Bakri Eid 2026 : गोवंश कुर्बानी न करण्याचा नांदेडच्या मुस्लिम समाजाचा निर्णय

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
नांदेडच्या वजिराबाद मस्जिदचे इमाम व खतीब मुफ्ती अय्युब कासमी
नांदेडच्या वजिराबाद मस्जिदचे इमाम व खतीब मुफ्ती अय्युब कासमी

 

भक्ती चाळक

अगदी काही दिवसांवर येऊ घातलेला बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून साजरी करण्यासाठी नांदेडच्या मुस्लीम समाजाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदी कायद्याचा पूर्ण सन्मान राखत यावर्षी कोणत्याही गोवंशाची कुर्बानी केली जाणार नाही, असा निश्चय समाजातील सर्व स्तरांतील प्रतिनिधींनी एकत्रितपणे केला आहे.

नांदेडकरांचे ऐतिहासिक पाऊल 

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. अनेकदा बकरी ईदच्या काळात गोवंशाची हत्या केली जाते, असे आरोप मुस्लीम समाजावर होत असतात. अशा घटनांमुळे कायद्याचा भंग तर होतोच, पण सामाजिक वातावरणही गढूळ होते. सणांच्या काळात होणाऱ्या अशा वादांमुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक उत्सवांना गालबोट लागते आणि समाजाची बदनामीही होते. हीच बाब लक्षात घेऊन नांदेडमधील मुस्लीम समाजाने यावेळेस स्वतःहून पुढाकार घेतला आहे.

समाजाने बेकायदेशीर जनावरांची कत्तल न करण्याचा आणि कायद्याचे पुरेपूर पालन करण्याचा निश्चय केला आहे. केवळ निर्णय घेऊन न थांबता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक संघटनांचा एकमुखी निर्णय

“महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार ज्या प्राण्यांची कुर्बानी देण्याची परवानगी आहे त्याच प्राण्यांची कुर्बानी दिली जाईल. गाय, बैलासारख्या गोवंशातील कोणत्याच प्राण्यांचा आम्ही बळी देणार नाही. हा निर्णय आम्ही नांदेडकरांनी सर्वानुमते घेतलाय." असे नांदेडच्या वजिराबाद मस्जिदचे इमाम व खतीब मुफ्ती अय्युब कासमी प्रतिक्रिया देताना म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, "धार्मिक सण शांततेत साजरे व्हावे यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून समाजातील विचारवंत, धर्मगुरू, वकील यांच्याशी चर्चा करत होतो. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलाय आणि याला समाजातून पूर्ण पाठिंबादेखील मिळालाय. कुरेशी समाजाने सुद्धा गोवंशातील कोणत्याही प्राण्याचा बळी देण्यास स्पष्ट नकार दर्शवलाय."

नांदेडमधील सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरूंनी या निर्णयाचे स्वागत करताना स्पष्ट केले की, "गोवंश प्रकारातील कोणत्याही जनावराची कुर्बानी मुस्लीम समाजाकडून केली जाणार नाही. आमच्या समाजातील धार्मिक नेते, राजकीय प्रतिनिधी, कायदेतज्ज्ञ, बुद्धीजीवी आणि सर्व संघटनांनी मिळून हा एकमताने निर्णय घेतला आहे."

विशेष म्हणजे कुर्बानीसाठी आवश्यक असलेली कुरेशी बिरादरी आणि त्यांच्या विविध संघटनांनीही या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. कोणत्याही गोवंश जनावराचा बळी देण्यासाठी येणार नाहीत, यावर त्यांनी सहमती दर्शवली. यासाठी शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठकांचे सत्र पार पडले. या बैठकांमध्ये समाजाच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावून आपली सहमती नोंदवली.

हा निर्णय का महत्त्वाचा आहे?

नांदेडकरांनी घेतलेला हा निर्णय अनेक अर्थांनी क्रांतिकारी ठरणार आहे.

१. सामाजिक सलोखा: सणांच्या काळात कायद्याचे पालन केल्यामुळे दोन समुदायांमधील तणाव कमी होण्यास मदत होईल. यामुळे धार्मिक सलोखा अधिक मजबूत होईल.

२. कायद्याचा सन्मान: गोवंश हत्याबंदी कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मुस्लीम समाजाने स्वतःहून घेतलेला हा पुढाकार संविधानाचा आणि कायद्याचा सन्मान करणारा आहे.

३. अफवांना लगाम: बकरी ईदच्या काळात प्राण्यांच्या वाहतुकीवरून किंवा कुर्बानीवरून अनेक अफवा पसरवल्या जातात. समाजाच्या या स्पष्ट निर्णयामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांना आपोआप चपराक बसणार आहे.

४. प्रतिमा संवर्धन: बेकायदेशीर कृत्यांना थारा न दिल्यामुळे उत्सवाचे पावित्र्य टिकून राहील आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनदेखील बदलेल.

५. प्रशासनावरील ताण कमी: अशा स्वयंप्रेरित निर्णयामुळे पोलीस आणि प्रशासनावरील बंदोबस्ताचा आणि सुरक्षेचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो.

जनजागृती आणि अंमलबजावणी

या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी नांदेडमधील मस्जिदींमधून आणि मोहल्ला बैठकांमधून आवाहन केले जात आहे. बेकायदेशीर कत्तली होणार नाहीत, याची काळजी स्वतः तरुण स्वयंसेवक घेत आहेत. "आम्ही आमचा सण आनंदाने साजरा करू, पण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेऊ," असा सूर तरुण वर्गातून उमटत आहे.

एकूणच नांदेडच्या मुस्लीम समाजाने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श ठरणार आहे. धार्मिक परंपरांचे पालन करतानाच कायद्याचे भान कसे राखले जाऊ शकते हे या निर्णयावरून स्पष्ट होते.

काय असते ईद-उल-अजहा?

रमजान ईदनंतर दोन महिने आणि दहा दिवसांनी म्हणजेच जिल्‌हज या महिन्याच्या दहा तारखेस ईद-उल- अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाते. त्यागाचे मूल्य जनमानसात रुजवणे, वर्षातून एकदा तरी सर्वांनी एकत्र येऊन बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करणे आणि समाजातील वंचितांना, दुर्बलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणे, असे बकरी ईदचे त्रिवेणी महत्त्व आहे. पैगंबर इब्राहिम (अब्राहम) यांच्या त्याग आणि विश्वासाचे स्मरण म्हणजे बकरी ईद. या दिवशी वैध जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter