नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नवीन संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. त्यासोबत एका नव्या परंपरेला मोदी सुरुवात करतील. नवीन संसद भवनातील लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ 'सेंगोल' स्थापित करणार आहेत. हे तेच सेंगोल आहे जे १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी सत्तेचं हस्तांतरणावेळी एक प्रतिक म्हणून पंडित नेहरुंकडे दिलं होतं. हे सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कसं सापडलं, त्याची एक रंजक कथा आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु यांची चालण्याची काठी अशी ओळख असलेली काठी मुळात एक सेंगोल असल्याचं समोर येत आहे. सेंगोल म्हणजं साम्राज्याचं आणि सामर्थ्याचं प्रतिक. चेन्नईतील वुमुडी बंगारु ज्वेलर्स अर्थात VBJ यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
व्हीबीजेचे व्यवस्थापकीय संचालक अमरेंद्रन म्हणाले की, २०१८ मध्ये आम्ही एका मासिकमध्ये सेंगोलबद्दल वाचलं होतं. त्यापूर्वी आम्हांला याबद्दल काहीही माहिती नव्हती. २०१९ मध्ये संग्रहालयात याबद्दल सर्व माहिती मिळाली. अहलाबाद संग्रहालयामध्ये ही सेंगोल होती. याचा एक व्हीडिओ आम्ही बनवला आणि पंतप्रधानांकडे पाठवला, असं अमरेंद्रन यांनी सांगितलं.
वुमुडी कुटुंबाला सेंगोलचा विसर पडला होता. ही सेंगोल तेव्हाच्या सरकारला बनवून देणारे बंगारु चेट्टी यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा मुलगा वुमुडी इथिराज त्यावेळी २२ वर्षांचा होता. तेव्हाच्या अस्पष्ट आठवणी आहेत. हे सेंगोल तयार करण्याासाठी साधारण एक महिन्याला कालावधी लागला होता, असंही अमरेंद्रन यांनी सांगितलं.
सेंगोलविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स या संस्थेतील तज्ज्ञांची मदत घेतली. तसेच पत्रकार एस. गुरुमूर्ती यांनाही पीएमओ टीमने संपर्क साधला. यानंतर निर्माते प्रियदर्शन यांच्यासह साबू सिरिल यासंदर्भात एक डॉक्युमेंटरी तयार केली. याच सेंगोलची एक प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. या नव्या चांदीच्या सेंगोलवर सोन्याचा मुलामा देण्यात आलाय. मूळ सेंगोल कायमस्वरुपी संसदेत ठेवण्यात येईल तर प्रतिकृती सार्वजनिक करण्यात येणार आहे.
ज्वेलर्सचे मार्केटिंग हेड अरुण कुमार यांना हे सेंगोल अलाहाबाद म्युझियममध्ये सापडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली की, आगामी संसद भवनात ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक असलेले ऐतिहासिक सेंगोल ठळकपणे स्थापन केलं जाईल.
पंडित नेहरुंनी स्वीकारलं होतं सेंगोल:
१४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १० वाजून ४५ मिनीटांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तामिळनाडूतून आलेले सेंगोल स्वीकारले होते. त्यांनी इंग्रजांकडून भारतीयांना सत्ता मिळाल्याचे प्रतिक म्हणून पूर्ण विधी-विधानांसह ते स्वीकारले होते. नेहरूंनी १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सेंगोल स्वीकारलं आणि सत्ता हस्तातंरण प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद देखील होते असे शाह म्हणाले.