बीडच्या एजाज बगवान यांनी लॉ सीईटीमध्ये मिळवले ९९.९९ टक्के गुण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
एजाज बगवान
एजाज बगवान

 

अल्फिया शेख

परीक्षेतले गुण तुमच्या हुशारीवर, कष्टावर, सातत्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम करतात. त्या यशामागे मोठा त्याग, आई-वडिलांच्या प्रार्थना, अफाट संघर्ष आणि दांडगी चिकाटी असते. बीड जिल्ह्यातील एजाज महमूद बगवान यांचा संपूर्ण प्रवास अशाच संघर्षाची कहाणी आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'MAH-LL.B. 3 Years CET-2026' या परीक्षेत त्यांनी तब्बल ९९.९९ टक्के गुण मिळवले आहेत. त्यांनी स्वतःसोबतच आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आणि बीड जिल्ह्याचं नाव मोठं केलं आहे. शून्यातून विश्व उभं करणाऱ्या एजाज यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

एजाज यांचा शिक्षणाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. उच्च शिक्षणाची मोठी स्वप्नं उराशी बाळगून ते पुण्यात दाखल झाले. पदवीचं शिक्षण सुरू असतानाच दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचं निधन झालं. या घटनेनंतर त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. वडिलांच्या जाण्यानंतर घराची सगळी जबाबदारी आई आणि थोरले भाऊ सुलतान बगवान यांच्या खांद्यावर आली.

घरात तशी बेताचीच परिस्थिती होती. तरीही एजाज यांचं शिक्षण थांबू नये म्हणून सुलतान यांनी फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दुसरीकडे, घरच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी एजाज यांनी स्वतः एका कॉल सेंटरमध्ये नोकरी धरली. यासोबतच कॉलेजमधील 'कमवा आणि शिका' या योजनेत भाग घेऊन त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतःच उचलला आणि आपली जिद्दी वाटचाल सुरूच ठेवली.

एजाज यांची शिक्षणातील वाटचाल सातत्यपूर्ण राहिली आहे. दहावी आणि बारावीत उत्तम गुण मिळवल्यानंतर त्यांनी पुण्यामधूनच आपली पदवी आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केलं. याच संघर्षाच्या काळात कुटुंबीय आणि हितचिंतकांनी त्यांना खंबीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळेच त्यांनी 'नेट' (NET), 'सेट' (SET) आणि 'जेआरएफ' (JRF) यांसारख्या मोठ्या राष्ट्रीय परीक्षा यशस्वीपणे पार केल्या. नवी दिल्लीतल्या 'जामिया मिलिया इस्लामिया'मध्ये त्यांनी 'युपीएससी'ची (UPSC) तयारी सुरू केली. तिथे त्यांना काही टप्प्यांवर अपयश आलं. तरीही ते अजिबात खचून गेले नाहीत. या संपूर्ण प्रवासाबद्दल आणि कुटुंबाच्या त्यागाबद्दल बोलताना एजाज अत्यंत भावूक होतात.

ते सांगतात, "२०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर माझ्या भावाने भाजी विकून माझं शिक्षण सुरू ठेवलं. आज मिळालेलं हे यश म्हणजे माझ्या आईच्या प्रार्थना, तिचा त्याग आणि माझ्या भावाच्या अपार कष्टाचं फळ आहे. अनेक तरुण आर्थिक अडचणीत असूनही मोठी स्वप्नं पाहतात. अशा तरुणांसाठी माझं हे यश प्रेरणादायी ठरावं, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे."

या प्रवासात त्यांना काका जमशेद बागवान आणि चुलत भाऊ फिरोज बागवान यांचं मोठं प्रोत्साहन मिळालं. तसेच झीशान अन्सारी, अमिन शेख आणि अब्दुल रहमान खान यांसारख्या मित्रांची मोलाची साथही मिळाली. यासोबतच पठाण सर, जावेद काझी सर, अनीस कुट्टी सर अशा अनेक शिक्षकांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. तसेच अशफाक हजवाने सर आणि 'क्रेसेंट मेडिकल फाउंडेशन'कडून मिळालेली मदत या यशात खूप महत्त्वाची ठरली आहे.

आज एजाज स्वतः विविध संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून मार्गदर्शन करत आहेत. भविष्यात कायद्याचं शिक्षण पूर्ण करून समाजातील वंचित आणि गरजू घटकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. न्याय, कायदेशीर मदत आणि घटनात्मक हक्क प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष काम करायच आहे. आपल्या या यशाचं श्रेय सर्वांना देताना एजाज अत्यंत नम्रपणे बोलतात. "हे यश केवळ माझे नाही. माझी आई, भाऊ, शिक्षक, मित्र आणि सर्व हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच हे यश मला मिळवता आलं आहे. इतरांसाठी आशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण करणारं यशच खऱ्या अर्थाने मोठं असतं."

खरोखरच एजाज यांची ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की, ध्येय स्पष्ट आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर गरिबी कधीच यशाच्या आड येऊ शकत नाही. एजाज बगवान यांच्या या प्रेरणादायी आणि यशस्वी वाटचालीस 'आवाज मराठी'तर्फे शुभेच्छा!


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter