पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 9 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ते स्वीकारणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे, पंतप्रधान आवास योजनांच्या सुमारे चार हजार घरांचे लोकार्पण होणार आहे. तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बांधण्यात येणाऱ्या सहा हजार घरांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

 

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टकडून पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (ता. १) सकाळी साडेअकराच्या सुमारास स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असतील. तत्पूर्वी मोदी सकाळी अकराच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतील.

 

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला पवार यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी त्यांची भेट घेऊन केले. परंतु, या कार्यक्रमासाठी मोदी यांची वेळ घेऊन देण्यासाठी मी मदत केली होती. त्यामुळे तेथे न जाणे उचित होणार नाही. आपल्याही भावनांचा आदर करतो, असे त्यांनी सांगितल्याचे डॉ. सप्तर्षी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून शहर भाजपनेही जय्यत तयारी केली आहे.

 

मेट्रो मार्गाचे लोकार्पण

 

टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जातील. तेथे त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे, पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होईल. हा कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी दुपारी अडीचच्या सुमारास दिल्लीकडे रवाना होतील.