बनावट कागदपत्रे वापरुन खरेदी करण्यात आलेली सुमारे ३०००० सिम कार्डस बंद

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 11 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दूरसंचार सेवा प्रदाते – TSP यांनी जारी केलेले मुंबईतील ३०००० पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसए ने या सर्व मोबाइल जोडण्या तपासल्या असून त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे. ज्यातून त्यांना ६२ समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच छायाचित्राचा वापर करून,  वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत. एका समूहात, असे ५० ग्राहक असण्याची मर्यादा आहे, मात्र असे असूनही, या ६२ समूहांमध्ये एकूण ८२४७  ग्राहक आढळले. याचाच अर्थ, यात पॉइंट ऑफ सेल, म्हणजेच जिथून यांची विक्री केली जाते, असे सिम विक्रेते, यांचाही बनावट सिम कार्ड देण्याच्या कारस्थानात सहभाग असल्याचे स्पष्ट होते. एका प्रकरणात तर, एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला ६८४ वेगवेगळे मोबाइल क्रमांक जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संचार साथी पोर्टलचे उद्‌घाटन केले.या सोहळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाल्यानंतर पत्रकारांना संचार साथी या पोर्टल बद्दल तसेच एएसटीआर अस्त्र या चेहेऱ्याची ओळख पटवणाऱ्या तसेच माहितीचे विश्लेषण करणाऱ्या विविध तंत्राचा वापर असलेल्या प्रणालीची माहिती मुंबईतील दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक, एच. एस. जाखड  यांनी ही माहिती दिली . यावेळी नंदलाल सचदेव, उप महा संचालक (ए अँड एचआर), किशोर एक्का,  उपमहासंचालक, सुरक्षा, अजय कमल, उप महा संचालक - तंत्रज्ञान हे अधिकारी उपस्थित होते.

 

 

दूरसंचार विभागाने, बनावट सिम कार्डचे हे रॅकेट शोधून काढण्यासाठी एक अभिनव, स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म (सुपर कॉम्प्युटरचा वापर करून) ASTR – अस्त्र यात  कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सायबर गुन्ह्यांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बनावट/खोट्या मोबाइल कनेक्शनचा तपास करणे, ते ओळखणे आणि ते नष्ट करणे या दृष्टीकोनातून दूरसंचार विभागाद्वारे या तंत्रज्ञानाची रचना आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे, दूरसंचार विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी  सांगितले. ह्या प्रणालीअंतर्गत, ग्राहकांचे छायाचित्र आणि त्यांची माहिती यांची तुलना केली जाते, आणि त्यातून मिळणारी माहिती, वेगवेगळ्या नावांच्या त्याच छायाचित्राच्या महितीशी पडताळून पाहिली जाते.

 

बनावट/खोट्या माहितीच्या आधारे घेतलेले मोबाइल सीमकार्ड, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, राष्ट्रविरोधी करवायांसाठी वापरले जाऊ शकतात. आणि अशी बनावट कागदपत्रे तयार करणारे यात इतके चलाख असतात, की त्यांनी, अशी बनावट ओळखपत्रे, निवासाचे पुरावे तयार केले आहेत, जे मानवी नजरेतून कधीही पकडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच, दूरसंचार विभागाने, असे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एएसटीआर अस्त्र   ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर करत, अशा बनावट- खोट्या सीम्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.

 

या संदर्भात, मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशन, व्हीपी मार्ग पोलिस स्टेशन, डीबी मार्ग पोलिस स्टेशन, डीएन नगर पोलिस स्टेशन, सहार पोलिस स्टेशन, बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकी सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या  आहेत. अशा कारवाईमुले, मुंबईतील सायबर गुन्ह्यांसह विविध बेकायदेशीर कामांसाठी अशा बनावट/बनावट, नॉन-बोनाफाईड मोबाईल कनेक्शनचा वापर रोखण्यास मदत मिळू शकेल.