पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त माहितीपट प्रसारित करून ‘बीबीसी’ या वाहिनीने सरकारी प्रसारमाध्यम म्हणून त्यांच्या कर्तव्यात कसूर केली असून या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी, अशी मागणी एका ऑनलाइन याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यामुळे हा मुद्दा न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन-भाग १’ या माहितीपटात दंगलींचा मुद्दा हाताळलेला आहे. मात्र, द्वेषमूलक पत्रकारितेचे हे उदाहरण असून त्याद्वारे दर्शकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचविली जात आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका Change.Org या संकेतस्थळावर दाखल करण्यात आली आहे. वृत्त प्रसिद्ध करताना निष्पक्षपाती धोरण स्वीकारून सत्य मांडावे, हे तत्त्व पाळण्यात ‘बीबीसी’ला अपयश आले असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला असून या याचिकेवर आतापर्यंत अडीच हजार जणांनी ऑनलाइन स्वाक्षरीही केली आहे. ब्रिटनमधील माध्यमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्यालयाने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ‘बीबीसी’ने मोदींवर तयार केलेल्या माहितीपटाचा दुसरा भाग मंगळवारी (ता. २४) प्रसारित केला जाणार होता.
याचिकेतील आरोप
- माहितीपटातील माहिती चुकीची
- निष्पक्षपातीपणाचा अभाव
- माहितीपट हे पूर्वग्रहदूषित पत्रकारितेचे उदाहरण
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशात सलग दोन वेळेस निवडून आलेल्या पंतप्रधानांविरोधात बीबीसी अपप्रचार करत आहे. मोदींना सर्वोच्च न्यायालयानेही निर्दोष जाहीर केले आहे.
- लॉर्ड रॅमी रेंजर, भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक