आयपीएलच्या १६ व्या हंगमापूर्वी झालेल्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली होती. पंजाब किंग्जने सॅम करनला १८.५ कोटी रूपये देऊन आपल्या गोटात खेचले. मात्र, याच लिलावात काहीच्या नशिबी फक्त काही लाख रूपयेच आहे. मात्र, तरी देखील या खेळाडूंनी लाखमोलाची कामगिरी करत आपली किंमत वाढवली. या खेळाडूंमध्ये गुजरात टायटन्सचा नूर अहमद, चेन्नईचा मथिशा पथिराना आणि नवीन - उल-हकचा देखील समावेश आहे.
नूर अहमद
गुजरात टायटन्सने अफगाणिस्तानच्या डावखुऱ्या फिरकीपटूसाठी फक्त ३० लाख रूपये खर्च केले होते. मात्र, त्याने ११ सामन्यात ७.८९ च्या सरासरीने धावा देत एकूण १४ विकेट्स घेतल्या. नूर अहमदकडे या हंगामाचा इमर्जिंग प्लेअर म्हणून पाहिले जात आहे. नूर विकेट घेण्याबरोबरच धावा रोखण्यातही माहीर आहे. गुजरात अजून एलिमिनेटर सामना खेळणार आहे. त्यामुळे नूरच्या विकेट्समध्ये अजून वाढ होऊ शकते.
मतीशा पथिराना
बेबी मलिंगा म्हणून क्रिकेट जगतात ओळखल्या जाणाऱ्या मतीशा पतिरानाला चेन्नई सुपर किंग्जने फक्त २० लाख रूपयात खरेदी केले होते. मात्र यंदाच्या हंगामात त्याने सीएसकेसाठी अशी काही कामगिरी केली की तो आता येत्या काही वर्षात सीएसकेचा मुख्य गोलंदाज होईल. पथिरानाने ११ सामने खेळत १७ विकेट्स घेतल्या. यातील १४ विकेट्स या डेथ ओव्हरमध्ये घेतल्या आहेत. त्याने ७.७२ च्या सरासरीने धावा दिल्या.
रहमानुल्ला गुरबाज
अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजला केकेआरने ५० लाख देत आपल्या गोटात खेचले होते. गुजबाजने ११ सामन्यात ३३४ धावा केल्या. त्याने गुजरातविरूद्ध ३९ चेंडूत ८१ धावा ठोकल्या होत्या.
नवीन - उल - हक
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक त्याच्या वादग्रस्त वागणुकीमुळे चर्चेत आला होता. लखनौने त्याला ५० लाखाची बोली लावली होती. नवीनने या हंगामात ८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ११ विकेट्स घेतल्या. त्याने ७.८२ च्या सरासरीने धावा देत आपण किफायतशीर असल्याचे सिद्ध करून दाखवले.
कायल मेयर्स
लखनौचाच धडाकेबाज सलामीवीर कायल मेयर्सवर लखनौने फक्त ५० लाख रूपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले. क्विंटन डिकॉकच्या अनुपस्थितीत मेयर्सला सलामी करण्याची संधी मिळाली. त्याने दिल्लीविरूद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात ३८ चेंडूत ७३ धावांची खेळी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याने चेन्नईविरूद्ध देखील २२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. मेयर्सने यंदाच्या हंगामात १३ सामन्यात ३७६ धावा केल्या आहेत.
नॅथन एलिस
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसला पंजाब किंग्जने ७५ लाख बोली लावली होती. त्याने राजस्थानविरूद्ध ३० धावा देत ४ विकेट्स घेत आपला दम दाखवून दिला. एलिसने पूर्ण हंगाम चांगली गोलंदाजी केली. त्याने १० सामन्यात १३ विकेट्स घेतल्या.