मराठी कवितांच्या उर्दू भाषांतराचा रंजक इतिहास

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सय्यद शाह वाएज
 
उर्दू भाषेचा जन्म हा मराठीशी निगडीत असणाऱ्या दखनी भाषेतून झाला आहे. त्यामुळे उर्दू भाषेच्या सुरुवातीच्या काळात काही मराठी शब्द देखील त्यामध्ये आढळत होते. मराठी भाषेतील काही पुस्तकांचे भाषांतर करताना देखील भाषिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठी आणि उर्दूतील अनुवादांचा हा इतिहास अठराव्या शतकाच्या मध्यात सुरु होतो.  मराठी भाषेतून उर्दू भाषेत अनुवादाची सुरुवात ही मनसमझावन पासून होते.  सन १७५० मध्ये शाह तुराब यांनी रामदास स्वामींच्या श्लोकांचा मनसमझावन या नावाने तर्जुमा केला होता. मनसमझावनने उर्दूत मोठा सन्मान मिळवला. तसव्वूफच्या पातळीवर देखील त्याविषयी चिंतन झाल्याचे काही अभ्यासकांनी नमूद करुन ठेवले आहे. मनसमझावनच्या भाषांतरावेळी दखनी आणि उत्तरी फारसी मिश्रीत हिंदवीच्या संयोगाची प्रक्रीया सुरु होती. त्यामुळे कदिम उर्दू किंवा दखनीच्या विकसित स्वरुपातील या अनुवादानंतर मराठीतून या भाषेत फारसे साहित्य आले नाही. तब्बल दिड शतकाने १८९३ मध्ये अमीर अली शौक यांनी १९ व्या शतकातील समाजसुधारक आनंदीबाई जोशी यांच्या आत्मचरित्राचे उर्दू भाषांतर करुन घेतले. या अनुवादानंतर मराठीतून उर्दूत झालेल्या भाषांतराच्या नोंदी आढळत नाहीत.

स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितांचे उर्दूत भाषांतर झाले. शिशिर उगम या नावाने त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. या काव्यसंग्रहाची मराठीत मोठी चर्चा झाली होती. यानंतर काही कविता या शिर्षकाने त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला. दुसऱ्या महायुध्दाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम टिपणाऱ्या अनेक कविता या संग्रहात होत्या. यातील काही कवितांचे भाषांतर डॉ. युनूस आगासकर यांनी केला होता. त्यांनी आझाद बहर या शैलीत मर्ढेकरांची ही कविता भाषांतरीत केली होती. –

तोड गया दम भरे हुए पिपे के अंदर
उफ्फ बेचारा बेकस चुहा
जियालों और मरा पिपे के अंदर
तडप तडप कर सिसक सिसक कर
 
याच कवितेचे दुसरे अनुवाद बदिउज्जमा खावर यांनी केला होता. ती अनुवादीत कविता अशी
 
मर गए गिले टब में चुहे
मुडी गर्दनें, बिना मरोडे
पेवस्ता लब हुए लबों से
मले गर्दनें बिना चाह के
 
मर्ढेकरांच्यानंतर कुसुमाग्रज हे मराठीतील महत्वाचे कवी आहेत, ज्यांच्या काव्यसंग्रहाचे उर्दू भाषांतर झाले आहे. त्यांच्या पृथ्वीचे प्रेमगीत या गाजलेल्या कवितेचे उर्दू भाषांतर जमीन का नगमा ए मोहब्बत या नावाने बदीउज्जमा खावर यांनी केले आहे. त्यातील काही ओळी अशा आहेत-
 
तेरे पिछे चलना है तेरा गम लेके
मेरे सुरज तेरा जबतक यह सफर जारी है।
तेरी राहों में मुझे चैन ना लेनी देगी
मेरे दिल में जो निहा प्यार की चिंगारी है।
यह हवसनाक उजाले मेरे नजदीक सही
इनकी कुरबत से है प्यारी तेरी दुरी मुझको।
 
बदिउज्जमा खावर यांनी कुसुमाग्रजांच्या पाचोळा या कवितेचेही उर्दू भाषांतर केले होते. त्याचे अनुवाद –
 
माल यह तनहा पेड उखडा है
गिरे हुए पत्तों का जिसके दामन में एक ढेर लगा है।
जीवन, सुबहा छिडकती आए
रात अंधेरा फैलाए, या फिर सुरज अंगारे बरसाए।
 
कुसुमाग्रज यांच्या अनेक निसर्गकविता, प्रेमगीते उर्दूत लोकप्रिय ठरली आहेत. त्या कवितांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्नही बदिउज्जमा खावर यांनी केला होता. कुसुमाग्रजांनी लिहीलेल्या कणा वगैरे कवितांच्या भाषांतरासाठी खावर यांनी प्रयत्न केले होते. खावर यांच्या प्रयत्नांमुळे उर्दू भाषिकांचे मराठी काव्याकडे लक्ष वेधले गेले. त्यामुळे मराठीतील महत्वाच्या कवींच्या काव्याची भाषांतरे करण्याची मागणी व्हायला लागली. त्यामुळे अनेक महत्वाचे कवी उर्दू भाषेत पोहोचले. मराठीतील स्वातंत्र्योत्तर काळातील कवितांमध्ये अनिल यांच्या कविता महत्वाच्या मानल्या जातात. अजून रुसूनी आहे, आज अचानक गाठ पडे, कुणी जाल का सांगाल का, गगनी उगवला सायंतारा या अनिल यांच्या काही गाजलेल्या कविता आहेत. अनिल यांच्या मानवता या कवितेचे इन्सानियत या नावाने बदिउज्जमा खावर यांनी अनुवाद केले आहे.   
 
