काश्मीरच्या खोऱ्यात आता 'शिक्षणाचा' आवाज! रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराच्या लेकासह ४ तरुणांनी मारली NEET मध्ये बाजी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
काश्मीरमधील या होतकरू तरुणांनी मिळवले नीट (NEET) परीक्षेत यश
काश्मीरमधील या होतकरू तरुणांनी मिळवले नीट (NEET) परीक्षेत यश

 

ओनिका माहेश्वरी 

जम्मू-काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांतून या वर्षी शिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाची एक अत्यंत प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. या यशाने संपूर्ण परिसरातील तरुणांमध्ये नवीन आशा आणि पुढे जाण्याचा उत्साह निर्माण केला आहे. एकेकाळी मर्यादित संधी, कठीण परिस्थिती आणि आव्हानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील तरुणांनी आता आपल्या गुणवत्तेच्या आणि मेहनतीचे जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

दक्षिण काश्मीरमधील शोपियां आणि अनंतनाग जिल्ह्यातील चार मुस्लिम तरुणांच्या यशाची कहाणी या मोठ्या बदलाचे प्रतीक ठरली आहे. देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट युजी २०२६' मध्ये या चारही तरुणांनी चमकदार कामगिरी केली. गुणवत्ता ही कोणत्याही क्षेत्राची, गावाची, आर्थिक स्थितीची किंवा संसाधनांची मिंधी नसते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ध्येय स्पष्ट असेल, सतत मेहनत करण्याची तयारी असेल आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार पक्का असेल, तर कोणतेही ध्येय गाठता येते.

या चार तरुणांचे यश ही केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नाही. संपूर्ण काश्मीरसाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय बनला आहे. मर्यादित संसाधने असूनही मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी यांची कहाणी आशेचा किरण ठरत आहे.
शोपियां जिल्ह्यातील बटपोरा गावचा रहिवासी फैजान गुलझार याने नीट युजी २०२६ मध्ये ६०७ गुण मिळवून उत्तम यश संपादन केले. कठीण परिस्थिती असूनही फैजानने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचे आपले स्वप्न साकार केले.

त्याचप्रमाणे शोपियां जिल्ह्यातील मोलू डेंजरपोरा गावच्या मुकीम मुझफ्फर वानी याने नीट परीक्षेत ५८४ गुण मिळवून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. कुटुंबाचा पाठिंबा, आत्मविश्वास आणि सततची मेहनत कोणत्याही विद्यार्थ्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते, याचे उत्तम उदाहरण मुकीमच्या यशातून दिसून येते.

मनीहाल गावचा रहिवासी शारिक मुझफ्फर यानेही नीट युजी २०२६ मध्ये ७२० पैकी ६०१ गुण मिळवून चमकदार कामगिरी केली. शारिकचे यश अधिक विशेष आहे, कारण तो एका रोजंदारी मजुराचा मुलगा आहे. मर्यादित आर्थिक संसाधने आणि अनेक आव्हाने असूनही त्याने आपले स्वप्न दुरावू दिले नाही. सतत मेहनत करत त्याने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश मिळवले.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील व्हेरीनाग परिसरातील बटागुंड गावचा रहिवासी मेहरान अमीन यानेही नीट युजी २०२६ मध्ये शानदार यश मिळवले. त्याने ६१० गुण मिळवून ऑल इंडिया रँक (AIR) ७००० हासिल केली. सामान्य कुटुंबातून येणाऱ्या मेहरानने आर्थिक अडचणींवर मात करत पूर्ण जिद्दीने आणि समर्पणाने परीक्षेची तयारी केली होती.

या चारही तरुणांचा प्रवास एक स्पष्ट संदेश देतो. कठीण परिस्थिती माणसाच्या भविष्याचा निर्णय करू शकत नाही. खरी ताकद मेहनत, शिस्त, संयम आणि आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक प्रयत्नांमध्ये असते.
मजुराचा मुलाचा संघर्षाकडून यशाकडे प्रवास
शारिक मुझफ्फर याचे यश संघर्ष करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे. सामान्य कुटुंबातील शारिकने आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या क्षमतेला मर्यादा घालू शकत नाहीत, हे सिद्ध केले.

आपल्या तयारीबद्दल सांगताना शारिक म्हणाला, "विद्यार्थ्यांनी अभ्यासात सोपे मार्ग शोधण्याऐवजी विषयांची मूळ संकल्पना समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. प्रत्येक विषयाचा पाया मजबूत करणे सर्वात महत्त्वाचे असते. पाया मजबूत झाला की पुढचा अभ्यास सोपा होतो. कधीही आशा सोडू नये, सतत मेहनत करत राहावी आणि आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवावा. यश एका रात्रीत मिळत नाही, पण सातत्याने केलेले प्रयत्न निश्चितच रंग आणतात."

आपल्या शैक्षणिक प्रवासाची आठवण सांगताना शारिकने स्पष्ट केले की तो १० वी पर्यंत एक सर्वसामान्य विद्यार्थी होता. त्यानंतर त्याने आपले ध्येय गांभीर्याने घेतले आणि शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास सुरू केला. तो म्हणाला, "मी १० वी पर्यंत एक सरासरी विद्यार्थी होतो. त्यानंतर मी माझ्या ध्येयासाठी गंभीरपणे मेहनत सुरू केली. पहिल्या प्रयत्नात मला नीट परीक्षा उत्तीर्ण होता आले नाही, पण मी हार मानली नाही. मी माझ्या चुकांमधून शिकलो, आणखी एक वर्ष तयारी केली, आधीपेक्षा जास्त मेहनत घेतली आणि शेवटी दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले."

शारिकने आपल्या यशाचे श्रेय स्वतःच्या आईला दिले आहे. कठीण काळात आईने नेहमी साथ दिली आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केले, असे तो सांगतो. तो म्हणाला, "माझ्या आईने प्रत्येक परिस्थितीत मला साथ दिली. तिचा त्याग, प्रोत्साहन आणि माझ्यावरील विश्वासाने मला कठीण प्रसंगातही पुढे जात राहण्याची ताकद दिली." विद्यार्थ्यांच्या यशात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असेही त्याने नमूद केले. पालकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची प्रेरणा देते.

मेहरान अमीनचे यश: संयम आणि सततच्या मेहनतीचे फळ
आपल्या यशानंतर मेहरान अमीन म्हणाला, "आयुष्यात चढ-उतार येतच असतात, पण माणसाने संयम गमावता कामा नये आणि ध्येयापासून भरकटू नये. आयुष्यात अनेक कठीण टप्पे येतात आणि अनेकदा परिस्थिती आपल्या बाजूने नसते. मात्र आपण संयम ठेवला, ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि सतत मेहनत करत राहिलो तर यश नक्की मिळते. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे."

डॉक्टर बनण्याच्या इच्छेबद्दल बोलताना मेहरान म्हणाला, "वैद्यकीय क्षेत्र हे केवळ करिअर नाही, तर लोकांची सेवा करण्याचे एक माध्यम आहे. डॉक्टर होणे हे केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर गरजू लोकांना मदत करण्याची आणि मानवतेची सेवा करण्याची संधी आहे." बटागुंड गावातील लोकांनी मेहरानच्या यशावर आनंद व्यक्त केला. त्याची ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक स्थिती कोणाच्याही स्वप्नांची हद्द ठरवू शकत नाही, हेच त्याने दाखवून दिले आहे.

काश्मीरमध्ये शिक्षणाचे बदलणारे चित्र
नीट युजी परीक्षेत या चार मुस्लिम तरुणांनी मिळवलेले यश काश्मीरमधील शिक्षणाबाबत बदलणाऱ्या दृष्टिकोनाला अधोरेखित करते. आज खोऱ्यातील कुटुंबे मुलांच्या शिक्षणाला पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व देत आहेत आणि त्यांना मोठी ध्येये गाठण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

एकेकाळी मर्यादित संसाधने, आर्थिक अडचणी आणि संधींची कमतरता या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मार्गात मोठे अडथळे मानल्या जात होत्या. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. डिजिटल शिक्षण, ऑनलाईन अभ्यास साहित्य, उत्तम मार्गदर्शन आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कहाण्यांमुळे काश्मीरच्या तरुणांना नवीन दिशा मिळाली आहे.

आज गावांमध्ये राहणारे विद्यार्थीही देशातील इतर भागांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. विशेषतः वैद्यकीय क्षेत्राविषयी काश्मीरच्या तरुणांमध्ये उत्सुकता वेगाने वाढत आहे. डॉक्टर बनण्याचे स्वप्न आता केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. खोऱ्यातील गावांमधून आणि लहान शहरांतून येणारे विद्यार्थीही पूर्ण आत्मविश्वासाने वैद्यकीय क्षेत्रात पुढे जात आहेत. डॉक्टर बनून आपण केवळ स्वतःचे भविष्य उज्ज्वल करणार नाही, तर आपल्या समाजातील आणि परिसरातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास योगदान देऊ, असा विश्वास अनेक तरुण व्यक्त करतात.

मेहनत आणि शिक्षणाने बदलणारे काश्मीर
फैजान गुलझार, मुकीम मुझफ्फर वानी, शारिक मुझफ्फर आणि मेहरान अमीन यांचे यश हे बदलत्या काश्मीरची प्रचीती देते. शिक्षण हेच विकास, सन्मान आणि चांगल्या भविष्याचे सर्वात मजबूत माध्यम आहे, हे मानणाऱ्या नवीन पिढीचे हे वास्तव चित्र आहे.

आज काश्मीरमधील मुस्लिम समाजात शिक्षणाबाबत जागरूकता सातत्याने वाढत आहे. मोठी तरुण पिढी वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन, प्रशासकीय सेवा, कायदा आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करत आहे.

जेव्हा एखाद्या भागातून सातत्याने यशस्वी विद्यार्थी बाहेर पडतात, तेव्हा तेथील शिक्षणाचे वातावरण मजबूत होते. पालकांचा विश्वास वाढतो आणि येणाऱ्या पिढ्यांना नवीन प्रेरणा मिळते.

शोपियां आणि अनंतनागचे हे तरुण आता केवळ नीट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी राहिलेले नाहीत, तर हजारो मुलांसाठी आशेचा नवीन किरण बनले आहेत. मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जन्म घेण्याची गरज नसते, हेच त्यांनी सिद्ध केले आहे. योग्य दिशा, मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर गावातून बाहेर पडूनही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते.

अपयशाला न घाबरता त्याला शिकण्याची एक संधी मानली पाहिजे, असा संदेश या चार तरुणांच्या प्रवासातून मिळतो. संघर्ष जितका मोठा असतो, यशाची गाथा तितकीच प्रेरणादायी बनते.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी दृढ संकल्प आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांसमोर कोणतेही आव्हान मोठे नसते, हे काश्मीरच्या या चार सुपुत्रांनी आपल्या मेहनतीने दाखवून दिले आहे.

हा केवळ चार विद्यार्थ्यांचा विजय नाही, तर बदलणाऱ्या समाजाचे हे बोलके चित्र आहे. शिक्षण हीच नवी ओळख बनत असलेले काश्मीर आज आकारास येत आहे. जिथे तरुण मोठी स्वप्ने पाहत आहेत, ती पूर्ण करत आहेत आणि स्वतःच्या मेहनतीने देश व समाजासाठी आदर्शाचा वस्तुपाठ ठरत आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter