'डोंगरी के सब भाय शबानाताईसे डरते...!'

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबाना शेख
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबाना शेख

 

नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. व्रत-वैकल्ये केली जातात. महिलांच्या शौर्याची आणि धैर्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतीय संस्कृतीत मिळतात. वर्तमानकाळातही वेगवेगळ्या क्षेत्रांत शौर्य गाजवणाऱ्या असंख्य कर्तुत्वत्वान महिलांनी क्षितीज व्यापलेले आहे. या नवरात्रामध्ये 'आवाज मराठी'वरून अशाच काही कर्तुत्ववान मुस्लीम महिलांची ओळख करून दिली जाणार आहे. आपल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या अशाच एका महिलेच्या कार्याची ओळख करून देणारा हा विशेष लेख. 


ती नऊ भावंडांमधील तिसऱ्या नंबरची थोरली बहीण. तिच्या घरात महिलांना रेडिओ लावायची किंवा ऐकायची परवानगी नव्हतीच; शिवाय, वृत्तपत्रं वाचायलासुद्धा विरोध होता. शिक्षण घेणारी तिची पहिलीच पिढी. तिला सलवार-कमीज घालायची सवय. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर रनिंग करताना सलवार-कमीज घालून, ओढणी बांधून ती धावत असे. ही कथा कोणत्याही चित्रपटातील किवा पुस्तकातील नाही; तर, ही कथा आहे मुंबईतील डोंगरी येथील महिलेची... डोंगरी हा भाग अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद यांसाठी कायमच बदनाम राहिला आहे. तिथंच पहिल्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या शबाना शेख. आता त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवड झाली आहे. त्यांचाच हा प्रवास...

शबाना यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील एका मोठ्या संयुक्त कुटुंबात झाला. त्या सात बहिणी आणि दोन भाऊ. त्यांच्या गावात त्या काळी मुलींना शिक्षण देणं जवळजवळ निषिद्ध होतं. तथापि, त्यांच्या आई-वडिलांचा मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा होता. त्यांनी आपल्या सर्व मुला-मुलींना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. शबाना म्हणतात : “आम्ही सलग सात बहिणी, म्हणून आजी-आजोबा यांना वाटायचं की, घरात वंशाचा दिवा असायला हवा. त्यामुळे सात बहिणींनंतर दोन भाऊ झाले; पण माझ्या आई-वडिलांनी कधीच आमच्यात भेदभाव केला नाही. माझ्या मोठ्या बहिणीने जेव्हा कॉलेजला जायला सुरुवात केली तेव्हा अकोल्यामध्ये कोणत्याच मुस्लिम मुली कॉलेजला जात नसे. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर मला पोस्टग्रॅज्युएशन करायचं होतं; पण गावात पोस्टग्रॅज्युएशनची सोय-सुविधा नव्हती. तेव्हाची सामाजिक परिस्थितीही शिक्षणाला अजिबात अनुकूल नव्हती. त्यातच बाहेरगावी जाऊन शिक्षण घेण्याच्या माझ्या इच्छेला वडिलांनी नकार दर्शवला... त्यामुळे एक्स्टर्नलमधूनच मी एमएला प्रवेश घेतला.”

शबाना पुढं म्हणतात : “आम्हा मुलींना बाहेर कुणाशी बोलायलाही परवानगी नव्हती. कॉलेजला जातानाही गप्पपणे कॉलेजला जायचं आणि कॉलेज संपलं की गप्पपणेच परत घरी यायचं. मुलांशी बोलणं वर्ज्य होतं. तेव्हा निवडणुकीसाठी मुलं मतं मागायला घरी यायची तेव्हा आम्ही आमच्या माडीवर जाऊन बसायचो. कारण, मुलांशी बोललेलं घरात चालत नसे. मग मतं मागायला आलेल्या त्या मुलांशी वडीलच बोलायचे आणि त्यांना सांगायचे, 'ठीकय! आमच्या मुलीला सांगतो, तुम्हाला मत द्या म्हणून.' त्या वेळी जीएसच्या निवडणुका असायच्या.” हे सगळ मनाला खूप खटकायचं. कितीतरी वेळा मी यासंदर्भात माझ्या अब्बुंशी भांडत असे. पुढे मी विद्यार्थिनी प्रतिनिधी (एलआर) म्हणून कॉलेजच्या निवडणुकीत उभी राहिली आणि निवडून आली.     

