सुनील गावसकर यांची निवड समितीवर टीका

Story by  test | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सुनील गावसकर
सुनील गावसकर

 

मुंबई : ‘‘सर्फराज खान याने गेल्या काही देशांतर्गत स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा पटकावल्या असून; तो सध्या चालू असणाऱ्या रणजी या महत्वाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मुंबईच्या संघाकडून शतक लगावत आहे. मात्र, तरीही त्याची भारताच्या कसोटी संघात निवड करण्यात येत नसेल तर ती प्रचंड आश्चर्याची गोष्ट असल्याची ’’टीका भारताचे दिग्गज माजी फलंदाज आणि कर्णधार सुनील गावसकर यांनी निवड समितीवर केली आहे.


सर्फराज खान याने गेल्या काही देशांतर्गत क्रिकेट मोसमात चांगलीच कामगिरी केली आहे. मात्र तरीही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेकरता पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड का करण्यात आली नाही? तो शतक मारतोय आणि लगेच मैदानावर येऊन सराव करतोय. मैदानात आल्यावर तो पुन्हा शतक मारतोय. म्हणजेच तो प्रचंड तंदुरूस्त आहे. सर्फराज फक्त जाड आहे म्हणून त्याला संघात घेत नसाल तर त्यापेक्षा फॅशन शोमध्ये जाऊन संघाची निवड करावी. शरीरयष्टी काटक असणाऱ्या खेळाडूलाच संघात स्थान देण्यात येईल असा कुठला नियम आहे का ? सध्याच्या भारतीय संघात सुद्धा विविध प्रकारची शरीरयष्टी असणारे खेळाडू आहेत.


शरीरयष्टीवरून एखाद्या खेळाडूचा अंदाज बांधणे हे चुकीचे आहे. खेळाडूच्या वजन आणि जाडी पेक्षा त्याने किती धावा आणि किती बळी घेतले आहेत हे जास्त महत्वाचे आहे आणि केवळ या दोन मुद्द्यांवरूनच खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड व्हायला पाहिजे’ असा सल्ला गावसकर यांनी निवड समितीला दिला आहे.


सर्फराज याने मुंबई संघाकडून खेळताना दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शतक मारले आहे. मात्र तरीही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या संघात निवड न करण्यात आल्याने अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर ‘एवढी चांगली कामगिरी करूनही माझी भारतीय संघात निवड न झाल्याने मी नाराज झालो होतो आणि आपले दुःख वडिलांकडे बोलून दाखवल्याचे ’ सर्फराजने म्हंटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेस ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे.