मालेगावमध्ये 'शब-ए-बारात' उत्साहात साजरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 5 Months ago
'शब-ए-बारात' निमित्त काश्मीरमधील एका कब्रस्तानात दुआ करताना भाविक
'शब-ए-बारात' निमित्त काश्मीरमधील एका कब्रस्तानात दुआ करताना भाविक

 

शहरात शब-ए-बारात निमित्त येथील बडा कब्रस्तानसह विविध कब्रस्तानांमध्ये पूर्वजांच्या कबरीजवळ दुवा रविवारी (ता. २५) सायंकाळपासून पठण करण्यात आली. रात्री उशिरानंतर बडा कब्रस्तान भागात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होती. सोमवारी (ता. २६) पहाटेपर्यंत ही दुवा केली जाणार आहे.

शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बड़ा कब्रस्तान परिसरात १३ तर आयशानगर कब्रस्तान परिसरात १२ ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. कब्रस्तान परिसरात सकाळपासूनच पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह तपासणी करत ठिकठिकाणी बॅरीकेट लावण्यात आले आहेत. शहरात शब-ए-बारात निमित्त येथील सर्वच कब्रस्तान परिसरात महापालिकेतर्फे स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी पूर्वजांच्या कबरीवर जाऊन स्वच्छता केली. तसेच क्वरीभोवती असलेल्या विटांवर चुना मारत परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर दुवापठण करण्यात आले. यामुळे बडा कब्रस्तान व आयशानगर कब्रस्तान येथील कबरी पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत. दोन्हीं कब्रस्तान परिसरात फुल विक्रीच्या शेकडो हातगाड्या लावल्या आहेत. येथे दहा रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत फुलांची विक्री होत आहे. यात प्रामुख्याने गुलाबाचे फुल, पाकळ्या, फुलांचा हारांची विक्री होत आहे. रविवारी (ता. २५) सायंकाळी उशिरानंतर दोन्ही कब्रस्तानमध्ये नागरीकांनी गदीं केली होती. काही नागरिकांनी मशिदीत जाऊन नमाज पठण केले. नागरीक पूर्वजांच्या कबरीवर जाऊन कुराणच्या आयात, दरुद, दुवा पठण करणार आहेत. पुर्वजांसाठी विशेष दुवा मागितली जाणार आहे.

शहरात शब-ए-बारात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील सलाम चाचा रोड, मोहम्मद अली रोड, कसुंबा रोड, जामेतू स्वालेहा रोड यासह विविध भागात रात्रभर चहा हॉटेल, पुलाव यासह विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात येणार आहेत. रात्रभर चालणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रीतून शहरात लाखोंची उलाढाल होणार आहे. 

पोलिसांकडून चोख बंदोबस्त
येथील बड़ा कब्रस्तान भागात १७ वर्षापूर्वी शब-ए-बारातच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यात अनेक जणांना जीव गमवावा लागला, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कब्रस्तान परिसरात येणाऱ्या- जाणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. शहरात बडा कब्रस्तान भागात ११०, तर आयशानगर कब्रस्तानात १४० पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव बलाचे जवान व आरसीएफ पोलिस दलाचे कर्मचारीही बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत. दोन्ही कब्रस्तानांमध्ये तपासणीसाठी मेटल डिरेक्टर लावण्यात आले. पोलिसांनी ये-जा करणाऱ्या प्रत्येकावर लक्ष केंद्रीत केले. दुवा पठणनंतर भिकाऱ्यांना दान देण्याची पद्धत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भिकाऱ्यांनाही कब्रस्तानापासून दूर अंतरावर रोखण्यात आले आहे.

काय असतो 'शब-ए-बारात'चा सण?
'शब-ए-बारात' हा सण इस्लामिक कॅलेंडरनुसार ८व्या महिन्याच्या म्हणजे शाबानच्या १५ तारखेला सूर्यास्तानंतर साजरा केला जातो. ही रात्री दया, क्षमा आणि आशीर्वादाची रात्र मानली जाते.या दिवशी भाविक जाणते अजाणतेपणी झालेल्या चुकांबद्दल अल्लाहकडे क्षमा याचना करतात या रात्री कुटुंबातील आणि नातेवाईकांतील मृत व्यक्तींची आठवण काढली जाते व त्यांच्यासाठीही प्रार्थना केली जाते. यावेळी त्यांच्या कबरीवर जाऊन फुलेही वाहण्यात येतात. या रात्री मुस्लीम समाज मस्जिदमध्ये एकत्र येऊन रात्रभर प्रार्थना म्हणजे नमाज अदा करतात. यावेळी सामुदायिक दुवाही मागितली जाते. बंधुभाव आणि एकत्मता यांचा संदेश देणारी अशी ही रात्र असते.