न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अपेक्षेपेक्षा काही काळ लांबलेली भारतीय संघाची निवड उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. अगोदर चर्चा झाल्यानुसार रिषभ पंतचे स्थान धोक्यात आहेच; मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ तारखेला होणार आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवणाऱ्या संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे; मात्र पुढच्या तयारीसाठी एक-दोन बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे ईशान किशान कमालीची आक्रमक फलंदाजी करत असताना आणि सातत्यही दाखवत असताना वर्षभरात एकही एकदिवसीय सामना न खेळलेल्या रिषभ पंतऐवजी त्याला संधी दिली जाण्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमांमध्ये केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र अजित आगरकर यांची निवड समिती कोणता विचार करते, हे महत्त्वाचे आहे.
या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर थेट टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवड समिती या एकदिवसीय मालिकेकडे कसे पाहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
येत्या काळात व्हाईटबॉल क्रिकेटसाठी यष्टीरक्षक म्हणून कोणाला पसंती द्यायची, हा मुद्दा अधिक चर्चेचा असणार आहे. टी-२० प्रकारात सध्या संजू सॅमसन खेळत आहे. तर एकदिवसीय प्रकारात केएल राहुल ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. आता टी-२० साठी सॅमसन आणि ईशान किशान यांना संधी देण्यात आलेली आहे, त्यामुळे पंतऐवजी ईशानला प्राधान्य मिळण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. तसेच गौतम गंभीर प्रशिक्षक झालानंतर पंत २०२४ ते २०२५ या कालावधीत केवळ एकच एकदिवसीय सामना खेळलेला आहे.
न्यूझीलंविरुद्ध ही मालिका केवळ तीनच सामन्यांची असल्यामुळे निवड समितीही अधिक खोलवर विचार करण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात असले तरी सिराज आणि शमी यांच्याबाबतीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी सिराजचा विचारही झाला नव्हता. सध्या तरी तो केवळ कसोटी क्रिकेटच खेळत आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत सिराज संघातील प्रमुख गोलंदाज होता. आता जसप्रीत बुमराला विश्रांती दिली जात असताना सिराजला संधी देणे उचित ठरू शकेल. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत सिराज पहिल्या चार सामन्यांत खेळला नाही, हा मुद्दा कदाचित त्याच्याविरोधात जाऊ शकेल.
दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमी मात्र बंगाल संघातून देशांतर्गत स्पर्धांत खेळत आहे आणि योगदानही देत आहे; परंतु अजित आगरकर यांची निवड समिती त्याचा विचार करीत नाही.