“प्रवास सोपा नव्हताच. त्या वेळी डीएड, एमए आणि बीएड हेच कोर्स केले जात; पण मला त्यांत रस नव्हता. त्या वेळी स्पर्धा परीक्षांची खूप माहिती नव्हती; पण शिक्षणाच्या प्रचंड आवडीमुळे मी माहिती मिळवण्यासाठी धडपडत असे. एमएचं प्रथम वर्ष सुरू असतानाच मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे 'मुली अमुक करू शकतात' किंवा 'तमुक करू शकत नाहीत', अशी चर्चा व्हायची. ही चर्चा समाजाकडून नव्हे तर, फॅमिली मेंबर्सकडूनच व्हायची; पण आमच्या वडिलांचा शिक्षणाबद्दल पॉझिटिव्ह ॲप्रोच होता. मात्र, घरातील वातावरण तसं नाही हे सातत्यानं जाणवायचं. म्हणून कुठं तरी वाटायचं की, याला वाचा फोडायला हवी. 'आम्हीही काही कमी नाही,' हे दाखवून द्यावं असं मनात कुठं तरी होतं. त्या वेळी आतासारखी  सहज माहिती उपलब्ध होत नसे. जाहिराती आल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी रोज वृत्तपत्रे चाळत असे. परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन मिळावं यासाठी माझी धडपड असल्यामुळे कॅप्टन अविनाश कोल्हटकर सर माझ्या संपर्कात आले. ते स्पर्धा परीक्षांचे  क्लास चालवत असत. त्या वेळी पंधरा पैशांचं पोस्टकार्ड असायचं. जाहिरातीसंदर्भात किंवा अभ्यासासंदर्भात मी सरांना पोस्टकार्ड पाठवत असे...” शबाना त्यांचा प्रवास उलगडत राहतात.

पुढं सरांनी शबाना यांना खूप सहकार्य केलं. त्यांच्या पत्राला सरांचं उत्तर यायचं : "शबाना, जाहिरात आली की मी तुला नक्की कळवेन.” आणि अखेर जाहिरात आली आणि सरांचं शबानाला तसं पत्रही आलं.

शबाना आठवणींमध्ये रमताना सांगतात : “मी माझ्या अब्बूंना सांगितलं होतं, 'मला पुढील शिक्षणासाठी पुण्यात राहायचं आहे. अब्बू खूप रागावले. माझ्या शिक्षणाला त्यांचा कधी विरोध नव्हताच; पण मला घरापासून लांब राहावं लागेल, असुरक्षित वाटेल या काळजीपोटी तो त्यांचा राग होता व त्यामुळे ते परवानगी देत नव्हते. अब्बूंचं मन मी वळवत होते; पण ते काही तयार होत नव्हते. मात्र, मला इतर मुलींसारखं बंदिस्त न राहता असं काही करायचं होतं की, ज्यामुळे माझ्या अब्बूंना माझा अभिमान वाटेल. मी हे पाऊल उचललं तर इतर अनेक मुलींच्या शिक्षणातील अडथळे कमी होतील असंही मला वाटायचं”

दिवसा पुस्तकांसोबत पाहिलेली स्वप्नं शबाना यांना रात्री झोपू देत नसत. म्हणून अखेर त्या त्यांच्या अब्बूंना निर्धारपूर्वक पुन्हा म्हणाल्या : “अब्बू, मुझे कुछ भी कर के पढना है, चाहे कितनी भी कठिनाईयाँ आएँ. आप ने मुझे पढने के लिये शहर नही भेजा तो मैं यहाँ से चली जाऊँगी. अब तुम सोच लो... मैं जाऊंगी मतलब जाऊंगी, अब्बू!,” शबाना यांच्या या शब्दांनी अखेर त्यांच्या वडिलांनी त्यांना पुण्यात पुढील शिक्षणासाठी पाठवायची तयारी केली. पुण्यातील एका लांबच्या नातेवाइकाकडे शबाना यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. आणि अखेर शबाना यांनी पुणं गाठलं.    

