सुर्यकुमारच्या खेळीमुळे भारताचा दणदणीत विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव

 

भारताने युएसएचे १११ धावांचे आव्हान १९ व्या षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत सुपर ८ मधील आपलं स्थान पक्क केलं. भारत आता सुपर ८ मध्ये २४ जून रोजी ऑस्ट्रेलियासोबबत भिडण्याची शक्यता आहे.

युएसएचे १११ धावांचे आव्हान पार करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. त्यांचे दोन फलंदाज पहिल्या तीन षटकातच माघारी गेले होते. मात्र सूर्यकुमार यादवने (४९ चेंडूत ५० धावा) अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याला शिवम दुबेने नाबाद ३१ धावांचे योगदान दिलं. युएसएकडून सौरभ नेत्रावळकरने दमदार गोलंदाजी करत रोहित आणि विराट कोहलीला बाद केलं.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने युएसएला २० षटकात ८ बाद ११० धावात रोखले. भारताकडून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ४ षटकात ९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याला हार्दिक पांड्याने २ तर अक्षर पटेलने १ विकेट घेत चांगली साथ दिली. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक २७ धावा केल्या. त्या खालोखाल टेलरने २४ तर कोरे अँडरसनने १४ धावा केल्या.

 सूर्या तळपला; बॉल टू रन मॅचमध्ये केली संयमी खेळी
सूर्यकुमार यादवने शेवटच्या ५ षटकात चांगली फटकेबाजी करत भारताला बॉल टू रन आलेल्या सामन्यात विजय मिळवून दिला. त्याने शिवम दुबेसोबत अर्धशतकी भागीदारी रचली.

 भारताची संथ फलंदाजी; सूर्या अन् दुबेवरच मदार
भारताने १४ षटकात ३ बाद ६७ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी ३६ चेंडूत ४४ धावा करायच्या आहेत.

ऋषभ पंतही झाला बाद; भारताला तिसरा धक्का
अलीने २० चेंडूत १८ धावा करणाऱ्या ऋषभ पंतचा त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला.

सौरभचे भारताला दोन तगडे धक्के; विराट पाठोपाठ रोहितही बाद
सौरभ नेत्रावळकरने भारताला सुरूवातीलाच दोन मोठे धक्के दिले. त्याने विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद केलं. तर रोहित शर्माला ३ धावांवर बाद करत भारताची अवस्था २ बाद १० अशी केली.

युएसएविरूद्ध अर्शदीपचा जलवा; निम्मा संघ एकट्यानेच संपवला

अर्शदीप सिंगने ४ षटकात ९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या यामुळे युएसएची अवस्था ७ बाद १०० धावा अशी झाली.
अखेर इंडियाला मिळाली नितीश कुमारची विकेट; सिराजचा भन्नाट कॅच
नितीश कुमारने २३ चेंडूत २७ धावा करत टीम इंडियाला टेन्शन दिलं होतं. मात्र अर्शदीपच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने भन्नाट कॅच घेत युएसएला पाचवा धक्का दिला. युएसएची अवस्था ५ बाद ८१ अशी झाली.

युएसएचा जवळपास निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; हार्दिकनंतर अक्षरनेही दिला धक्का
अक्षर पटेलने स्टीव्हन टेलरचा त्रिफळा उडवत युएसएची अवस्था ४ बाद ५६ धावा अशी केली.

युएसएची संथ सुरूवात; पांड्यानेही दिला मोठा धक्का
पॉवर प्लेमध्ये युएसएने १८ धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने ॲरोन जोन्सला ११ धावांवर बाद केलं.

अर्शदीपने युएसएला पहिल्याच षटकात दिले दोन धक्के
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर जहांगीरला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर आंद्रियाज गौसला २ धावांवर बाद केले.

युएसएविरूद्ध भाराताने नाणेफेक जिंकली; रोहितने केला का संघात बदल?
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात कोणता बदल केलेला नाही. मात्र युएसएच्या संघाचा कर्णधारच बदलला आहे. मोनार्क पटेल आजचा सामना खेळणार नाहीये.

भारत आणि युएसए हे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये एकमेकांविरूद्ध कधी खेळलेले नाहीत. त्यामुळे जो संघ जिंकले तो खातं उघडणार आहे.