अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी गुरुवारी इराणला आतापर्यंतच्या 'सर्वात मोठ्या हल्ल्याचा' इशारा दिला आहे. वॉशिंग्टन हे सुरू असलेले युद्ध 'निर्णायकपणे आणि स्वतःच्या अटींवर' जिंकत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
पेंटागॉनमधील वार्ताहर परिषदेत बोलताना हेगसेथ म्हणाले की, 'ऑपरेशन एपिक फ्युरी' नावाने सुरू असलेली ही लष्करी मोहीम अत्यंत अचूक असून ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार राबवली जात आहे. २८ फेब्रुवारी रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून अमेरिकन फौजांनी इराणमधील ७,००० पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन निर्मिती केंद्रे तसेच संरक्षण औद्योगिक तळांना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य केले आहे.
हेगसेथ यांच्या दाव्यानुसार, इराणची हवाई संरक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. अमेरिकन फौजांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच इराणच्या नौदलाचे १२० पेक्षा जास्त जहाजे उद्ध्वस्त किंवा निकामी झाली असून त्यांचे प्रमुख लष्करी तळ निकामी करण्यात आले आहेत.
जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष डॅन केन यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्य इराणच्या जमिनीखालील क्षेपणास्त्र साठवणूक केंद्रे आणि किनारपट्टीवरील संरक्षण यंत्रणांवर शक्तिशाली शस्त्रांनी हल्ले करत आहे. अमेरिकन हवाई दलाने आता इराणच्या हवाई हद्दीत आपला विस्तार वाढवला आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील हा संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने संपूर्ण प्रदेशात प्रतिहल्ले केले असून जागतिक ऊर्जेसाठी महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर निर्बंध लादले आहेत. यामुळे तेलाची वाहतूक विस्कळीत झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजताबा खामेनी यांनी नेतृत्व स्वीकारले असून सध्या तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.