पुण्यात कॅप्टन अविनाश कोल्हटकर सरांच्या कोचिंग क्लासमध्ये शबाना जाऊ लागल्या. शबाना म्हणतात : “मी कोल्हटकर सरांना कधी बघितलेलं नव्हतं; पण मला नेहमी वाटायचं की, कोल्हटकर सर मुझे सपोर्ट करेंगे. कोल्हटकर सर हे पुण्याचे होते. ते लष्करातून निवृत्त झाले होते व क्लासेस चालवत होते.” शबाना यांनी सरांकडे एक वर्षाचा क्लास केला. त्या ग्रामीण भागातून आलेल्या. शहरातील वातावरण बघून त्यांची घालमेल व्हायची, कावरेबावरेपणा यायचा.

शहरात मुलं-मुली एकमेकांशी बोलायची, सोबत जेवायची. असं करायला शबाना यांना फार संकोच वाटायचा. त्या बुजायच्या. मैदानात धावताना ट्रॅकसूट घालावा लागायचा. मात्र, शबाना यांनी यापूर्वी कधी पँट-शर्ट घातलेला नव्हता. सलवार-कमीज हाच नेहमीचा पोशाख. म्हणून त्या रोज सलवार-कमीजच घालायच्या. त्यामुळे सर त्यांना खूप रागवायचे. त्याचं चांगलं करिअर घडावं असं सरांनाही वाटत असे. शबाना यांनी ठरवलं होतं की, समजा, सर शिस्तीपोटी, कळवळ्यापोटी मारायला आलेच तर त्या दिवशी बघू या काय करायचं ते! सर रोज ट्रॅकसूटबद्दल विचारायचे आणि शबाना सांगायच्या :  “सर, मैं ट्रॅकसूट लाने को भूल गयी. मैं कल पहनूँगी."

शबाना रोज सोबत ट्रॅकसूट न्यायच्या; पण तो घालायची त्यांना लाज वाटत असे, संकोच वाटत असे. 'टी-शर्ट और पैंट कैसे पहनें? और उस पे दुपट्टा नहीं लेना?,' असा सवाल त्या वेळी त्यांच्या मनात उपस्थित होत असे. शबाना सांगतात : “सर म्हणायचे, 'ट्रॅकपँट घाला, शॉर्ट्स घाला... त्यामुळे तुमचे लेग्ज् ओपन होतील आणि तुम्ही चांगले पळू शकाल'; पण माझी हिंमत होत नसे. ग्राऊंडची परीक्षा जवळ आली. त्या दिवशी मी ट्रॅकसूट घालायचे ठरवले. माझ्या घरातील कुणालाही त्याबद्दल मी सांगितलं नाही. कारण, मला ट्रॅकसूटवर पळायचं होतं. जर कुणाला सांगितलं असत तर ते ग्राऊंडवर आले असते आणि माझा कॉन्फिडन्स कमी झाला असता. प्रत्येक गोष्ट करताना विचार करावा लागायचा. का तर, मला कुणीतरी बघेल आणि काय होईल?”

त्यानंतर शबाना यांची लेखी परीक्षा झाली. मुलाखतीसाठी बराच अवधी होता; पण, गावी जायची शबाना यांची अजिबात इच्छा नव्हती. त्या सांगतात : "कारण, गावात बऱ्याच लोकांना माहीत झालं होतं की, शबाना अधिकारी होण्यासाठी पुण्याला गेली आहे. जर गावी गेले तर लोक त्यासंदर्भात विचारतील म्हणून मुलाखत होईपर्यंत मी पुण्यातच थांबले. नंतर एके दिवशी घरून फोन आला आणि मला गावी जावं लागलं; पण मी काही घराच्या बाहेर निघायची नाही. एके दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान माझ्यासाठी एक फोन आला. तिकडून कोल्हटकर सर बोलत होते. ते म्हणाले : 'शबाना, तुझी PSI पदासाठी निवड झाली आहे!' हे ऐकताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी खुशीनं अगदी बेभान झाले. घरात जल्लोष सुरू झाला. "जिल्ह्यातील पहिली (मुस्लिम) महिला पोलीस-अधिकारी' म्हणून माझे फोटो वर्तमानपत्रात छापून आले. मी शिक्षण घेत असताना ज्यांनी नाक मुरडलं होतं त्यांनीही माझे ठिकठिकाणी सत्कार केले. माझ्या धाकट्या बहिणींनी फटाके वाजवून जल्लोष केला.”

पोलीस उपअधीक्षकपदासाठी थेट एमपीएससी परीक्षेत शबाना पात्र ठरल्या नाहीत. मात्र, निराश न होता  पहिल्याच प्रयत्नात उपनिरीक्षकपदाची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी एमए आणि नंतर एलएलबी पूर्ण केलं. सन १९९२ मध्ये 'महाराष्ट्र पोलिसा'त शबाना रुजू झाल्या. पुढं त्यांची धाकटी बहिण १९९५ मध्ये दलात रुजू झाली. तर, दुसरी एक बहिण शिक्षिका आहे. गावातील आणि जिल्ह्यातील (मुस्लिम) मुली सरकारी नोकऱ्यांमध्ये मागे राहिल्याचं 'मिथक'च केवळ या बहिणींच्या यशानं नाहीसं झालं असं नाही, तर या भागातील महिलांच्या शिक्षणाची परिस्थितीही बदलली.

निवड झाल्यानंतर शबाना यांनी एमएचं द्वितीय वर्ष व पुढं एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. पोलिस दलातील शबाना यांच्या सेवेला आता तीस वर्षं पूर्ण झाली आहेत. या तीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक केसेस हाताळल्या. शबाना यांना दोन मुली आहेत. शबाना यांचे पती डॉइश बँकेत उपाध्यक्षपदी आहेत. त्यांच्या एका मुलींचं एमबीए पूर्ण झालं असून ती सध्या परदेशी असते. तर, दुसरी मुलगी बारावीत आहे.

"संपूर्ण करिअरमधील मानसिक खच्चीकरण करणारी केस कोणती?", असं विचारल्यावर शबाना म्हणतात :  माझं कधीही खच्चीकरण झालं नाही. माझ ठरलेलं असायचं... कुठलीही केस असली तरी आपण प्रामाणिकपणे काम करायचंच आहे; मग कुठलंही प्रेशर असेल किंवा काहीही असेल. जो काम करना है उस को करनाही है. आपल्याला जे काम करायचं आहे ते लीगल करायचं आहे. मी इथं लोकांना मार्गदर्शन करतानाही हेच सांगते, 'तुम्ही कुणाच्याही इल्लीगल ऑर्डर्स फॉलो करू नका. तुमचे वरिष्ठ असतील किंवा अन्य कुणी असतील तरी त्यांनी  लीगल परवानगी दिल्यावरच काम करा.' त्यामुळे, एखाद्या केसमध्ये मला कधी त्रास झालाय, असं मला कधी वाटलं नाही."

आतापर्यंत हाताळलेल्या सगळ्यात मोठ्या केसबद्दल बोलताना शबाना म्हणतात : “मी  नागपाडा पोलीस स्टेशनला PI होते. तिकडे माझ्या दोन केसेस दहा वर्ष शिक्षेपर्यंत - Conviction - गेल्या. तिसऱ्या केसमध्ये एक वर्ष आणि आठ महिने. या केसेसमध्ये तर आरोपी बाहेर आलेच नाहीत. जे आतमध्ये गेलेत त्यांना जामीनही मिळाला नाही. कर्तव्य (ड्यूटी) बजावताना कधी कधी सामाजिक, राजकीय प्रेशर असतं; परंतु, त्या वेळी डिप्लोमॅटिकलली आणि टॅक्टफुली केस हँडल कराव्या लागतात. अशा वेळी जे कायदेशीर आहे तेच काम मी करते.”

आज अनेक तरुणांना शबाना मार्गदर्शन करत असतात. डोंगरीमध्ये रुजू झाल्यावर काय अडचणी आल्या असं विचारल्यावर त्या सांगतात : “डोंगरी इथं संमिश्र वस्ती आहे. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक इथं राहतात. डोंगरी हा भाग लोकांना कम्युनल वाटतो; पण इथल्या लोकांशी संवाद साधला की ते व्यवस्थित सहकार्य करतात. उमरखाडी हा हिंदूंचा परिसर आहे, पालागल्ली, चार्णाल, दर्गा गल्ली इथं मुस्लिम जास्त संख्येनं आहेत. लाल चाळ नावाच्या परिसरात बौद्ध लोक राहतात. मी नेहमी या भागांमध्ये जाते. तिथल्या लोकांशी संवाद साधायला मला आवडतं. चांगलं वाटतं. तिथल्या प्रत्येक व्यक्तीकडे माझा मोबाईल-नंबर आहे. ते कधीही काहीही अडचण असल्यास मला संपर्क करू शकतात. मी या भागात आल्यावर सुरुवातीला ड्रग्जविषयीच्या खूप कारवाया केल्या. आता परिसरातल्या लोकांमध्ये चर्चा असतात, 'शबानाताई को मालूम हुआ तो छुट्टी नही!' मला ड्रग्जचं इथून समूळ निर्मूलन करायचं आहे. उस का नामोनिशाँ मिटा डालना है. संपूर्ण मुंबईतील सगळ्यात मोठी केस होती ती म्हणजे फेब्रुवारी २०२१ मधली. ड्रग्जची केस. २५ किलो एमडी ड्रग्ज होतं. किंमत होती साडेबारा कोटी रुपये.

आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्यानं गुन्हा केला तर, त्याला शिक्षा ठोठावली जाईल असं पाहिल्याशिवाय मी त्याला सोडत नाही. पोलिसांना कोणतीही जात नसते. पोलीस हीच आमची जात आहे. आतापर्यंत मला कधीही कुणाच्या धमक्या आलेल्या नाहीत." 

"मुस्लिम समाजात मुलींचं शिक्षणात प्रमाण फार कमी आहे. त्यांनीही शिक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या पालकांनीही त्यांना सपोर्ट करायला हवा. कोणावरही अवलंबून न राहता सगळ्या अनावश्यक चौकटी मोडून महिलांनी बाहेर पडायला हवं," असं शबाना आवर्जून सांगतात.

डोंगरी इथं शिक्षणासाठी स्थायिक झालेल्या २८ वर्षीय आमिर काझी याला शबाना यांच्या कामाबद्दल विचारल्यावर तो म्हणतो : “डोंगरी के सब भाय शबानाताईसे डरते...!'' मात्र, बाहेर कितीही 'धाँसू इमेज' असली तरी शबाना एक आई म्हणून आपल्या कुटुंबीयांबद्दल संवेदनशील आहेत. त्या म्हणतात : “मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आपण तंदुरुस्त असू तरच कामातही मन रमतं. ये मेरा खुद का लॉजिक है! त्यामुळे मी कुटुंबाकडेही खूप लक्ष देते. घरातही थोडा दरारा आहेच माझा! नाही असं नाही! मी  मेंटली आणि फिजिकली थोडीशी स्ट्रेस्ड् असले तरी चालेल; पण माझ्या मुलींसाठी आणि पतीसाठी स्वयंपाक मी स्वतः करते. आमच्याकडे कामाला बाई आहे; परंतु, ती फक्त मदनीस म्हणून आहे. सकस आहारावर माझा भर असतो. आई म्हणून मी कुठंही तडजोड करत नाही.”

कितीतरी चौकटी मोडून आलेल्या शबाना यांची ही संघर्षमय कथा ऐकली की अंगावर शहारे येतात. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य आणि डोळ्यांत विजयाची चमक दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये धीरगंभीरता दिसते. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आपल्याही अंगात लहरत असल्याचं भासतं. समाजानं घालून दिलेले अनेक अनावश्यक आणि जाचक पायंडे मोडून त्या आज सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून कार्यरत आहेत.

- छाया काविरे ([email protected]

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या कर्तुत्ववान मुस्लीम महिलांच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻

 

देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी डॉ. वृषाली शेख!


पालघरच्या शेख कुटुंबातील तिन्ही मुली समाजासाठी ठरताहेत प्रेरणास्रोत 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube