कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी या छोट्याशा गावातील जिगरबाज पैलवान इंजमाम समीर पटेल याने साता समुद्रापार देशाचे नाव रोशन केले आहे. थायलंडमधील बँकॉक शहरात पार पडलेल्या 'मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन'च्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इंजमामने ७४ किलो वजन गटात प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या देदिप्यमान कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
वाघेरीत जल्लोष आणि जंगी स्वागत
बँकॉकमध्ये तिरंगा फडकवून गावात परतलेल्या इंजमामचे वाघेरी ग्रामस्थांनी अभूतपूर्व स्वागत केले. गावात त्याची बैलगाडीतून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, महिला, तरुण आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलालाची उधळण आणि टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि पेढे देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण गावात यावेळी आनंदाचे वातावरण होते.
देशाचा लौकिक वाढवणे हेच ध्येय
आपल्या यशाबद्दल बोलताना इंजमाम म्हणाला की, "कुस्ती क्षेत्रात देशाचा लौकिक वाढवणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. मला मिळालेल्या या सुवर्णपदकाचा खूप अभिमान आणि आनंद वाटतो. माझ्या या यशामागे आई-वडील, नातलग, मान्यवर आणि ग्रामस्थांचे अपार कष्ट आहेत. भविष्यात आणखी यश मिळवण्यासाठी शासनाने खेळाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे."
प्रतिकूल परिस्थितीवर मात
इंजमामची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आणि गरिबीची आहे. मात्र परिस्थितीसमोर न झुकता त्याने प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. आपले आजोबा इकबाल पटेल यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तो अहोरात्र मेहनत घेत आहे.
इंजमामचे प्राथमिक शिक्षण वाघेरी येथे झाले असून, माध्यमिक शिक्षण ओगलवाडी येथील आत्माराम विद्यामंदिरमध्ये पूर्ण झाले. शाळेत असतानाच त्याने जिल्हा आणि विभागस्तरीय स्पर्धा गाजवल्या होत्या. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ऑलिंपिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धेत सलग पाच वर्षे विविध वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून तो कारखान्याच्या मानधनासही पात्र ठरला आहे.
याशिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने ५७, ६१ आणि ६५ किलो वजन गटात सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. धुळे येथील ऑलिंपिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव शासकीय कुस्ती स्पर्धेत ७० किलो गटात, तसेच आंबेगाव (पुणे) येथील युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. विद्यापीठ चॅम्पियन असलेला इंजमाम सध्या कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.
दिग्गजांचे मार्गदर्शन
इंजमामच्या या यशात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, भाजप युवा नेते रामकृष्ण वेताळ, निवासराव थोरात, जयवंतराव पाटील, कऱ्हाड उत्तर युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष शहानूर देसाई, प्राचार्य आर. आर. जाधव आणि एंजल्स स्कूलचे क्रीडा शिक्षक संतोषराजे डांगे यांचे मोलाचे सहकार्य त्याला लाभले आहे.