सितम टुटे कीसी मजबूर पर, हम बुलबुलाते हैं।
हमारी आंख में दुखियों के आंसू डबडबाते हैं
हमारे दिल को हर इन्सान के गम छेद जाते हैं।
एक ऐसे रिश्ते इन्सानियत में जुड गए हम
 
बदिउज्जमा खावर यांच्याप्रमाणेच अब्दुल सत्तार दळवी यांनी काही महत्वाची भाषांतरे उर्दू भाषेत केली आहेत. संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदान चे उर्दू भाषांतर दळवी यांनी केले होते.
 
लफ्जों के यह नजराना, है खालिक ए दो आलम
बेमा यह सही फिर भी शायद किसी काबील हो।
गिरे यह किसी लायक, इतना तो करम कर दे
जो लोग हैं, बद बातीन, जो मुखर के बंदे हैं।
 
बदनियत वह खुद हैं, जो जहन के गंदे हैं
वह लोग सदाकत पे नेकी पे हो आमादां ।
इन्सानों में पैदा हो एक जजबा यह मोहब्बत का
 
ज्ञानेश्वरांप्रमाणे त्यांची बहीण मुक्ताबाई यादेखील संतकवी होत्या. त्यांच्या जीवनावर उमेरा जलीली यांनी एक चरित्रग्रंथ मुक्ताबाई कलाम और हयात या या नावाने १९८८ मध्ये उर्दू भाषेत लिहीला आहे. या चरित्रग्रंथात त्यांनी मुक्ताबाईच्या काही कवितांचे उर्दू भाषांतर केले आहे. त्यातील ही कविता येथे प्रातिनिधीक स्वरुपात घेता येईल. 
 
सही रास्ता क्या है, दिदार ए खुदावंदी
और सारे रास्ते तो बातील हैं,
वह जो हरी का नाम लेते हैं, वो दुनियामें ही डुब नहीं जाते
चले जाते हैं, सिधे वैकुंठ
अमन व अफू जिसकी फितरत में हो
वो हामील है, सिफात ए खुदा का 
 
याव्यतिरिक्त उमेरा जलीली यांनी ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्या परस्पर संवादातील काही काव्यपंक्ती देखील ठिकठिकाणी पुस्तकात वापरल्या आहेत. ज्ञानेश्वर जेंव्हा स्वतःला झोपडीत बंद करुन घेतात, त्यावेळच्या प्रसंगावर मुक्ताबाईंनी लिहीलेली एका कवितेच्या काही ओळी उर्दूत खूप सुरेख पध्दतीने भाषांतरीत करण्यात आल्या आहेत.
 
मुझपर रहम करो ज्ञानेश्वर
 कुटीया का दरवाजा खोलो
वली वो है... जो दुनिया के बोल बर्दाश्त करे
अजमत यही है.. के अपनी अजमत का अहसास ना हो
विकार वही हैं... जहां जानदार पर रहम हो
आरीफ वो है, जो दिल पर काबू रखे
 
उर्दूमध्ये काव्याच्या वेगवेगळ्या पध्दती, परंपरा आहेत. मागील काही वर्षात इलाही जमादार, तालीब शोलापूरी वगैरेंनी उर्दू – मराठी मिश्र कविता लिहीण्याचा नवा पायंडा पाडला आहे. गजलवृत्तात पहिली ओळ उर्दू आणि दुसरी मराठी लिहीली जाते. इलाही जमादार यांनी ही पध्दत सुरु केल्यानंतर तालीब शोलापूरी वगैरे कवींनी या काव्यशैलीला वैभवाच्या शिखरावर पोहोचवले आहे. तालीब शोलापूरी एका कवितेत म्हणतात,
 
मुस्कराके मेरी धडकन को नया इजहार दे
माझ्या स्वप्नांना बहरलेला नवा आकार दे
जिंदगी ये कभी आ जाए मुश्कील मोड पर
मी जिथे थांबेन तेथे तू मला आधार दे
उर्दूचा जन्म हा मुळात दखनी या मराठीची भाषाभगिनी असणाऱ्या भाषेतून झाला आहे. त्यामुळे उर्दूचे मराठी भाषेशी नैसर्गिक असे ऋणानुबंध आहेत. या दोन्ही भाषांना एकमेकांशी जोडणारा मोठा इतिहास आहे.
 
- सय्यद शाह वाएज
(लेखक एड. गाजीउद्दीन सोलापूरचे सदस्य आहेत. )

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter