अशर आलम, नवी दिल्ली
देशाच्या विविध भागांत वेळोवेळी घडणाऱ्या जातीय घटना हे मूळ आजार नसून, समाजात खोलवर रुजलेल्या विकृतीची केवळ लक्षणे आहेत. शुक्रवारी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या आरएसएस नेते आणि मुस्लिम विचारवंतांच्या चर्चेत हा सूर उमटला. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी चार वर्षांपूर्वी मुस्लिम विचारवंतांशी साधलेल्या संवादानंतर, पुन्हा एकदा अशाच प्रकारचा मोठा उपक्रम राबवण्यात आला. सध्याचे वातावरण अशा चर्चेसाठी पोषक असल्याचे या वेळी मान्य करण्यात आले.
तीन तास चाललेल्या या सत्रामध्ये आरएसएसचे नेते डॉ. कृष्ण गोपाल आणि राम लाल सहभागी झाले होते. मुस्लिम विचारवंतांमध्ये माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीरउद्दीन शाह यांसारख्या नामवंत व्यक्तींची उपस्थिती होती.
या बैठकीत भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद, हिंदू आणि मुस्लिम ओळखीचा वाद, 'काफिर विरुद्ध मलिच्छ' असा संघर्ष, एकमेकांत मिसळणे आणि कट्टरतावाद यांसारख्या अनेक संवेदनशील विषयांवर मोकळेपणाने चर्चा झाली. 'इंटरफेथ हार्मोनी' संस्थेने इंडिया इस्लामिक सेंटरमध्ये या चर्चेचे आयोजन केले होते. या चर्चेचे नाव 'कोंडीपेक्षा संवाद उत्तम असे ठेवण्यात आले होते.

आरएसएसचे नेते राम लाल म्हणाले की, ही चर्चा दोन टोकाच्या विचारसरणींभोवती फिरते. एकीकडे हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत हा समज, तर दुसरीकडे सर्व समुदाय मुळात एकच आहेत हा विश्वास. आरएसएस सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, ही चर्चा संघाच्या वतीने नसून देशाच्या हितासाठी होत आहे. प्रत्येक समाजात काही उपद्रवी घटक असतात, त्यामुळे काही मोजक्या घटनांवरून संपूर्ण समुदायाला दोषी धरता येणार नाही.
अशा घटनांना रोखण्यासाठी त्यांनी 'टोकणे, रोखणे आणि पाहणे' या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. अनेक जातीय दंगली या स्वार्थापोटी घडवून आणल्या जातात, असेही ते म्हणाले. प्रक्षोभक राजकीय विधाने होत असली, तरी भारतात दोन्ही समुदायांमधील संवाद आणि सामंजस्याची व्याप्ती वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
लेफ्टनंट जनरल जमीरउद्दीन शाह यांनी सोशल मीडिया आणि चित्रपटांमधून पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाबद्दल चिंता व्यक्त केली. मुस्लिमांविरुद्ध होणारी द्वेषयुक्त भाषणे रोखण्यासाठी आरएसएसने ठोस पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली. "खरी प्रार्थना ही प्रार्थनेनंतर (नमाज) सुरू होते," असे म्हणत त्यांनी भारतीय मुस्लिमांनी नेहमीच देशाच्या ऐक्यासाठी काम केल्याचे सांगितले.
काही मुस्लिम विचारवंतांनी सर्व भारतीय मुस्लिमांना 'हिंदू' म्हणण्यावर आक्षेप घेतला. यावर आरएसएस प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, मुस्लिमांना 'हिंदवी', 'भारतीय' किंवा 'हिंदुस्तानी मुसलमान' म्हणण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी आठवण करून दिली की, फाळणीनंतर संविधान सभेत हिंदूंचे बहुमत असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक धर्मनिरपेक्ष चौकटीचा स्वीकार केला. आरएसएस ही आज जगातील अत्यंत शक्तिशाली संघटना असून तिचा भाजपवर मोठा प्रभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. कृष्ण गोपाल यांनी सांगितले की, या चर्चेचा उद्देश मुस्लिमांना आरएसएसची विचारधारा पटवून देणे हा नसून, त्यांचे प्रश्न समजून घेणे हा आहे. "भारतात संवादाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक युक्तिवादात काही ना काही सत्य असते. केवळ एकमेकांच्या चुका काढण्याने आपण कुठेच पोहोचणार नाही," असे ते म्हणाले. एकमेकांना परके मानणे हेच वादाचे मूळ आहे, असे त्यांचे मत होते.
कट्टरतावादाच्या मुद्द्यावर त्यांनी लाल किल्ल्यावरील हल्ल्यासारख्या घटनांचा उल्लेख करत विचारले की, "तरुण सुशिक्षित मुस्लिमांचे ब्रेनवॉश कोण करत आहे? या समस्येचे मूळ आपल्याला शोधावे लागेल." अशा घटनांमुळे निष्पाप मुस्लिम डॉक्टर किंवा तरुणांना संशयाने पाहिले जाते किंवा त्यांना घरे नाकारली जातात, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी मान्य केले.
बहुतांश मुस्लिम हे राष्ट्रप्रेमीच आहेत, असे सांगताना डॉ. गोपाल यांनी जवाहरलाल नेहरूंच्या १९४८ मधील भाषणाचा दाखला दिला. त्या भाषणात नेहरूंनी अलिगढच्या विद्यार्थ्यांना भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे का, असा प्रश्न विचारला होता. गेल्या १००० वर्षांत हिंदू-मुस्लिम एकमेकांत मिसळण्याचे प्रयत्न कमी झाले असून संकुचित विचारसरणीमुळे त्यात अडथळे आल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग म्हणाले की, मुस्लिम समुदाय हा संख्येने कमी आहे आणि तो एका शक्तिशाली बहुसंख्याकांशी संवाद साधत आहे. "हिंदू समुदायाने मोठ्या भावाच्या नात्याने जामिया किंवा एएमयू मधून बाहेर पडणाऱ्या तरुण मुस्लिम पदवीधरांना मदतीचा हात दिला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -