राष्ट्रीय युवा दिन : प्रेषित मुहम्मद यांनी तरुणांकडे नेतृत्व सोपवून काय दिला होता संदेश?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ओवेस सकलेन अहमद

आज वयाच्या अठराव्या वर्षी आपण एकतर कॉलेजच्या टेन्शनमध्ये असतो किंवा सोशल मीडियावर एखादं अपडेट टाकण्यात गुंग असतो. पण उसामा इब्न झैद यांचं उदाहरण पाहा. ते केवळ अठरा वर्षांचे असताना तीन हजार अनुभवी सैनिकांच्या लष्कराचे नेतृत्व करत होते. त्यांच्या सैन्यात अबु बकर आणि उमर यांच्यासारखे दिग्गज योद्धे होते, जे उसामा यांच्या वयापेक्षा दुप्पट मोठे होते. ज्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या या निर्णयावर शंका घेतली, त्यांना प्रेषितांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितलं की, "नेतृत्वासाठी वय नाही, तर क्षमता महत्त्वाची असते."

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारीला साजरा होणारा 'राष्ट्रीय युवा दिन' आपल्याला याचीच आठवण करून देतो की, तरुण हे उद्याचे नव्हे, तर आजचे नेते आहेत. २०२६ मध्ये जगणाऱ्या मुस्लिम तरुणांसाठी ही गोष्ट अत्यंत मोलाची आहे. 'प्यू रिसर्च'नुसार, जगातील ६० टक्के मुस्लिम लोकसंख्या ही ३० वर्षांखालील तरुणांची आहे. ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे, जिचा वापर होणं अजून बाकी आहे.

सुरुवातीच्या काळातील इस्लामने ही युवा शक्ती अचूक ओळखली होती. मुआध इब्न जबल यांनी त्यांच्या किशोरवयातच कायद्याचा इतका सखोल अभ्यास केला होता की, प्रेषितांनी त्यांना वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी येमेनचे न्यायाधीश आणि गव्हर्नर म्हणून पाठवलं. कल्पना करा, खांद्यावर जबाबदारीचं मोठं ओझं घेऊन एक तरुण मुलगा एका संपूर्ण प्रांतावर राज्य करण्यासाठी एकटाच निघाला होता. 

अली इब्न अबी तालिब यांनी वयाच्या १० व्या वर्षी इस्लामचा स्वीकार केला. जेव्हा घराबाहेर मारेकरी टपून बसले होते, तेव्हा वयाच्या १५ व्या वर्षी ते न घाबरता प्रेषितांच्या जागी त्यांच्या अंथरुणावर झोपले. ही केवळ काही उदाहरणं नव्हती, तर तो त्या काळातील शिरस्ता होता. प्रेषितांनी तरुणांमधील कौशल्यं वेळीच ओळखली आणि त्यांना केवळ नावापुरतं सहभागी न करून घेता, खऱ्या अर्थाने जबाबदारीच्या मैदानात उतरवलं.

पण आजच्या वास्तवाकडे पाहिलं तर चित्र वेगळं दिसतं. आजचा तरुण सोशल मीडियावर स्वतःची ओळख जपण्यासाठी सतत झगडताना दिसतो. "आमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही" किंवा "आम्ही मुस्लिम असूनही प्रगती करू शकतो," हे जगाला पटवून देताना त्याची मोठी दमछाक होते. एका सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, अमेरिकेतील ४२ टक्के मुस्लिम तरुणांना त्यांच्या धर्मामुळे आजही त्रास दिला जातो. कदाचित तुम्हालाही ही ओढाताण जाणवत असेल—समाजासाठी 'पुरेसा मुस्लिम' राहणं आणि जगासाठी 'नॉर्मल' दिसणं यातील ही तारेवरची कसरत! 

मी संगीत किंवा कलेत करिअर करू शकतो का? मी धार्मिक अभ्यासाऐवजी व्यवसायाची वाट निवडली तर माझी श्रद्धा कमी होते का? माझा धर्म आणि हिंसेचा काडीचाही संबंध नाही, हे मी वारंवार का स्पष्ट करत राहावं? असे अनेक प्रश्न आजच्या तरुणाईला सतावत आहेत.

या दबावामुळे तरुण भरकटण्याची भीती असते. काही जण गोंधळातून मार्ग काढण्यासाठी कट्टर विचारांकडे वळतात, तर काही जण या सततच्या स्पष्टीकरणाला कंटाळून स्वतःला समाजापासून वेगळं करून घेतात. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, तरुण हे विचारधारेपेक्षा स्वतःची ओळख शोधण्यासाठी किंवा आयुष्याला काहीतरी अर्थ मिळावा या ओढीने कट्टर पंथांकडे ओढले जातात. आजचा समाज त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट देऊ शकत नाहीये, ती म्हणजे—प्रेमाचं नातं आणि योग्य दिशा.

कुराण सांगतं, "अल्लाह तोच आहे ज्याने तुमची निर्मिती अशक्तपणातून केली आणि नंतर त्या अशक्तपणाचं रूपांतर ताकदीत केलं" (सुरह अर-रुम, ३०:५४). तुमचं तारुण्य ही तुमची मर्यादा नसून ती तुमची खरी शक्ती आहे.

इब्तिहाज मुहम्मद यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये हिजाब घालून खेळणारी ती पहिली अमेरिकन मुस्लिम महिला ठरली आणि तिने पदकही जिंकलं. पदक जिंकण्यापूर्वी तिला सांगण्यात आलं होतं की, जर खेळात टिकायचं असेल तर हिजाब काढावा लागेल. पण तिने माघार घेतली नाही. तिने हे सिद्ध केलं की धर्म आणि कर्तृत्व यात निवड करण्याची अजिबात गरज नसते. आज ती केवळ एक खेळाडू नाही, तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून लाखो तरुणांना प्रेरणा देत आहे.

आकडेवारी असं सांगते की, जर तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळालं, तर त्यांच्या भरकटण्याची शक्यता ७३ टक्क्यांनी कमी होते. प्रेषितांनी 'सुफ्फा' नावाची एक जागा तयार केली होती, जिथे तरुण मुस्लिम एकत्र अभ्यास करायचे, प्रशिक्षण घ्यायचे आणि आपापसात बंधुभाव जपायचे. ते जगापासून तुटलेले नव्हते, तर समाजाशी जोडलेले होते. तिथे त्यांनी इस्लामची शिकवण दया, शहाणपण आणि समजुतीने कशी पाळावी, याचे थेट आदर्श पाहिले.

आज आपल्याला अशाच एका व्यासपीठाची गरज आहे. अशी जागा जिथे तरुण कोणतीही भीती न बाळगता अवघड प्रश्न विचारू शकतील. जिथे त्यांच्या शंकांचं रूपांतर प्रगतीत होईल. जिथे मुस्लिम असण्याचा अर्थ केवळ 'काय करू नये' हे नसून 'स्वतःचं सर्वोत्तम व्यक्तिमत्व कसं घडवावं' हा असेल. प्रेषितांनी तरुणांना इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या, कारण त्यांनी त्यांना आधी त्यासाठी तयार केलं होतं.

प्रेषितांनी म्हटलं आहे की, "पाच गोष्टी येण्यापूर्वी पाच गोष्टींचा फायदा घ्या: म्हातारपण येण्यापूर्वी तुमचं तारुण्य जपून वापरा." ते आपल्याला मोठे होण्याची वाट पाहायला सांगत नव्हते, तर तारुण्याची संधी हातची लवकर जाते याची जाणीव करून देत होते. उसामा, मुआध किंवा अली यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणाची परवानगी मागितली नाही. त्यांना असा समाज मिळाला ज्याने त्यांच्यातील हिरा ओळखला आणि त्यांना चमकण्याची पूर्ण संधी दिली.

खरा प्रश्न हा आहे की: आपण आज असा समाज घडवत आहोत का? आपण तरुणांना निव्वळ उपदेशाचे डोस देण्यापेक्षा त्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन देतोय का? आपण त्यांचा आवाज ऐकतोय की फक्त त्यांच्यावर आपले विचार लादतोय?

लक्षात ठेवा, तरुण पिढी शांत बसून राहणार नाही. त्यांना आयुष्याचा अर्थ आणि आपुलकी कोठेतरी नक्कीच मिळेल. आता प्रश्न एवढाच उरतो की, आपण त्यांना असं काही देऊ शकतो का, जे इतर आकर्षणांपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल? आता निर्णय तुमचा आहे!


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter