघटना उत्तमनगरमध्ये जाऊन तिथली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे, बदला घेण्याच्या हेतूने काही लोक ईदच्या नमाजमध्ये अडथळा निर्माण करण्याच्या धमक्या देत आहेत. हा सरळ सरळ चिथावणी देण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रात पुढे असे स्पष्ट केले आहे की, दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हायलाच हवी, जेणेकरून समाजात एक दरारा निर्माण होईल. मात्र, काही स्वार्थी घटक या घटनेचा फायदा घेऊन दिल्लीतील जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याच्या विशेष सूचना द्याव्यात आणि उघडपणे धमक्या देणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी कळकळीची विनंती या दोन्ही मान्यवरांनी गृहमंत्र्यांना केली आहे. आपल्या मार्गदर्शनामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. १९ मार्च २०२६ रोजी लिहिलेल्या या पत्राने आता दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter